भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत -विठ्ठल गिते
महाडीबीटी प्रणाली संकेतस्थळावर अर्ज करण्याचे भोकर तालुका कृषि अधिकाऱ्यांनी केले आवाहन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोखर : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मध्ये फळबागेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याने त्यांनी दि.३० नोव्हेंबर पर्यंत महाडीबीटी प्रणाली संकेतस्थळावर https://mahadbtmahait.gov.in/ शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन भोकर तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गिते यांनी केले आहे.
जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मध्ये फळबागेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत असे शेतकरी या योजनेमध्ये पात्र राहतील व स्वतः च्या नावाने ७/१२(वैयक्तीक शेतकरी)असणे आवश्यक आहे.सदरील फळबाग योजनेत आंबा कलमे /रोपे,पेरू कलमे (घन लागवड ),डाळींब कलमे,कागदी लिंबू कलमे / रोपे,मोसंबी कलमे,संत्रा कलमे( इंडो इस्त्राईल तंत्रज्ञान ),नारळ रोपे,सिताफळ कलमे रोपे,आवळा कलमे ‘ / रोपे,चिंच कलमे रोपे,जांभूळ कलमे रोपे, चिकू कलमे,अंजिर कलमे यांचा समावेश करण्यात आला असून लागवड क्षेत्र मर्यादा किमान ०.२० ते ६.०० हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली आहे.तर या लागवडीसाठी खडे खोदणे,कलमे रोपे लागवड करणे, पीक संरक्षण,नांग्या भरणे,ठिबक सिंचनाव्दारे पाणी देणे अशा विविध टप्प्यांत अनुदान मिळणार आहे.
दि.३० नोव्हेंबर पर्यंत महाडीबीटी प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जांतून संगणकीय सोडत पद्धतीने शेतकऱ्यांची निवड होणार आहे.निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाव्दारे निवडीबाबत अवगत करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना स्वताचा मोबाईल क्रमांकाची नोंद करावी. तसेच अधिक माहितीसाठी कृषि सहायक,कृषि पर्यवेक्षक,मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांंनी दि.३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावेत असे अवाहन भोकर तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गिते यांनी केले आहे.