श्री दुर्गादेवी उत्सवानिमित्त भोकर पोलीसांनी केले पथसंचलन
अफवांवर विश्वास ठेऊ नये व अफवा पसरवू नये,करण्यात आले आवाहन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : श्री दुर्गादेवी उत्सव व दुर्गादेवी मुर्ती विसर्जन कार्यकाळा दरम्यान कायदा,शांतता व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने भोकर पोलीसांनी दि.२६ सप्टेंबर रोजी शहरातील मुख्य रस्त्याने पथसंचलन कले असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व अफवा पसरविणा-यास प्रतिबंध घालावा असे आवाहन पो.नि.विकास पाटील यांनी केले आहे.
श्री दुर्गादेवी उत्सव व दुर्गादेवी मुर्ती विसर्जन हे शांततेत आणि आनंदोत्सवात साजरा होत असतांना पोलीस संरक्षणाचे पाठबळ अत्यंत महत्वाचे असते.त्यांच्या संरक्षण सेवेमुळेच अनेक कार्यक्रम व उपक्रम बिनधास्तपणे राबविले जातात.सण उत्सवात पोलीस बांधव नागरिकांना सदैव संरक्षण सेवा देत असतात.परंतू दरम्यानच्या काळात काही अपप्रवृत्ती या शांतता भंग करण्याचे प्रकार करण्याचा प्रयत्न करत असतात.त्या अपप्रवृत्तीवर वचक रहावी,आळा घालता यावा व कायदा,शांतता आणि सुव्यवस्थेसाठी शांतताप्रिय नागरिकांसोबत पोलीस विभाग सदैव आहे हे दर्शविण्यासाठी पोलीसांचे पथसंचलन केले जाते.त्याच अनुशंगाने दि.२६ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस ठाणे येथून भोकर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पवार कॉलनी,श्री बालाजी मंदीर,मोंढा फरिसर,किनवट रोड, सराफा गल्ली, म.गांधी चौक,महादेव मंदिर ते पोलीस ठाणे या मुख्य रस्त्याने भोकर पोलीसांनी पथसंचलन केले.या पथसचलनात ४ पोलीस अधिकारी, १७ अमलदार व २६ होमगार्ड यांचा समावेश होता.

अफवांवर विश्वास ठेऊ नये व अफवा पसरवू नये,करण्यात आले आवाहन
सण,उत्सव,आनंदोत्सवात साजरे होत असतांना काही लोक समाज माध्यमांवरुन तर काही लोक समज गैरसमजातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अफवा पसरवितात व काही लोकांनी त्या अफवांवर विश्वास ठेवल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते.तसेच दरम्यानच्या काळात जिल्ह्यात ‘लहान मुले पळविणारी टोळी’ आली आहे.अशा अफवा पसरविल्या जात आहेत.परंतू यात सत्यता नाही,तरी पण कोणी अनोळखी व संशयीत व्यक्ती अनुचित प्रकार करतांना कोणास आढळ्यास किंवा पाहण्यात आले तर त्यास कोणीही इजा न करता थेट ११२ क्रमांकावर फोन करुन पोलीसांशी संपर्क साधावा आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळावा.एकूणच अफवांवर विश्वास ठेऊ नका व पसरविणा-यांवर आळा घालावा,असे आवाहन ही पोलीस जिप वरील ध्वनिक्षेपकावरुन भोकर पोलीसांनी या पथसचलना दरम्यान केले आहे.