२०१० पासून सेवामुक्त केलेल्या राज्यातील माजी होमगार्डना पुन्हा सेवेत घेणार
पोलीस महासंचालक तथा होमगार्ड महासमादेशक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी दिली ही दिवाळीची स्नेह भेट
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : वेगवेगळ्या कारणांमुळे सन २०१० पासून सेवा समाप्त केलेल्या माजी होमगार्ड यांना पूर्ववत सेवेत घेण्याचे आदेश पोलीस महासंचालक तथा होमगार्डचे महासमादेशक डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांनी दिले असून ‘दिवाळी गिफ्ट’ च्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो होमगार्डची दिवाळी आता गोड होणार आहे.
साप्ताहिक कवायत बंदोबस्ताची अनियमित उपस्थिती व अन्य कारणांमुळे राज्यातील हजारो होमगार्ड यांना अपात्र ठरवून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.’निष्काम सेवा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या होमगार्ड संघटनेत अपात्र ठरलेल्या सर्व होमगार्ड यांना पुन्हा सेवेची संधी देण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून राज्यभर धरणे,मोर्चा,उपोषण आदी आंदोलने करण्यात आली होती.तसेच माजी होमगार्ड यांनी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली होती.
अ.भा.होलार समाज महासंघाचे नेते अॅड.माणिकराव भडंगे व मुंबईचे मानसेवी अधिकारी दीपक कांबळे यांनी पुढाकार घेऊन पोलीस महासंचालक तथा होमगार्ड महासमादेशक डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन होमगार्डच्या मागण्यांवर त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.तसेच वारंवार त्याचा पाठपुरावा करणे सुरुच आहे.जुलै २०१५ पासून सेवा समाप्त झालेल्या माजी होमगार्ड यांना काही अटीच्या अधीन राहून पुनश्च सेवेत घेण्याचे आदेश मार्च २०२२ मध्ये पोलीस महासंचालक तथा होमगार्ड महासमादेशक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी दिले होते.त्यानंतर राज्यभरात हजारो होमगार्डच्या समायोजनाची प्रक्रिया पार पडली होती. जुलै २०१५ ऐवजी जानेवारी २०१० नंतर सेवा समाप्त झालेल्या माजी होमगार्ड यांना पुनश्च सेवेत घेण्यात यावे अशी मागणी माणिकराव भडंगे व दीपक कांबळे यांनी पोलीस महासंचालक डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांच्याकडे केली होती.तसेच नुकतीच त्यांनी उपाध्याय यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा देखील केली होती.त्यानंतर नुकताच दि.२३ ऑक्टोबर २०२२ रोजी होमगार्ड मुख्यालयाने आदेश जारी केला असून त्यात जानेवारी २०१० पासून सेवा समाप्त झालेल्या होमगार्ड यांना काही अटीच्या अधीन राहून संघटनेत सामावून घेण्याबाबत जिल्हास्तरावर कार्यवाही करण्यात यावी असे म्हटले आहे.
तसेच त्या निर्णयात ज्या माजी होमगार्डच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील व बेशिस्तीचे वर्तन असेल यावरुन सेवा समाप्त केली असल्यास त्यांच्या विनंती अर्जाचा विचार करू नये असे नमूद करण्यात आले आहे.याच बरोबर सेवेत समाविष्ठ करण्याची कार्यवाही करताना जिल्हा कार्यालयांनी त्यांच्या पटावरील होमगार्डचा अनुशेष शिल्लक असल्याची खात्री करून सेवा जेष्ठतेनुसार माजी होमगार्ड यांना संघटनेत सामावून घेण्याबाबतची कार्यवाही करावी,असे पोलीस महासंचालक तथा होमगार्ड महासमादेशक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी आदेशात नमूद केले आहे.
नांदेडमध्ये मिठाई वाटून या निर्णयाचे केले स्वागत
या निर्णयाची माहिती समजताच अनेक माजी होमगार्ड यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.ऐन दिवाळीत मिळालेली ही बंपर ‘दिवाळी स्नेह भेट’ असल्याची प्रतिक्रिया होमगार्ड मधून व्यक्त होत असून माजी वरिष्ठ पलटन नायक एम.आर.मल्लेवार, शेख अब्दुल अकबर,प्रकाश सुर्यवंशी, रामदत्त चंदेल,विखायतउल्ला अखिलउल्ला,सखाराम अटकोरे,सुरेखा मल्लेवार यांनी उपरोक्त मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे अॅड.माणिकराव भडंगे,दीपक कांबळे यांचे आभार मानले आहेत.