Mon. Dec 23rd, 2024

अभिमानास्पद-नांदेडचे भुमिपुत्र ‘कदम’ बंधूंनी ‘डि.लिट’ ने अण्णा भाऊ साठेंचा केला सन्मान

Spread the love

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना एमजीएम विद्यापीठाच्या वतीने सन्मानाची डी.लीट(मानद) पदवी प्रदान

आता साहित्यरत्न झाले डॉ.अण्णा भाऊ साठे…!

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : मराठवाड्यातील पहिले स्वयं अर्थसाहाय्यित खाजगी विद्यापीठ असलेल्या महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठ, औरंगाबादचा पहिला दीक्षांत समारंभ रविवार, दि.२७ नोव्हेंबर उत्साहात साजरा झाला.या प्रसंगी नांदेडचे भुमिपुत्र असलेल्या ‘कदम’ बंधूनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना एमजीएम विद्यापीठाच्या वतीने सन्मानाची डी.लीट (मानद) पदवी प्रदान केली.साठे कुटूंबियांच्या वतीने त्यांच्या सुनबाई सावित्रीमाई मधुकर साठे यांनी ही पदवी स्विकारली असून आता साहित्यरत्न हे डॉ.अण्णा भाऊ साठे झाल्याने समाज बांधव,तमाम विचार अनुयायी व अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य च्या वतीने एमजीएम विद्यापीठ आणि प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले असून ऋण व्यक्त ही करण्यात आले आहेत.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ,भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर या समारंभाचे प्रमुख अतिथी होते.तर, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम,हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, नियामक मंडळाचे सदस्य कमलकिशोर कदम (अध्यक्ष,महात्मा गांधी मिशन),डॉ.पी.एम.जाधव (उपाध्यक्ष,महात्मा गांधी मिशन), विश्वस्त डॉ.सुधीर कदम, डॉ.नितीन कदम,प्राचार्य प्रतापराव बोराडे,रणजीत कक्कड, भाऊसाहेब राजळे,विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांच्यासह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ.शशांक दळवी,डॉ.एच.एच.शिंदे(अधिष्ठाता,अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान),डॉ.प्राप्ती देशमुख (अधिष्ठाता,बेसिक अँड अप्लाइड सायन्स),डॉ.विजया देशमुख(अधिष्ठाता,वाणिज्य आणि व्यवस्थापन),डॉ.रेखा शेळके (अधिष्ठाता,सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या),पार्वती दत्ता (अधिष्ठाता,परफॉर्मिंग आर्ट्स),डॉ. विजया मुसांडे,प्रा.सुनील पाटील यांसह आदी मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती.

या पहिल्या दीक्षांत समारंभामध्ये एमजीएम विद्यापीठातून २०२० ते २०२२ या शैक्षणिक वर्षांदरम्यान उत्तीर्ण १०९ पदवीधर,२९१ पदव्यूत्तर पदवीधर,१३१ पदविकाधारक आणि ३ प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.यापैकी १३६ बेसिक अँड अप्लाईड सायन्स,६० इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी,२३० मॅनेजमेंट अँड कॉमर्स, १५ परफॉर्मिंग आर्ट्स आणि ९३ सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विद्याशाखेचे विद्यार्थी आणि विविध शाखांमधून सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या नऊ विद्यार्थ्यांना ‘चान्सलर्स गोल्ड मेडल’ देऊन सन्मानित करण्यात आले.

कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी प्रास्ताविकातून या पहिल्या दीक्षांत समारंभाविषयी विद्यापीठाची भूमिका  मांडली.तसेच एमजीएम विद्यापीठाच्या कारकिर्दीचा व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आढावा प्रस्तूत करुन गौरव केला.यावेळी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची गौरव जीवनी एका चलचित्र फितीतून दाखविण्यात आली.तर कुलपती अंकुशराव कदम अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांसारख्या एका विश्वविख्यात साहित्यिकास ही सन्मानाची पदवी देण्याचे भाग्य आम्हास लाभले असून त्यांच्या कार्याचा गौरवासाठी आमचा हा खारीचा वाटा आहे.असे ही ते म्हणाले.

अभिमानास्पद – नांदेडचे भुमिपुत्र ‘कदम’ बंधूंनी ‘डि.लिट’ ने अण्णा भाऊ साठेंचा केला सन्मान ; आता साहित्यरत्न झाले डॉ.अण्णा भाऊ साठे

महाराष्ट्राच्या जडणघडणीत साहित्य,विचार,संघर्ष,स्वातंत्र्य व संयुक्त महाराष्ट्र लढा आदींच्या माध्यमातून एक परिवर्तनवादी चळवळ उभे करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे एक जागतिक पातळीचे विश्वविख्यात साहित्यिक ठरले आहेत. त्यामुळे त्यांचा व जीवनकार्याचा गौरव व्हायलाच पाहिजे.याची जान ठेऊन व दखल घेऊन लिंबगाव ता.जि.नांदेड अर्थातच नांदेड जिल्ह्याचे भुमिपुत्र असलेल्या एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि नियामक मंडळाचे सदस्य तथा महात्मा गांधी मिशन चे अध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम या ‘कदम’ बंधूंनी एमजीएम विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘डी.लिट (मानद) पदवी प्रदान करण्याचे ठरविले.याच अनुषंगाने दि.२७ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न झालेल्या एमजीएम विद्यापीठाच्या पहिल्या भव्य दीव्य दीक्षांत समारंभात त्यांनी,विद्यापीठ श्रेष्ठी व प्रशासनाने ही पदवी प्रदान केली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई मधुकर साठे यांनी ही पदवी स्विकारली.यावेळी अण्णा भाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाही पक्षाचे प्रमुख सचिन साठे,नातू तथा नात जावई गणेश भगत,यांसह सावित्रीबाई साठे यांचे मानस बंधू साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे,जेष्ठ सामाजिक नेते राधाजी शेळके व आदी नातेवाईकांची उपस्थीती होती.हिमालयापेक्षा ही उंच प्रतिभा असलेल्या या विश्वविख्यात व्यक्तीमत्वाचा या अगोदरच अशा प्रकारे विविध पदव्यांनी सन्मान व्हायला पाहिजे होता,परंतू तसे झाले नाही.सोलापूर विद्यापीठासह अन्य एका विद्यापीठाने ही पदवी प्रदान करण्याचे घोषित करुन ही प्रदान केली नाही.तर ही सन्मानाची पदवी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना देण्याचे ऐतिहासिक कार्य नांदेड जिल्ह्याचे भुमिपुत्र असलेल्या एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि नियामक मंडळाचे सदस्य तथा महात्मा गांधी मिशन चे अध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम या ‘कदम’ बंधूंनी केले आहे.हे ऐतिहासिक तथा संस्मरणीय कार्य करण्यात ‘कदम’ बंधू व एमजीएम विद्यापीठाचा सिंहांचा वाटा आहे.त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील डॉ.अण्णा भाऊ साठे प्रेमी,विचार अनुयायी व तमाम समाज बांधवांसाठी ही बाब अभिमानाची असल्याने अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे,प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे,प्रदेश उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार, मराठवाडा अध्यक्ष पिराजी गाडेकर,जिल्हाध्यक्ष शिवाजी नुरुंदे, नागेश तादलापूरकर यांसह आदींनी ‘कदम बंधू व एमजीएम विद्यापीठाचे’ अभिनंदन केले असून शतशः आभार ही मानले आहेत.

ही पदवी अण्णा भाऊ साठे यांच्या हाती द्यायला पाहिजे होती – सावित्रीबाई साठे झाल्या भावनिक

संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार विश्व साहित्यभुषण अण्णा भाऊ साठे यांना एमजीएम विद्यापीठाने पहिली मानद डी.लिट.पदवी मरणोत्तर प्रदान केली.साठे कुटूंबियांच्या वतीने त्यांच्या सुनबाई सावित्रीबाई मधुकर साठे यांनी नातेवाईकांच्या उपस्थित ही पदवी स्वीकारली.यावेळी पदवी प्रदान सन्मानाचे उत्तर देण्यास व आभार मानण्यासाठी श्रीमती सावित्रीबाई साठे उभे राहिल्या असता त्या म्हणाल्या की,जी पदवी अण्णा भाऊंच्या हाती द्यायला पाहिजे होती.ती,पदवी माझ्या हाती देण्यात आली आहे.ती स्विकारताना मला प्रचंड आनंद झाला असून या महान व्यक्तीमत्वाची मी सून असल्याने मी स्वत:ला भाग्यवंत समजते.पुढे बोलतांना त्यांचे डोळे पान्हावले व भावनिक झाल्याने एमजीएम विद्यापीठाचे ऋण व्यक्त करुन त्यांनी बोलणे थांबविले.

…हा पहिला सन्मान असून पुढे ‘भारतरत्न पुरस्काराने’ सन्मान व्हावा – सचिन साठे

पदवी प्रदान सन्मान सोहळ्यास उत्तर देताना श्रीमती सावित्रीबाई साठे या भावनिक झाल्या व त्यांनी मनोगत थांबविल्याने प्रोटोकॉल चा सन्मान ठेऊन डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाही पक्षाचे प्रमुख सचिन साठे यांनी पुढील मनोगत व्यक्त केले.यावेळी ते म्हणाले की,एमजीएम विद्यापीठाने साहित्यरत्न अण्ण भाऊ साठे यांना दिलेली डी.लिट पदवी ही संपूर्ण समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे.तसेच ही पदवी देण्याचे घोषित करुन ही न देणाऱ्यांसाठी एक प्रकारे चपराकच आहे.एमजीएमने घेतलेला हा निर्णय अण्णा भाऊ साठे यांना मानणाऱ्या बहुजन समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि प्रत्येकांच्या हृदयाला भिडला आहे. ज्ञानाचा अहंमगंड असलेल्या आणि प्रचंड मोठी श्रीमंती असलेल्या लोकांचे कौतुक तर कुणीही करते.परंतू,तसे न करता देशाच्या उन्नतीसाठी आणि संस्कृतीसाठी रक्त सांडणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचा सन्मान एमजीएमने आज केला आहे.साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या गुणवत्तेला न्याय दिल्याबद्दल एमजीएम विद्यापीठाचे आम्ही मनापासून आभार मानतोत. हा सन्मान पुढील सन्मानाचे पहिले पाऊल असून पुढे डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा ‘भारतरत्न पुरस्काराने’ सन्मान व्हायला पाहिजे आणि यासाठी उपस्थितांसह सर्वांनी प्रयत्न करावा,असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !