‘त्या’ अभिलेखापाल व निमतानदारास दिली वेतनवाढ रोखण्याची शिक्षा
उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भोकर येथे सेवारत असतांना या दोघांनी केली होती चुकीची मोजणी ; जिल्हा अधीक्षक यांनी त्यांच्या विरुद्ध केली ही कारवाई
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय भोकर येथे सेवारत असतांना सन २०१४ व सन २०१६ मध्ये मौ.बटाळा ता.भोकर शिवारातील गट नं.१७४ व १७५ मधील वहिवाटेची हद्द कायम करण्यासाठी तत्कालीन अभिलेखापाल आणि निमतानदार यांनी चुकीची मोजणी करुन तसा अहवाल दिल्याची तक्रार एका शेतकऱ्याने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय नांदेड येथे केली होती.याविषयी उपरोक्तांनी समर्पक खुलासा सादर केला नसल्याने व तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीतील पुरवाव्यांत तथ्य आढळून आल्याने जिल्हा अधीक्षक यांनी उपरोक्त अभिलेखापाल व निमतानदार यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक)१९७९ कलम १० मधील तरतुदिनुसार पुढील एक वर्षाची वेतनवाढ परिणाम न करता रोखण्याची शिक्षा दिली असून याबाबतची नोंद सेवा पुस्तकात घ्यावी.असे संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.
मौ.बटाळा ता.भोकर शिवारातील गट नं.१७४ व १७५ मधील वहिवाटेविषयी संबंधित शेतकऱ्यानी शेत जमीन मोजणीसाठी सन २०१४ आणि २०१६ मध्ये उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय भोकर यांच्याकडे विनंती अर्ज केला होता.त्यावरुन दि.९ डिसेंबर २०१४ व दि.१८ एप्रिल २०१६ रोजी मोजणी करण्यात आली. यावेळी करण्यात आलेली मोजणी उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय भोकर येथील तत्कालीन अनुक्रमे अभिलेखापाल श.का.पाटील व निमतानदार बि.डी. सिद्धमवार यांनी चुकीची मोजणी केल्याची तक्रार शेतकरी प्रशांत अशोकराव पोपशेटवार यांनी उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय भोकर येथे केली. परंतू सदरील कार्यालयाने त्या तक्रारीची कसलीही दखल घेतली नसल्याने त्यांनी दि.४ में २०२२ रोजी पुराव्यांनिशी तक्रार जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय नांदेड यांचेकडे केली.यावरुन उपरोक्त अभिलेखापाल व निमतानदार यांना दि.२८ जून २०२२ रोजी जिल्हा अधीक्षक यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली.सदरील नोटीसीचा खुलासा मुदतीत व समर्पक असा अभिलेखापाल श.का.पाटील यांनी दिला नाही.तर निमतानदार बि.डी.सिद्धमवार यांनी खुलासामध्ये नकाशात दर्शविलेल्या वादि व प्रतिवादी यांच्या वहिवाटीबाबतची माहिती ही सत्य व खरी असून त्यात काही चुकीचे नाही.तक्रारी अर्जदार प्रशांत अशोकराव पोपशेटवार यांनी गैरसमजुतीने तक्रार केलेली दिसून येते.सदर प्रकरणात मी केलेले मोजणी काम नकाशात दर्शविलेला तपशिल हे सदोष नाही. त्यामुळे माझ्या विरूद्ध म.ना.से.(शिस्त व अपील) नियमानुसार कोणतेही कार्यवाही करण्यात येऊ नये.ही नम्र विनंती,असे लिहले.परंतू सक्षम पुरावे सादर केले नाहीत.त्यामुळे त्यांनी दिलेला खुलासा अमान्य करण्यात आला.
यावरुन त्यांनी केलेली मोजणी चुकीची होती,हे निदर्शनास आल्यावरुन उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय भोकर येथील तत्कालीन तथा हल्ली उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय औरंगाबाद ता.जि. औरंगाबाद येथे सेवारत असलेले अभिलेखापाल श.का.पाटिल व उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय भोकर येथील तत्कालीन तथा हल्ली उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय माहूर जि.नांदेड येथे सेवारत असलेले निमतानदार बि.डी.सिद्धमवार या दोघांनी त्यांच्या कर्तव्यात नितांत सचोटी आणि कर्तव्य परायणता राखालेली नसल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणुक) १९७९ कलम १० मधील तरतुदिनूसार पुढील एक वर्षाची वेतनवाढ परिणाम न करता रोखणेची शिक्षा जिल्हा अधीक्षक यांनी दि.३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिल्याचे पत्र संबंधित कार्यालयांना नुकतेच प्राप्त झाले आहेत.तसेच या कारवाईबाबत ची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी,असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय भोकर येथील काही मोजणी अधिकारी व कर्मचारी हे अनेक शेतकरी आणि जमिन मालमत्ता धारकांसोबत अर्थपुर्ण व्यवहार करुन जमिन,प्लाटच्या चतुर्सिमेतील शेजाऱ्यांना कसलीही नोटीस न देता परस्पर थातूर माथूर आणि चुकीची मोजणी करुन अहवाल देतात.तर अर्थपुर्ण व्यवहार झाल्याशिवाय काही जणांची ही मोजणी करत नाहीत व टाळाटाळ करुन आदी प्रकारे नाहक त्रास देतात.यामुळे अनेकांतून संताप व्यक्त होतांनाचे निदर्शनास येते.अशातच चुकीची मोजणी करुन शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या उपरोक्त अभिलेखापाल व निमतानदार यांच्या विरुद्ध ही कारवाई झाल्याने अनेकांतून समाधान व्यक्त होत असून उपरोक्तांविरुद्ध कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शेतकरी प्रशांत पोपशेटवार यांचे अभिनंदन होत आहे.