स्था.गु.शा.पथकाने भोकर तालुक्यात १४ लाखांच्या अवैध गुटख्यासह ट्रक पकडला
गुटखा तस्करांचा नुतन फंडा – प्लास्टीक साहीत्य, बुट,चप्पला,सॉक्स च्या गठाणा आड ट्रक मधून नेते होते हा अवैध गुटखा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला अवैध गुटखा घेऊन जात असलेला एक ट्रक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलीस पथकाने भोकर तालुक्यातील सोमठाणा शिवारातील सोमठाणा-कुबेर रस्त्यावर पकडला असून ट्रकमधील १३ लाख ९३ हजार ९२० रुपयांचा अवैध गुटखा व ट्रक जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी ट्रक चालक व अज्ञात आरोपीविरुद्ध भा.द.वि.आणि अन्न सुरक्षा मानके कायदा नियम, नियमना अन्वये दि.२४ नोव्हेंबर रोजी भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या धाडसी कारवाईने अवैध गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा,पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड चे पो. उप.नि.जसवंतसिंघ शाहु,पो.उप.नि.परमेश्वर चव्हाण,सहाय्यक पो.उप.नि.मारोती तेलंग,जमादार जांभळीकर,पोना पद्यमसिंह कांबळे,चालक जमादार शिंदे यांचा समावेश असलेले पथक दि.२३ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील अवैद्य धंद्याची माहीती काढून गुन्हे दाखल करण्यासाठी गस्तीवर निघाले असता या पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,ट्रक क्र.आर.जे.११ जी.बी.८२२५ या ट्रकमध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधीत केलेले खाद्य प्रदार्थ भरून वाहतुक होत असून हा ट्रक भोकर येथून सोमठाना मार्गे मौ.कुबेर,तेलंगणा राज्य येथे जात आहे.या माहीतीवरुन दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री १:३० वाजताच्या दरम्यान सोमठाणा-कुबेर रस्त्यावरील मौ.सोमठाणा ता.भोकर या गावापासून काही अंतरावर या पथकाने तो ट्रक पकडला. यावेळी ट्रक चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शकील अहमद अब्दुल मस्जीद(३०) रा.घाटा समसाबाद ता. फिरोजपुर झिरका जि.नुहमेबाद (हरीयाना राज्य) असल्याचे सांगितले.तसेच ट्रकमधील मालाची तपासणी केली असता त्यात महालक्ष्मी फ्राईड मुव्हर्स,३५६ अलीपुर गाव,दिल्ही ११००३६ या ट्रान्सपोर्ट मधुन प्लास्टीक साहीत्य,बुट,चप्पला,सॉक्स व इतर परच्युटनचे गठाण असल्याचे निदर्शनास आले.परंतू त्याआड लपुन महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधीत केलेल्या तंबाखु जन्य खाद्य पदार्थाच्या बोरी नेत असल्याची बाब समोर आली.
सदरील ट्रक रात्री पकडण्यात आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने व शासकिय पंचासमक्ष पाहणी करण्यासाठी आडराणातून मुद्देमालासह पोलीस मुख्यालय नांदेड येथे नेण्यात आले. वेगवेगळया ट्रान्सपोर्ट मधून ते साहित्य बिड जिल्ह्यातील वेगवेगळया दुकानदारांना पाठविण्यात आल्याचे आढळून आले असून त्या संबंधीच्या एकूण नऊ ट्रान्सपोर्टची बिल्टी व दुकानदारच्या मुळ पावत्या तपासकामी ताब्यात घेण्यात आल्या. तर ट्रकमधील महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत तंबाखु जन्य खाद्य पदार्थाच्या व्यतीरिक्त आलेले परच्युटनचे गठाण बिल व बिल्टीप्रमाणे पडताळणी करून संबंधीतास परत देण्यात आले.
ट्रक मधील प्लास्टीक साहीत्य,बुट,चप्पला,सॉक्स व इतर परच्युटनचे गठाण व त्याआड लपवून ठेवलेले महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत तंबाखु जन्य खाद्य पदार्थाच्या एकुण ३६ ताब्यात घेतल्या.तसेच त्या बोरी घेऊन दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी तो ट्रक पोलीस बंदोबस्तात भोकर पोलीस ठाण्यात आणण्यात आला.यावेळी शासकीय पंच म्हणून बोलावलेल्या महा विज वितरण कार्यालय भोकर येथील २ कर्मचाऱ्यांसमोर त्या ३६ बोरी तपासल्या असता त्यातील ३० बो-यांत एका बॅग मध्ये आठ बंडल व एका बंडलमध्ये तिन पुढे असे प्रति पुडा किंमत १९२/-रुपये प्रमाणे असलेला राजनिवास सुगंधीत पान मसाला प्रति बोरी किंमत ३६८६४/-रुपये प्रमाणे एकुण ११,०५९२०/-रुपयाचा,६ बोलीत एका बॅगमध्ये ८ लहान बॅग व एका बॅगमध्ये पंचविस पुढे असे प्रति पुडा किमत ४८/- रुपये प्रमाणे प्रिमीयम एक्स.एल.०१जाफरानी जर्दा प्रति बोरी किमत ४८०००/- रुपये प्रमाणे २८८०००/- रुपयाचा असा एकूण १३ लाख ९३ हजार ९२० रुपयाचा अवैध गुटखा मिळाला.याच बरोबर २५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा तो व अवैध गुटखा एकूण ३८ लाख ९३ हजार ९२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर त्या ट्रकमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पदार्थ हा मानवी आरोग्यास हानीकारक असून तो मानवाने सेवन केल्यास त्यास दुर्धर आजार होऊन वेळ प्रसंगी त्यास मृत्यु येवु शकतो हे माहीती असतांना देखील,जाणीव पुर्वक तो त्याचे ताब्यातील ट्रकमध्ये ठेऊन अवैध विक्रीसाठी नेत असल्याने ट्रक चालक व अज्ञात विक्रेता यांच्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक संजय विश्वनाथ केंद्रे यांनी सरकारी फिर्याद दिल्यावरुन भोकर पोलीसात कलम ३२८,२७२, २७३,१८८ भादवि व सहकलम २६(२),२७,२३, ३०(२)(अ)५९ (iv) अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटखा तस्करांचा नुतन फंडा – प्लास्टीक साहीत्य, बुट,चप्पला,सॉक्स च्या गठाणा आड ट्रक मधून नेते होते हा अवैध गुटखा
अनेक वेळा अवैध गुटखा बंद कंटेनर,टँकर,अंबुलन्समध्ये ही नेल्याचे समोर आले आहे.परंतू या गुन्ह्यांतील गुटखा तस्कराने प्लास्टिक साहित्य,बुट,चप्पला,सॉक्स व इतर परच्युटनचे गठाणांच्या आडून हा अवैध गुटखा नेण्याचा नुतन फंडा वापरला असून दर्शनी भागात उपरोक्त साहित्य व आत अवैध गुटखा असल्याचे समोर आले आहे.एक विशेष बाब म्हणजे तेलंगणा, कर्नाटक,आंध्र प्रदेशातून प्रतिबंधीत असलेला अवैध गुटखा सिमावर्ती रस्त्यांनी महाराष्ट्रात आणला जात असल्याचे बहुदा निदर्शनास आले आहे.परंतू या गुन्ह्यात महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात हा अवैध गुटखा नेल्या जात असल्याची बाब समोर आल्याने आता तस्करांनी ‘उलटी गंगा..’ नेण्यास सुरुवात केली आहे का ? अशी चर्चा होत आहे.