भोकर येथे ट्रक-ऑटो रिक्षा अपघातात महिला ठार
तर तिच्या पतीसह अन्य एकजण गंभीर जखमी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहरालगतच्या म्हैसा-नांदेड-उमरी-भोकर वळण रस्ता चौकात भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने ऑटो रिक्षास उडविले.झालेल्या भिषण अपघातात ऑटो रिक्षातील प्रवासी महिला जागीच ठार झाली असून तिचा पती व ऑटो रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे.
रायखोड ता.भोकर येथील ऑटो चालक आपल्या रिक्षा क्र.एम.एच.२६ ए.सी.४१५७ मध्ये भोकर येथून काही प्रवासी घेऊन रायखोड गावी जात असतांना दि.२३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३:४५ वाजताच्या दरम्यान म्हैसा (तेलंगणा राज्य) येथून नांदेडकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रक क्र.ए.पी.०७ की.बी.२२५९ या मालवाहू ट्रकच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला व त्या ट्रकने भोकर शहरालगतच्या म्हैसा-नांदेड-उमरी-भोकर वळण रस्ता चौकात उपरोक्त ऑटो रिक्षास उडविले.या भिषण अपघातात ऑटो रिक्षातील कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड,ता.रायखोड ता.भोकर ही महिला जागीच ठार झाली.तर तिचा पती लक्ष्मण कोईलवाड( ५५) व ऑटो रिक्षा चालक बाबू मारोती बुद्देवाड(३०) ता.रायखोड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.ही माहिती भोकर पोलीसांत मिळताच पो.उप.नि.अनिल कांबळे, जमादार संजय पांढरे यांसह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले व त्यानी काही नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी आणि मयत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नेला.जखमींवर तेथे प्रथमोपचार करण्यात येऊन अधिक उपचारासाठी त्यांची नांदेड येथे रवानगी करण्यात आली.ऑटो रिक्षा चालक जखमी असल्याने अद्याप तरी भोकर पोलीसात गुन्हा दाखल झाला नसून ट्रक चालक घटनास्थळी तो ट्रक सोडून पसार झाला आहे.
तर भोकर शहरालगतच्या म्हैसा-नांदेड-उमरी-भोकर वळण रस्ता चौकात राष्ट्रीय महामार्ग सा.बां. वि.विशेष प्रकल्प विभागाने कसलेली गतीरोधक, दिशादर्शक व वाहन गती सुचनाफलक न लावल्याने अनेक भिषण अपघात या ठिकाणी होत असून हा चौक ‘मृत्यूस्थळ’ म्हणून संबोधले जात आहे.सदरील चौकात उपरोक्त बाबींसह उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे असे अनेकांतून बोलल्या जात आहे.