Mon. Dec 23rd, 2024

देशविकासाचा ज्यांच्यावर पडणार ‘भार’ त्यांचा व्हायलाच पाहिजे ‘सत्कार’-देविदास फुलारी

Spread the love

भोकर विचार विकास मंचने विविध क्षेत्रातील गुणवंत, यशवंतांचा केला सन्मान

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : सर्व सोयी,सुविधा उपलब्ध असणा-यांच्या मुलांनी प्राविण्य प्राप्त केले तर ते नाविन्य नसते,परंतू प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन जे विद्यार्थी गुणवंत, यशवंत होतात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलीच पाहिजे.यातून त्यांना प्रोत्साहन मिळते व भविष्यात विविध पदे प्राप्त करुन ते देश प्रगतीपथावर नेऊ शकतात.त्यांच्या ज्ञानातून विविध प्रकारे भावी देशविकासाची द्वारे उघडली जाऊ शकतात.म्हणूनच भावी देशविकासाचा ‘भार’ ज्यांच्यावर पडणार आहे. अशा गुणी,ज्ञानींचा ‘सत्कार’ व्हायलाच पाहिजे.आणि भोकर येथील सामाजिक,सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून हे केलं जात आहे.त्याबद्दल मी अशा सेवाभावींचे मी अभिनंदन करतो.असे मौलिक मनोगत प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांनी भगवती सेवा प्रतिष्ठान भोकर संचलित भोकर विचार विकास मंच आयोजित ” गुणवंताच्या सनमान सोहळ्या ” प्रसंगी भोकर येथे व्यक्त केले.

भगवती सेवा प्रतिष्ठान भोकर संचलित भोकर विचार विकास मंच च्या वतीने दि.३० ऑक्टोबर २०२२ रोजी श्री बालाजी मंदीर नवा मोंढा,भोकर येथे ‘गुणवंच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भोकर विचार विकास मंचचे अध्यक्ष डॉ.उत्तम जाधव हे होते. तर प्रमुख अथिती म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालय,सचिवालय मुंबई चे अवर सचिव राजेंद्र खंदारे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी आणि ग्रामीण कवी शंकर वाडेवाले यांची उपस्थिती होती.या सोहळ्यात उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील, गुणवंत,यशवंत,श्रमवंत व सेवाभावींचा सन्मान करण्यात आला.यातील सेवाभावी संस्था सन्मानात सेवासमर्पण परीवार,एक हात मदतीचा,एक झाड मित्र परीवार व सावली प्रतिष्ठानचा समावेश आहे.तर प्रतिकूल परिस्थितीत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानात अविनाश राजेश राठोड,पंकज रमेश जाधव, प्रणिता गंगारेड्डी ईल्लयगार,बद्दमवाड अक्षिता व्यंकटरेड्डी,कु.रिद्देश्वरी गजानन अडकिणे,सुरज माधवराव तिडके यांचा समावेश आहे.तसेच कठीण परिस्थितीवर मात करत मोठ्या कष्टाने आपल्या पाल्यांच्या यशवंत करणा-या पालकांच्या मन्मानार्थीत बंडू सादुलवार,आंनद किशनराव काळे,दिगंबर बंकेवाड यांचा समावेश आहे.तर गुणवंत कर्मचारी सन्मानार्थीत नारायण सादुलवार,किशन कोंगेवाड,योगेश गोरठकर,व्यंकटी सुरकार,दिलीप वाघमारे हे आहेत.तसेच विविध विकासात्मक कामातील पुरस्कार प्राप्त गावांचा ही सन्मान करण्यात आला.यात नगर परिषद भोकर,स्मार्ट व्हिलेज हाडोळी,नारवट,नागापूर व खडकी या गावांचा समावेश होता.तर ज्यांनी आपल्या जीवनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय लोकोपयोगी कार्य केले व करत आहेत अशा श्रीमती प्रभावती खांडेकर,अवर सचिव राजेंद्र खंदारे,डाॅ. राजारेड्डी गोपीडवाड(गोपीडी) किनीकर,प्रगतशिल शेतकरी गंगाधरराव हनमानगे,सेवाभावी नामदेव गोडबोले यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना अवर सचिव राजेंद्र खंदारे म्हणाले की,आपल्या पूर्वजांचा उज्वल वसा सर्वांनी जपून त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शाचा इतिहास समोर ठेवून प्रत्येकाने कामे केल्यास आपल्या सर्वांचा विकास सहज होणे शक्य आहे.आपल्या पूर्वजांनी व साधुसंत ऋषीमुनींनी ” एक मेका साह्य करू अवघा धरू सुपंथ ” हा वसा आपणास देऊन प्रगतीचा मार्ग खुला करून दिला आहे.तेव्हा सर्वांनी याच मार्गाने वाटचाल केल्यास आपला,समाजाचा व आपल्या राष्ट्राचा सर्वांगीण विकास होऊ शकतो.भोकर तालुक्यातील विविध सेवाभावी संस्था,सेवाभावी लोक, ग्रामविकासाचा वसा घेतलेली गावे,कष्टातून नवनिर्माण करणारा शेतकरी वर्ग,जिद्दीने यशाची शिखरे पादाक्रांत करणारे जिज्ञासू विद्यार्थी,पत्रकार बांधव,आपल्या पाल्यासाठी अतोनात कष्ट घणारे पालक,आपल्या कार्यात सदैव दक्ष असणारा कर्मचारी वृंद याच्या अथक परिश्रमातूनच उद्याचा नावीण्यपुर्ण भारत देश निर्माण होत आहे.तेव्हा या सर्व घटकांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.या राष्ट्राच्या नवनिर्माण कार्यात झटत असलेल्या सर्व घटकांचा भोकर विचार विकास मंचनी गौरव सोहळा आयोजित करून सर्वांसाठी एक नवा प्रेरणास्त्रोत निर्माण केला आहे,असे ही ते म्हणाले.

तर ग्रामीण कवी शंकर वाडेवाले यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावरील वास्तव जीवन प्रकट करणाऱ्या कविता आपल्या ओजस्वी वाणीतून सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.तसेच प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी हे पुढे बोलतांना म्हणाले की,संत साहित्य व विज्ञानवादी साहित्याचे वाचन केले पाहिजे.वाचनाची कास धरून चांगल्या साहित्याचा सदैव अभ्यास करावा,विशेष करून संत साहित्य आत्मसात करावे.यातून आध्यात्मिक व आधुनिक तंत्रज्ञानाला योग्य दिशा मिळते.वाचनातूनच माणसाला आत्मिक बळ मिळू शकते व हे बळ ‘धटिंगनाच्या’ विरोधात लढण्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा देते.याच बरोबर आपल्या मुलावर चांगले संस्कार कसे होतील याकडे ही लक्ष द्यावे व त्यांना चांगला माणूस म्हणून घडवावे,असे ही ते म्हणाले.तर अध्यक्षीय समारोपात डॉ.यु. एल.जाधव यांनी सदरील सन्मान सोहळा घेण्यामागची पार्श्वभूमी विषद केली.

या सोहळ्याचे प्रास्ताविक भोकर विचार विकास मंचचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.व्यंकट माने यांनी केले.तर सुरेख असे सूत्रसंचालन साहित्यिक चंदू चक्रवार यांनी केले आणि उपस्थितांचे आभार अ‍ॅड.शिवाजी कदम यांनी मानले. सदरील नाविण्यपूर्ण सन्मान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी भोकर विचार विकास मंचचे उपाध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड,सचिव डॉ.विठ्ठल माने,गजानन अडकिने आणि भोकर विचार विकास मंचाचे सर्व पदाधिकारी,भोकर व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,शहरातील प्रतिष्ठित नागरिक व आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.तर या सोहळ्यास भोकर शहर व शहरातील व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर,शेतकरी वृंद,कर्मचारी,पत्रकार बांधव, विद्यार्थी व पालक यांसह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !