एक वचनी निर्भिड लोकनेते मा.आ.बापूसाहेब गोरठेकर यांचे दुःखद निधन
गोरठा ता.उमरी येथे आज दुपारी ४:०० वाजता त्यांच्यावर होणार आहेत अंत्यसंस्कार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे आज सकाळी ११:०० वाजता श्रद्धांजली सभा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : जनसेवेसाठी सातत्याने झटणारा एक वचनी, निर्भिड,दबंग व झुंजार लोकनेता म्हणून ख्याती असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भोकर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे अल्पशः आजारात नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दु:खद निधन झाले असून गोरठा ता.उमरी येथे दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजकिय क्षेत्रात ८५% समाजकारण व १५% राजकारण ही परिभाषा प्रत्येक राजकिय व्यक्तींच्या बोलण्यातून दिसते. परंतू दिसते तसे नसते.१५% राजकारण म्हणनारे हे ५% ही समाजकारण करत नाहीत तर उलट ९५% राजकारण करतांना दिसतात.या परिभाषेला छेद देत बोले तैसा चाले… म्हणनारे बोटावर मोजण्या एवढेच काही अपवादात्मक लोक या क्षेत्रात असतात.त्यात आवर्जुन नामोल्लेख करावा असे व्यक्तीमत्व म्हणजे जनसेवेसाठी सातत्याने झटणारा एक वचनी,निर्भिड,दबंग व झुंजार लोकनेता म्हणून ख्याती असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर होत.त्यांना अचानक अस्वस्तता वाटू लागल्याने व प्रकृती खालावल्याने नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दि.२४ ऑगस्ट २०२२ रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दि.२४ ऑगस्ट २०२२ च्या मध्यरात्रीनंतर दि.२५ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १२:१५ वाजता दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याचे त्या खासगी रुग्णालयाच्या सुत्रांनी घोषित केले. त्यांचे दु:खद निधन झाल्याचे समजताच उमरी,भोकर,धर्माबाद,नायगाव यासह सबंध नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली.योगायोग म्हणजे दि.९ ऑगस्ट रोजी त्यांचा ७८ वा जन्मदिवस मोठ्या उत्सात साजरा करण्यात आला व याच महिन्यात दि.२५ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
आज दुपारी ४:०० वाजता गोरठा ता.उमरी येथे होणार अंत्यसंस्कार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष,नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पद भुषविणारे व भोकर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी केलेल्या निस्वार्थ जनसेवेमुळे आणि दिलेला शब्द पाळणारा एकवचनी दबंग लोकमान्य नेता म्हणून भोकर, उमरी,धर्माबाद,नायगाव तथा नांदेड जिल्ह्यात त्यांचा जनतेवर खुप मोठा प्रभाव असल्याने त्यांना मानणाऱ्या जनतेचे,कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे.निष्कलंक नेता म्हणून त्यांची जिल्ह्यात चांगलीच पकड होती.त्यामुळे भोकर,उमरी, धर्माबाद व आदी तालुक्यांसह नांदेड जिल्हा त्यांच्या जाण्याने मोठ्या नेतृत्वाला मुकला असून खुप मोठी राजकीय,सामाजिक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना चाहनारा,मानणारा वर्ग खुप मोठा असल्यामुळे त्यांना अंत्यदर्शन घेता यावे म्हणून त्यांचे पार्थीव गावी गोरठा ता. उमरी येथील घरी उद्या दुपारी ३:०० वाजता पर्यंत ठेवण्यात येणार आहे आणि दुपारी ४:०० वाजता गोरठा येथील त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे आज सकाळी ११:०० वाजता श्रद्धांजली सभा
जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील निष्कलंक,निस्वार्थी,धाडसी व्यक्तिमत्व,एक संघर्षयोद्धा,चारित्र्यवान,दिलेल्या शब्द पाळणारा,झुंजार लोकनेता स्व.बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना मानणारा वर्ग भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर व गोरठेकर मित्रमंडळाने आज सकाळी ११:०० डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे श्रद्धांजली तथा शोक सभेचे आयोजन केले आहे.या शोकसभेस बहुसंख्येने उपस्थित राहून लोकनेते स्व.बापूसाहेब देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गोरठा ता.उमरी येथे जावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर व गोरठेकर मित्र मंडळाच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.
स्व.बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या पुण्यात्म्यास निसर्ग निर्मिक शांती प्रदान करो व गोरठेकर परिवारास या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो..या प्रार्थनेसह संपादक उत्तम बाबळे आणि परिवाराची विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!