भोकर येथील जेष्ठ समाजसेवक लालबाजी वाघमारे यांचे दु:खद निधन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महात्मा फुले नगर,भोकर येथील शिव-लहु-फुले-शाहू-आंबेडकर-अण्णा भाऊ यांचे विचार अनुयायी व मातंग समाजातील जेष्ठ सामाजसेवक लालबाजी कृष्णाजी वाघमारे (९९) यांचे वृधापकाळी आजाराने दि.२१ सप्टेंबर रोजी दुपारी २:३५ वाजताच्या दरम्यान राहते घरी दु:खद निधन झाले असून भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बांधकाम कंत्राटदार नामदेव वाघमारे यांचे ते वडील होत.
तालुका व जिल्ह्यातील जुन्या फळीतले आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ समाजसेवक म्हणून सर्व परिचित असलेल्या लालबाजी वाघमारे यांनी परिवर्तवादी चळवळ येथे रुजवून अंधश्रद्धा निर्मुलन मोहिमेत मोठा सहभाग घेऊन अनेक पोतराजांचे केस कापले व वाजंत्री डफढी फोडून अनिष्ठ रुढी परंपरेतून त्या समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणले.समाजातील गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून भोकर येथे पहिली बालवाडी काढणारे मातंग समाजातील ते पहिले नेते होत.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या निर्मितीसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता.तसेच मांगदरा (सिद्धार्थ नगर)ता.भोकर हे गाव वसवण्यासाठी त्यांनी संघर्षमयी अनेक परिश्रक्ष घेतले. यामुळे त्यांना तुरुंगवास ही करावा लागला.जेष्ठ समाजसेवक स्व. वामनराव बाबळे यांच्या सारखे त्यांचे काही सहकारी होते.अशा सहका-यांना सोबत घेऊन त्यांनी मातंग समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधी अनेक लढे लढले.तसेच याच सहका-यांना सोबत घेऊन भोकर येथील आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्यांची भव्य जागा धरण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.अशा अनेक प्रकारे त्यांनी समाजोन्नतीसाठी विविध आंदोलनात सहभाग घेऊन अमुल्य योगदान दिले आहे.राजीव गांधी निराधार योजनेच्या शासकीय समितीचे सदस्य राहून त्यांनी अनेक निराधारांना न्याय देण्याचे काम केले आहे.स्व.आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर व स्व.माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची राजकीय ओळख आहे.

गेल्या तीन वर्षापूर्वी त्यांचा अपघात झाला होता.तेंव्हा पासून ते आजारी होते.वृधापकाळीच्या या आजारात आज दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे दुपारी २:३५ वाजताच्या दरम्यान राहत्या घरी महात्मा फुलेनगर भोकर येथे त्यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा,३ मुली,२ सुना, पुतणे,जावई,नातू,पंतू असा मोठा परिवार आहे.उद्या दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता वैकुंठधाम हिंदू दहनभुभी,भोकर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जेष्ठ समाजसेवक समाज भुषण लालबाजी वाघमारे यांच्या निधनाने आमचा एक मार्गदर्शक आम्ही गमावला असून सामाजिक क्षेत्रातील मोठे आधारवड कोसळले आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.वाघमारे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दु:खात संपादक उत्तम बाबळे व परिवार सहभागी आहे.स्व.लालबाजी वाघमारे यांना विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!
