चिदगीरीत कु-हाडीचा घाव घालून महिलेस केले गंभीर जखमी
भोकर पोलीसात तिघांविरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.चिदगीरी येथे लहान मुलांच्या शुल्लक भांडणाच्या कारणावरुन त्या मुलाच्या आईचा वाईट हेतूने हात धरुन ओढत नेऊन तिच्या हातावर कु-हाडीचा घाव घालून गंभीर जखमी केले असून या प्रकरणी तिघांविरुद्ध विनयभंग,जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिदगीरी ता.भोकर येथील एका महिलेच्या लहान मुलासोबत तिच्या घराशेजारील दत्ता सदाशिव कदम याच्या मुलांचे दि.११ जानेवारी २०२३ रोजी शुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. याचा राग मनात धरून त्या लहान मुलांची आई व तिचा मुलगा शिवशंकर दिलीप कदम(१६) हे घरी असल्याचे पाहून दि.१२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान दत्ता सदाशिव कदम आणि त्यांची पत्नी सखुबाई दत्ता कदम हे दोघे त्या महिलेच्या घरा समोर येवून जोर जोराने आरडा ओरड करु लागले.त्यावेळी मुलगा व त्याची आई घराबाहेर येवून तुम्ही असे का आरडा ओरड करत आहात? म्हणून विचारले असता ते दोघे पती पत्नी म्हणाले की,तुम्ही काल आमच्या सोबत लहान मुलांच्या शुल्लक वादातून भांडण का केले होते ? याचा जाब द्या म्हणत अश्लील शिवीगाळ केली.यावेळी त्या आई व मुलाने आम्हास शिवीगाळ करु नका असे म्हटले असता शेजारी दत्ता सदाशिव कदम याने वाईट उद्देशाने त्या महिलेचा हात धरून ओढत नेले. तसेच त्याची पत्नी सखुबाई दत्ता कदम हीने त्या महिलेचे केस धरून थापड बुक्याने मारहाण केली व ती म्हणाली की,तुम्हाला आता दाखवितो माझा मुलगा येणार आहे.तेवढ्यात तिचा मुलगा माधव दत्ता कदम,कृष्णा शिवाजी साबळे असे दोघेजण त्या ठिकाणी धावत आले व माधव दत्ता कदम याने त्याच्या हातातील कु-हाडीने त्या महिलेच्या डाव्या हाताच्या दंडावर घाव घातला आणि मनगटाच्या कोप-याखाली कु-हाडीच्या तुंब्याने मारुन गंभीर जखमी केले.
शिवशंकर दिलीप कदम यास ही कु-हाडिच्या तुंब्याने हातावर मारहाण केली व जखमी महिला आणि तिच्या मुलास जीवे मारण्याची धमकी दिली.त्यावेळी जखमी आई व मुलाने वाचवा वाचवा म्हणत मदतीसाठी आरडा ओरड केली असता तेथे मदतीस आलेल्या कृष्णा शिवाजी साबळे याने माधव दत्ता कदम यास धरून बाजुला नेले.तर माधव कदमची आई सखुबाई हिने माधवच्या हातातील कु-हाड हिसकावून घेतली व घरामध्ये नेवून लपविली.यावेळी गावातील काही नागरिक तेथे धावून आले व त्यांनी ते भांडण साठविले. तसेच जखमी महिलेस आणि तिच्या मुलास शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र,भोसी ता.भोकर येथे उपचारासाठी नेले.कु-हाडीच्या घावाने ती महिला गंभीर जखमी झाली असल्यामुळे तिच्यावर प्रथमोपचार करुन अधिक उपचारासाठी तिची नांदेडला रवानगी करण्यात आली.
जखमी महिलेचा मुलगा शिवशंकर दिलीप कदम(१६) रा.चिदगीरी याने भोकर पोलीस ठाणे गाठले व उपरोक्त आशयानुसार रितसर फिर्याद दिली.यावरुन दत्ता सदाशिव कदम,सखुबाई दत्ता कदम व माधव दत्ता कदम सर्वजण रा.चितगीरी ता.भोकर या तिघांविरुद्ध गु.र.नं. १७/ २०२३ कलम ३२६,३५४,३२३,५०४,५०६,३४ भादंवि प्रमाणे विनयभंग,जीवे मारण्याची धमकी देणे व जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.उप.नि.संभाजी देवकांबळे हे पुढील अधिक तपास करत आहेत.