भोकर न.प.राज्यात प्रथम येण्यासाठी पुढे जिद्दीने काम करु-मुख्याधिकारी प्रियंका टोंगे
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात भोकर नगर परिषदेला मिळाला राज्यात सातवा,तर मराठवाड्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
…ही बाब अभिनंदनिय,परंतू या ‘पुरस्काराचा तिरस्कार!’ का ?
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नागरी वसाहतीमध्ये स्वच्छतेचे महत्व लोकांपर्यंत जावे यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू केले होते.त्यात भोकर नगर परिषदेने सन २०२१-२२ चा स्वच्छतेचा राज्यातून सातव्या व मराठवाड्यातू प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे.दि.१ ऑक्टोबर २०२२ रोजी दिल्ली येथे महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन भोकर नगर परिषदेला सन्मानित करण्यात येणार आहे.भोकर नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी व भोकर शहरवासियांसाठी ही बाब अभिमानाची असल्यामुळे मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.परंतू काही जणांकडून या ‘पुरस्काराचा तिरस्कार’ केला जात असल्याने आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की,केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जे काही निकष ठरवून दिले होते. त्या निकषांची पुर्तता करण्याचा आम्ही जो प्रयत्न केला आहे,त्या आधारेच हा पुरस्कार घोषित झाला आहे.या उपरोक्त काही त्रुट्या राहिल्या असतीलही,ते आम्ही नाकारत नाही.तर पुढील काळात मोठ्या जिद्दीने काम करुन त्या त्रुट्या दुर करण्याचा आम्ही प्रयत्न करु व भोकर नगर परिषद राज्यात प्रथम कशी येईल त्या दिशेने जिद्दीने काम करु,अशी ग्वाही मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी दिली आहे.
स्वच्छतेचे महत्व लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१६-१७ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे.या अभियानांतर्गत देशातील महानगरपालिका,नगरपालिका,नगर परिषदा,नगरपंचायती यांनी वर्षभर राबविलेल्या स्वच्छता अभियानावर आधारित ठरवून दिलेल्या काही निकषांनुसार प्राप्त गुणांकनातून त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.त्याच निकषांच्या अनुशंगाने स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१-२२ करीता करण्यात आलेल्या परीक्षणातून राज्यातील २३ नगरपालिकांना विविध पुरस्कार घोषित झाले आहेत.त्यात भोकर नगर परिषदेला राज्यातून सातवा व मराठवाड्यातू प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला आहे.तर नांदेड जिल्ह्यातला हा अशा प्रकारचा पहिलाच पुरस्कार आहे.दि.१ ऑक्टोबर २०२२ रोजी दिल्ली येथील ताल कोटरा स्टेडियमवर महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते देशातील विजेत्या नगरपालिकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.सदरील पुरस्कार स्विकारण्यासाठी मुंबई मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील अवर सचिव तथा भोकर नगर परिषदेचे तत्कालीन प्रशासक राजेंद्र खंदारे,तहसिलदार तथा विद्यमान प्रशासक राजेश लांडगे,मुख्याधिकारी प्रियंका टोंगे व काही स्वच्छता कर्मी दिल्ली येथे जाणार आहेत.
भोकर नगर परिषदेला हा बहुमानाचा पुरस्कार मिळत असल्याने मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आम्ही अभिनंदन केले आहे व त्या पुरस्काराबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी म्हटले आहे की,केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठरवून दिलेल्या निकषात भोकर नगर परिषद कशाप्रकारे परिपुर्ण ठरेल यासाठी स्वच्छता कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत.तसेच भोकर शहरवासियांनी देखील मोलाचे सहकार्य केलेले आहे.त्या सर्वांच्या परिश्रम व सहकार्यामुळेच आज हा बहुमानाचा पुरस्कार मिळत आहे.त्यासाठी मी सर्व कर्मचारी,नागरिक व ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले आहे त्यांना धन्यवाद देते आणि हार्दिक अभिनंदन ही करते,असे ही त्यांनी म्हटले आहे.तर शहरातील काही नागरिक व पक्ष पदाधिकाऱ्यांकडून समाज माध्यमांवरुन या पुरस्काराच्या अनुशंगाने विरोधी प्रतिक्रिया येत असल्याबाबद त्यांना विचारलो असता त्यांनी म्हटले आहे की,सदरील पुरस्कार प्राप्तीसाठी काही निकष असतात जसे की,स्वच्छता अभियानासाठी जनजागृती झाली आहे काय ? शहर हागंदरी मुक्त आहे काय ? मलनिसारण व्यवस्था आहे काय ? घणकचरा गोळा करण्यासाठी शहरात घंटागाडी फिरते काय ? यासह आदी.त्या निकषांत भोकर नगर परिषदेला जे गुण प्राप्त झालेत.त्या गुणांकनानुसारच हा पुरस्कार मिळाला आहे.आम्ही म्हणत नाही की,शंभर टक्के स्वच्छतेचे काम झालेले आहे,काही त्रुट्या नक्कीच राहिल्या आहेत.त्या त्रुट्या दुर करण्यासाठी पुढील काळात नक्कीच आमचा प्रयत्न राहणार आहे.भोकर नगर परिषदेला हा बहुमानाचा पुरस्कार मिळाला असल्याने आम्हास याचा खुप आनंद झाला असून शहरातील नागरिकांचा आनंद पुढे द्विगुणित करण्यासाठी आमचा अधिक प्रयत्न असेल,असेही त्यांनी म्हटले आहे.

…ही बाब अभिनंदनिय,परंतू या ‘पुरस्काराचा तिरस्कार!’ का ?संपादक
भोकर नगर परिषद अस्तित्वात आली व दि.१० मे २०१० रोजी या नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि सदस्य मंडळ विराजमान झाले.ही नगर परिषद माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार अशोक चव्हाण यांच्या मतदार संघात व एकहाती सत्तेच्या अधिपत्याखाली असल्यामुळे त्यांनी विकासात्मक कामांसाठी ‘निधीचा पूर’ येथे वळविला. परंतू भोकर नगर परिषदेच्या १० वर्षांच्या कार्यकाळात काही विकास कामांत भ्रष्टाचार झाल्याचे अनेक प्रकरणे गाजली आहेत.विशेषतः अग्निशमन नौकर भरती व धनकचरा व्यवस्थापन आणि डंपिंग ग्राऊंड च्या प्रकरणात काही नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल झाली.तर एका नगराध्यक्षांसह मुख्याधिका-यांना देखील कारागृह वारी करावी लागली आहे.त्यामुळे सदरील नगर परिषदेची ‘माया नगरी’ ही भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा समज जनतेत रुजला आहे.तसेच त्या भ्रष्टाचारामुळेच अद्यापही घनकच-याचा प्रश्न पुर्णपणे सुटलेला नाही.काही गल्लीबोळात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून डंपिंग ग्राऊंडचा ही अभाव आहे.हे वास्तव कोणीही नाकारु शकत नाही.आम्ही देखील नाकारत नाही. यास जबाबदार असलेल्या त्या पदाधिकारी व अधिका-यांविषयी भोकरच्या नागरिकांतून सातत्याने रोष व्यक्त होत असतो.त्याच अनुशंगाने सदरील पुरस्कार घोषणेचा काही नागरिक व पक्ष पदाधिकाऱ्यांतून रोष व्यक्त होतांना समाज माध्यमांवरुन पहावयास मिळत आहे.नव्हे तर या ‘पुरस्काराचा तिरस्कार’ केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे…पुरस्काराची बाब अभिनंदनिय,परंतू या ‘पुरस्काराचा तिरस्कार!’ का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सन २०२०-२१ हा कालावधी कोरोना प्रादुर्भावाच्या संकटाशी सामना करण्यात गेला आहे.दि.९ मे २०२० रोजी नगराध्यक्ष व सदस्य मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्याने दरम्यानच्या काळात नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आणि अद्यापही नियुक्ती आहे.एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असलेले तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी प्रियंका टोंगे व स्वच्छता कर्मचारी यांसह आदींनी केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांत सहभाग घेऊन निकषात बसतील असे काही प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले आहेत.त्यामुळेच सदरील पुरस्कारास ही नगर परिषद पात्र ठरली आहे.ही भोकर शहरातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. म्हणून उपरोक्त अधिकारी,कर्मचारी व या अभियानात सहकार्य करणारे नागरिक यांचे कौतुक तथा अभिनंदन केलेच पाहिजे.आणि पुरस्काराचा तिरस्कार करण्या ऐवजी नागरिकांनी व त्या पक्ष पदाधिक-यांनी भोकर शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसे होईल याचा विचार करुन आगामी निवडणूकीत ‘त्या’ भ्रष्ट लोकांना निवडून दिले नाही पाहिजे.तरच या पुरस्काराचा विरोध करणे उचित ठरेल अन्यथा नाही ! असे आमचे मत आहे.
उत्तम बाबळे,संपादक