श्रेयवाद ? ‘लिलाव शेड’ आ.अशोक चव्हाण यांच्या विकास निधीतून नव्हे तर…
डॉ.शंकरराव चव्हाण कृ.उ.बा.समिती भोकरचे ‘लिलाव शेड’ बाजार समितीच्या उत्पन्नातूनच उभारले जात असल्याने माजी सभापतींनी दिशाभुल करु नये-संचालक गणेश कापसे पाटील
‘लिलाव शेड’ बाजार समितीच्या उत्पन्नातूनच ; परंतू पत्रकबाजी करुन आ.अशोक चव्हाण यांची कोणीही बदनामी करु नये-माजी सभापती जगदीश पाटील भोसीकर
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकरच्या व्यापारपेठ मोंढा क्षेत्रात शेतकरी व व्यापाऱ्यांचा शेतीमाल सुरक्षित रहावा यासाठी १ कोटी ६४ लाख रुपये खर्चुन ‘लिलाव शेड’ उभारण्यात आले असून ते पुर्णत्वास येत आहे.हे ‘लिलाव शेड’ बाजार समितीच्या उत्पन्नातून होत असतांना देखील माजी सभापतींनी ते आमदार अशोक चव्हाण यांच्या विकास निधीतून उभारल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमात देऊन केवळ श्रेयासाठी दिशाभुल केल्याचा व त्या शेडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप भाजपाच्या एका बाजार समिती संचालकाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.तर हे ‘लिलाव शेड’ बाजार समितीच्या उत्पन्नातूनच होत आहे,परंतू पत्रकबाजी करुन आमदार अशोक चव्हाण यांची बदनामी कोणीही करु नये,असे विनंतीपर आवाहन माजी सभापतींनी केले असून ‘लिलाव शेड’ च्या श्रेय वादातून माजी सभापती व संचालक यांच्यातील एक नवा वाद चव्हाट्यावर आला आहे.
डॉ.शंकरराव चव्हाण कृ.उ.बा.समिती भोकरचे ‘लिलाव शेड’ बाजार समितीच्या उत्पन्नातूनच उभारले जात असल्याने माजी सभापतींनी दिशाभुल करु नये-संचालक गणेश कापसे पाटील
डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर च्या मोंढा व्यापार पेठेत तेलंगणा राज्यातून देखील शेती उत्पन्न माल मोठ्या प्रमाणात येतो.परंतू हा माल उघड्यावर ठेवला जात होता व लिलाव ही तेथेच होत होता.उघड्यावरचा हा शेती उत्पन्न माल पाऊस,वारा आदींमुळे असुरक्षित होता. महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सिमेवरील या ‘श्रीमंत’ बाजार समितीवर माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधान सभेचे आमदार अशोक चव्हाण यांची एक हाती सत्ता होती.त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांचा शेती उत्पन्न माल सुरक्षित रहावा आणि त्या मालाचा लिलाव ही त्या ठिकाणी व्हावा या उद्देशाने व्यापाऱ्यांनी आ.अशोक चव्हाण यांच्याकडे ‘लिलाव शेड’ उभारण्यात यावा अशी मागणी केली होती.त्या अनुशंगाने १ कोटी ६४ लाख रुपये खर्च करुन बाजार समितीच्या मोंढा व्यापार पेठ क्षेत्रात एक भव्य ‘लिलाव शेड’ उभारण्यात येत असून ते लवकरच पुर्णत्वास येणार आहे.या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ नुकताच संपला आहे व प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्तीची प्रक्रीया सुरु आहे.याच दरम्यान काही प्रसिद्धी माध्यमांवरुन ते ‘लिलाव शेड’ आ.अशोक चव्हाण यांच्या ‘विकास निधीतून’ उभारले गेले असल्याचे प्रसिद्धी माध्यमांतून समोर आल्याने माजी सभापती जगदीश पाटील भोसीकर हे चुकीची माहिती देऊन केवळ श्रेयासाठी दिशाभुल करत असल्याचा आरोप भाजपाचे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष तथा या बाजार समितीचे माजी संचालक गणेश कापसे पाटील बटाळकर यांनी केला आहे.याविषयी त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की,आ. अशोक चव्हाण यांनी या शेडसाठी त्यांच्या विकास निधीतून १० लक्ष रुपये देण्याची घोषणा केली होती.परंतू तो निधी दिला नसून हे ‘लिलाव शेड’ उभारण्यात त्यांच्या विकास निधीचे योगदान नाही.तर शेतकरी,व्यापारी यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या कर वसूलीतून व व्यापारी गाळे विक्रीतून प्राप्त झालेल्या आणि गाळे भाडे रक्कमेतून अर्थातच बाजार समितीच्या उत्पन्नातून १ कोटी ६४ लाख रुपये खर्च करुन हे ‘लिलाव शेड’ मोंढा व्यापार पेठेत उभारले जात आहे.तसेच या ‘लिलाव शेडचे’ काम एका मर्जितल्या कंत्राटदारास दिले असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचेही त्यात म्हटले आहे.एकूणच हे ‘लिलाव शेड’ बाजार समितीच्या उत्पन्नातूनच उभारले जात असल्याने माजी सभापतींनी श्रेयासाठी दिशाभुल करु नये,असे ही त्यांनी म्हटले आहे.
‘लिलाव शेड’ बाजार समितीच्या उत्पन्नातूनच ; परंतू पत्रकबाजी करुन आ.अशोक चव्हाण यांची कोणीही बदनामी करु नये-माजी सभापती जगदीश पाटील भोसीकर
याच अनुशंगाने माजी सभापती जगदीश पाटील भोसीकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,माजी मुख्यमंत्री तथा आमदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही काँग्रेस पक्षाचे काम करतोत.विकास कामांबाबत त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे.लिलाव शेड व्हावा अशी व्यापाऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती.बाजार समिती क्षेत्रात अशा प्रकारे विकासात्मक कामे व्हावेत म्हणून आ.अशोक चव्हाण यांनी संचालक मंडळास सुचविल्यावरुन संचालक मंडळाने सर्वानुमते ठराव घेतला व शेतकरी आणि व्यापारी यांचा शेती उत्पन्न माल सुरक्षित रहावा या उद्देशाने १ कोटी ६४ लाख रुपये खर्चुन हे ‘लिलाव शेड’ उभारण्यात येत आहे.या ‘लिलाव शेडचे’ भुमिपूजन तत्कालीन पालकमंत्री तथा आ. अशोक चव्हाण यांच्या हस्तेच करण्यात आले आहे.परंतू हे ‘लिलाव शेड’ त्यांच्या विकास निधीतून नव्हे तर शेतकरी, व्यापारी यांच्या कर भरणा वसूलीतून अर्थातच बाजार समितीच्या उत्पन्नातूनच उभारले जात आहे.अनावधाने काही प्रसिद्धी माध्यमांतून ‘आ.अशोक चव्हाण यांच्या विकास निधीतून’ हे उभारले जात आहे,असे प्रसिद्धीस आले आहे ? परंते अशी प्रसिद्धी देण्या माघे आमचा कसलाही अन्य हेतू नाही.त्यामुळे आ.अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख करुन कोणीही पत्रकबाजी करु नये व त्यांची बदनामी करु नये,असे विनंतीपर आवाहन मी करतो असे ही त्यांनी म्हटले आहे.
‘लिलाव शेड’ चा श्रेयवाद आणि नुतन प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्तीचा वाद…
डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर च्या मोंढा व्यापार पेठेत महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातून शेतकऱ्यांचा शेती उत्पन्न माल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो.यातून शेतकरी व व्यापारी यांच्याकडून कर वसूली केली जाते.तसेच व्यापारी गाळे विक्री व भाडे यातून ही मोठे उत्पन्न बाजार समितीस मिळते.त्यामुळे या ‘श्रीमंत’ बाजार समितीवर आपली सत्ता असावी म्हणून अनेकजण प्रयत्नशील असतात.या बाजार समितीच्या कार्यालय व व्यापारी संकुलाची ३ मजली भव्य इमारत उभारतांना तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन करण्यात आले होते. यावेळी सत्ताधारी काँग्रेसचे संचालक व विरोधी भाजपा-शिवसेनेचे संचालक यांच्यात हे भुमिपूजन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत करण्यात यावे म्हणून मोठा वाद झाला होता.बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ गेल्या काही महिन्यापूर्वी संपलेला आहे.याच दरम्यान राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(भाजपा) यांच्या युतीचे सरकार आले आहे.या नुतन सरकारच्या माध्यमातून सदरील बाजार समितीवर भाजपाचे प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या नियुक्तीबाबदचा आक्षेप न्याय प्रविष्ट झाला असल्याचे बोलल्या जात आहे.असे असतांनाच कार्यकाळ संपलेल्या माजी सभापती व माजी संचालक यांच्यात हे ‘लिलाव शेड’ उभारण्यासाठी खर्च निधी कोणाचा ? असा श्रेयवाद समोर आला आहे.तर नुतन प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्ती प्रक्रीयेच्या आक्षेपातूनच हा नवा वाद समोर आला आहे,असे अनेकांतून बोलल्या जात आहे.परंतू हे ‘लिलाव शेड’ पुर्णत्वास येत असल्याने अनेक वर्षाची मागणी आ.अशोक चव्हाण यांच्या सुचनेवरुन पुर्णत्वास येत असून एक महत्वाचा प्रश्न सुटल्यामुळे व्यापाऱ्यांतून मात्र समाधान व्यक्त होत आहे.