साहेब ‘त्या गुढ आवाजाचे गुढ काय?’ हे उलगडा हो!
भुगर्भातील ‘त्या गुढ आवाजाने’ भयभित झालेल्या पांडुरणेकरांनी जिल्हाधिकारी यांना घातले साकडे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : तालुक्यातील पांडुरणा,बोरवाडी,समंदरवाडी व गारगोटवाडी परिसरात दि.२३ ऑगस्ट पासून सातत्याने भुगर्भातून गुढ आवाज येत आहेत व जमीनेचे कंपने जाणवत आहेत.त्यामुळे नागरिकांत हे आवाज भुकंपाचे तर नव्हेत ? असा समज झाला असून भितीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे पावसाची तमा न बाळगता भयभित नागरीक घराबाहेर रात्र जागून काढत आहेत.महसूल विभागाचे अधिकारी,भुजल सर्वेक्षण विभाग आणि अन्य काही तज्ञांनी येथे भेटी दिल्यात,परंतू त्या गुढ आवाजांचे ‘गुढ काय?’ हे कोडे अद्याप तरी उलगडलेले नसल्याने दि.४ ऑक्टोबर रोजी पांडुरणा येथील सरपंच व भयभित झालेल्या नागरीकांच्या एका शिष्टमंडळाने नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन भुवैज्ञानिकांना पाचारण करावे व ‘त्या गुढ आवाजांचे गुढ काय ?’ हे कोडे लवकरात लवकर उलगडण्यात यावे अशी आर्त हाक देत निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
उपरोक्त उल्लेखीत गाव व परीसरात दि.२३ ऑगस्ट २०२२ रोजी पासून ते दि.३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ही भुगर्भातून गुढ आवाज येण्याची आणि जमीनीस कंपने येण्याची मालीका सातत्याने सुरुच आहे.प्र.उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे व तालुका प्रशासन या गावांना वेळोवेळी भेटी देऊन नागरिकांना धिर देत आहे. दरम्यानच्या काळात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या तज्ञ प्राद्यापकांना याबाबतची माहिती तालुका व जिल्हा प्रशासनाने दिली असता विद्यापीठातील भुकंम मापक यंत्रावर याबाबद कसलीही नोंद झाली नसल्याने हे गुढ आवाज भुकंपाचे नव्हेत असे सांगण्यात आले आहे. तसेच भूजल शास्त्रीय पाहणीच्या अनुषंगाने भूजल व कंपन निगडीत बाबीसाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तज्ञांनी त्या गुढ आवाजांचा अभ्यास करण्यासाठी या गावांना भेटी दिल्या आहेत.त्यांच्या अभ्यासानुसार ते गुढ आवाज भुकंपाचे नव्हेत,त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये असे सांगण्यात येत आहे.
असे सांगुन धगर दिला जात असला यरी दि.३ ऑक्टोबर २०२२ रोजी या गाव व परिसरात ‘त्या गुढ आवाजांची’ मालीका सुरुच राहिली.त्यामुळे भयभित झालेल्या नागरिकांनी घराबाहेर अख्खी रात्र जागुन काढली.तसेच हे गुढ आवाज नेमके कशाचे आहेत ? याचा उलगडा होणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे दि.४ ऑक्टोबर २०२२ रोजी पांडुरणा गावचे सरपंच प्रतिनिधी बालाजी दासरवाड, उपसरपंच भटू आडे,ग्रा.पं.सदस्य केशव निमलवाड,सुनिल मदनवाड,माधव शिंदे,नवनाथ झंपलवाड,कमलाकर बरकमकर यांसह आदी नागरिकांच्या शिष्टमंडळाने नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली व त्या गुढ आवाजांविषयीची माहिती दिली.तसेच त्या ‘गुढ आवाजाचे गुढ काय आहे ?’ हे कोडे लवकरात लवकर उलगडण्यात यावे अशी विनंती एका निवेदनाद्वारे केली.यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्या गुढ आवाजाबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासन भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण,नागपूर,राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थान हैद्राबाद व नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी कोलकत्ता या केंद्रीय संस्थेचे सहकार्य घेणार असून तसा पत्रव्यवहार मी करत आहे असे सांगून शिष्टमंडळास धिर दिला.तसेच मी दोन दिवसात आपल्या या गावांना भेट देऊन आढावा घेणार आहे, असे सांगुन त्यांनी या शिष्टमंडळास आश्वस्त केले आहे.