Fri. Apr 18th, 2025
Spread the love

५ हजार रुपये स्विकारतांना त्यास भोकर पोलीसांनी रंगेहात पकडले

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : तालुक्यातील मातुळ ग्रामपंचायत अंतर्गतच्या विविध विकास कामांची माहिती माहिती अधिकारान्वये अर्जबाजारी करुन मागितली व त्या माहिती आधारे कामाच्या चौकशी बाबदची निवेदनबाजी करुन मातुळ येथील एका माहिती अधिकार (आर.टी.आय.) कार्यकर्त्याने ग्रामसेविकेस नाहक त्रास देऊन धमकावून पैशाची मागणी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि १० हजार रुपये उकळले.यानंतर थेट ५० हजाराची मागणी करुन धमकावले व त्यातील ५ हजार रुपये स्विकारतांना भोकर पोलीसांनी साफळा रचून त्यास रंगेहात पकडले.याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,धमकावणे व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की,मौ.मातुळ ता. भोकर येथील रहिवासी अमृता आनंदा जाधव याने माहिती अधिकार कायद्यान्वये अर्जबाजारी करुन मातुळ ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध विकास कामासंदर्भातची माहिती तेथील सेवारत महिला ग्रामसेविकेस नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने मागितली.त्यास ती माहिती प्राप्त झाल्यावर त्याने त्या ग्रामसेविकेस त्रास देण्याच्या व पैसे मागण्याच्या उद्देशाने त्या कामाची चौकशी करण्यात यावी म्हणून भोकर पंचायत समिती कार्यालय,भोकर तहसिल कार्यालय,भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदनबाजी केली.तर दि.२५ ऑक्टोबर २०२२ रोजी सदरील ग्रामसेविका ही मातुळ ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करीत असतांना ती एकटीच अल्याचे पाहून त्याने ग्रामसेविके विरुद्ध दिलेले तक्रारी निवेदने माघारी घेतो म्हणून १० हजार रुपयाची मागणी केली.त्या मागणीस नकार मिळाल्याने त्याने अश्लील शिविगाळ करत तेथील टेबलवर खुर्चीची आदळ आपट केली व तू पैसे न देता बाहेर कशी जातेस म्हणत दार लावून त्याने धमकावले आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.त्याच्या या त्रासास कंटाळलेल्या व घाबरलेल्या ग्रामसेविकेने त्यास १० हजार रुपये दिले व आपली सुटका करुन घेतली.

यानंतर दि.२७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याने भोकर पंचायत समिती कार्यालय गाठले व तेथे शासकीय काम करत असलेल्या त्या ग्रामसेविकेस अश्लील शिविगाळ करत धमकावत उघड उघड ५० हजार रुपयाची मागणी केली.तसेच ती रक्कम दिली नाही तर तुझ्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक(अ‍ॅट्रॉसिटीचा) कायदा कलमान्वये खोटा गुन्हा दाखल करतो व तुझी बदनामी करतो आणि तुझ्या विरुद्ध उपोषणास बसतो म्हणून धमकावले.त्यानंतर वारंवार माहिती अधिकाराखाली माहिती मागून तुला त्रास देतो व तु काम कशी करतेस ते पाहतो,असे म्हणून धमकावून तो तेथून निघून गेला.यावेळी तेथे उपस्थित असलेल्या ऑपरेटर नितीन दुधारे यांनी ५० हजार रुपयाची मागणी करत असलेल्या अमृता आनंदा जाधवच्या संभाषणाचे व्हिडीओ चित्रीकरण देखील केले.झालेल्या व होत असलेल्या नाहक त्रासाबद्दल सदरील ग्रामसेविकेने आपल्या वरिष्ठांना माहिती दिली व दि.२८ ऑक्टोबर २०२२ रोजी भोकर पोलीसात याबाबद रितसर फिर्याद दिली.असे असतांनाही त्याने फोन वरुन संपर्क करुन ग्रामसेविकेस धमकावले व पैशाची मागणी चालूच ठेवली. याबाबदची माहिती ग्रामसेविकेने पोलीसांना दिल्यावरुन भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना (आय.पी.एस.) व पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.दिगांबर पाटील व दोन पोलीस कर्मचा-यांनी साफळा रचून दि.२९ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे संबंधित ग्रामसेविकेने दिलेले ५ हजार रुपये स्विकारतांना सरकारी पंचांसमक्ष त्यास रंगेहात पकडले.तसेच मातुळ येथे सेवारत असलेल्या माधवी मनोहर जाधव या ग्रामसेविकेने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरुद्ध गुरनं. ४०७/२०२२ कलम ३५३,३८४, ३८५,५०६ भादवि प्रमाणे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्यास अटक करण्यात आली असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि.दिगांबर पाटील हे करत आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !