१० लाखात १ किलो सोने मिळण्याची लालच आली अंगलट
भोकर परिसरात ६ जणांनी तेलंगणाच्या एका व्यापाऱ्याचे रोख ५ लाख रुपये व २ मोबाईल लुटले
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील एका व्यापाऱ्यास १० लाख रुपयात १ किलो सोने एकजण देतो ते सोने घेण्यासाठी आपण महाराष्ट्र यावे म्हणून त्या व्यापाऱ्याकडे जेसीबीवर काम करणाऱ्या चालकाने अमिष दाखविले.कमी किमतीत सोने मिळणार या लालचीने रोख रक्कम घेऊन आलेल्या त्या व्यापा-यास व त्याच्या पत्नीस काठीने मारहाण करुन त्यांच्याकडील रोख ५ लाख रुपये आणि १० हजाराचे मोबाईल हिसकावून घेऊन त्या जेसीबी चालकासह अन्य ५ जणांनी पळ काढल्याची खळबळजणक घटना दि.१ नोव्हेंबर रोजी भोकर-किनवट महामार्गावरील भोकर पासून जवळ असलेल्या सुधा नदी परिसरातील जंगलात घडली असून या प्रकरणी धाडसी चोरीचा गुन्हा भोकर पोलीसात दाखल करण्यात आला आहे. तर १० लाखात १ किलो सोने मिळण्याच्या अमिषाला बळी पडलेल्या या व्यापाऱ्याची लालच त्याच्याच अंगलट आली असल्याची चर्चा होत आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,रविंद्र लिंगान्ना कोट्टा(३५) रा.अंतापेठ ता.जि.निर्मल,तेलंगणा राज्य या व्यापाऱ्याकडे जेबीवर चालक म्हणून काम करत असलेल्या विलास बेले रा.दत्त बर्डी हदगांव,ता.हदगाव जि. नांदेड याने मालक रविंद्र लिंगन्ना कोटा यास सांगितले की, महाराष्ट्रातील एक जण केवळ १० लाख रुपयात १ किलो सोने देतो ते आपण घ्यावे. केवळ १० रुपयात १ किलो सोने हा विश्वासाचा नौकर मिळवून देत आहे म्हणून मोठ्या किमतीचे सोने कमी पैशात मिळणार या लालचीने तो या अमिषाला बळी पडला व त्याने ते घेण्यास होकार दिला. यामुळे सदरील जेसीबी चालक महाराष्ट्रात आला व त्याने ते सोने घेण्यासाठी रोख रक्कम घेऊन यावे असे त्या व्यापाऱ्यास सांगितले.यावरुन उपरोक्त व्यापारी हा आपल्या पत्नीस सोबत घेऊन दि.१ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील भोकर येथे आला असता त्या जेसीबी चालकाने ते सोने घेऊन आलेले लोक किनवट महामार्गावर आहेत आपण तिकडे यावे असे सांगितले. तो व्यापारी व त्याची पत्नी भोकर-किनवट महामार्गावरील भोकर पासून जवळच असलेल्या सुधा नदीवरील सुधा प्रकल्प परिसरात दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान गेले.यावेळी त्या जेसीबी चालकाने त्यांना जवळच्या जंगलात नेले.तेथे अन्य ५ जण थांबलेले होते.त्या व्याप-याने सोने कुठे आहे म्हणून त्यांना विचारले असता त्यांनी रोख रक्कम आणली काय म्हणून विचारले.त्यांनी रोख रक्कम आलणलेली आहे समजताच क्षणाचाही विलंब न लावता त्या व्यापाऱ्यास व त्याच्या पत्नीस त्यांनी काठीने मारहाण केली.तसेच त्यांच्या जवळील रोख ५ लाख रुपये आणि १० हजार रुपये किमतीचे २ मोबाईल हिसकावून घेऊन त्या ठिकाणाहून सर्वांनी पळ काढला.ते सर्वजण पळ काढतांना जीवाची बाजी लाऊन त्या व्या-याने व त्यांच्या पत्नीने त्या जेसीबी चालकास पकडले.
तसेच याबाबतची माहिती त्या व्यापाऱ्याने भोकर पोलीसांना दिली व पकडून ठेवलेल्या जेसीबी चालकाची पोलीसांनी चौकशी केली असता रामू बेले रा.दत्तबर्डी हदगांव,मास यल्लपा देवकर रा.वाळकेवाडी ता.हिमायतनगर,गजू नरहरी जाधव रा.उमरी स्टेशन,लक्ष्मण वल्लेपवार,लक्ष्मण नारायण धोत्रे हे दोघेही रा. किनवट असे त्या अन्य ५ जणांची नावे आहेत असे त्याने सांगितले.हे ५ जण ५ लाख १० हजाराचा मुद्देमाल लुटून पसार झाले असले तरी मुख्य आरोपी पोलीसांच्या हाती लागला असून त्यास अटक करण्यात आली आहे.तर उपरोक्त व्यापाऱ्याने फिर्याद दिल्यावरुन दि.१ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुरनं ४१४/२०२२ कलम ३९५ भादवि प्रमाणे उपरोक्त ६ जणाविरुद्ध भोकर पोलीसात धाडसी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि.सुर्यकांत कांबळे हे करत आहेत. तसेच सदरील आरोपीस दि.२ नोव्हेंबर २०२२ रोजी भोकर न्यायालयात हजर केले असता मा.न्यायाधीशांनी त्यास ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.यामुळे पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात पोलीसांना नक्कीच यश येईल असे बोलल्या जात आहे.