भोकरमध्ये एका तथाकथित ‘भोंदूबाबा’ विरुद्ध गुन्हा दाखल
दैवीशक्तीच्या नावाखाली अघोरी कृत्य करुन अनेकांची करत होता फसवणूक ?
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर-उमरी रस्त्यावरील जाकापूर पाटी ता. भोकर येथे एक मंदिर उभारुन दैवीशक्तीच्या नावाखाली अनेक भोळ्या भाबड्या भक्तांना आजारातून बरे करण्याचे अमिष दाखवून,घर संसारात सुख संपत्ती येण्यासाठी नवस,वारी करण्याचे सांगून आदी प्रकारचे अघोरी कृत्य करुन अनेकांची फसवणूक करत असल्याची बाब एकाने उघडकीस आणल्याने तेथील एका तथाकथित भोंदूबाबा विरुद्ध भोकर पोलीसांत महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट अघोरी कृत्य प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधव सखाराम पवार(२४)रा.गणिपूर ता.उमरी ह.मु. रायखोड ता.भोकर या उच्च शिक्षित तरुणाने भोकर शहरापासून अवघ्या २ कि.मी.अंतरावर भोकर-उमरी रस्त्यावरील जाकापूर पाटी जवळ जागा घेऊन एक मंदीर उभारले.या मंदीरात दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त येऊ लागले.काही दिवसांनी भक्तांची संख्या वाढू लागली.त्यामुळे यातील काही भोळ्या भाबड्या भक्तांकडून तो एका विशिष्ट रक्कमेत नोंदणी शुल्क, भंडा-यासाठी दान म्हणून,नारळ,कुंकू,हळद, लिंबू व आदी पुजेचे सामान यासाठी पैसे घेऊ लागला. श्रद्धेपोटी येत असलेल्या काही भक्तांना तो दैवीशक्तीच्या नावाखाली नवस करणे व तेथे येऊन वारी करण्यासाठी सांगू लागला.यातील काही भक्तांचे आजार दुर करणे,घर संसारात सुख,संपत्ती येणे यासाठी जादूटोणा स्वरुपाचे काही अघोरी प्रकार ही तो करु लागला.यातून काही भक्तांची पिळवणूक व फसवणूक ही होत होती.परंतू श्रद्धेपोटी ते लोक या बाबाच्या विरोधात जात नव्हते.याचाण तो पुरेपूर फायदा घेत होता व श्रद्धेपोटी येथे येणाऱ्या काही भक्तांचे नुकसान होत होते.काही दिवसापुर्वी राहुल दत्ता जिगळेकर रा.जिगळा ता.यांच्या एका नातेवाईकाची या तथाकथित भोंदूबाबाकडून फसवणूक झाली होती. त्यामुळे त्यांनी या मंदीरात येऊन तो बाबा नेमके काय करत आहे याची पाहणी केली.
यावेळी तो दैवीशक्तीच्या व श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रध्दा पसरवित काही अघोरी कृत्य करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यामुळे त्यांनी दि.१९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान काही अनिसच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य घेऊन भोकर पोलीसात याबाबदचा भांडाफोड केला.तसेच रितसर फिर्याद दिली.यावरुन पोलीस निरीक्षक विकास पाटील,महिला पो.उप.नि.राणी भोंडवे व आदी पोलीसांनी घटना स्थळावरुन त्या तथाकथित भोंदूबाबास ताब्यात घेतले आणि वरील आशयास अनुसरुन राहुल जिगळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महिला पो.उप. नि.राणी भोंडवे यांनी भोकर पोलीसात माधव सखाराम पवार(२४)रा.गणिपूर ता.उमरी ह.मु. रायखोड ता.भोकर याच्या विरुद्ध गु.र.नं. २८७/२०२२ कलम ३(२) महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट अघोरी कृत्य प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील अधिक तपास पो.नि. विकास पाटील हे करत आहेत.
सदरील तथाकथित भोंदूबाबाच्या भक्तांची संख्या मोठी असून त्यांना लाभ झाल्याचे ते सांगत असले तरी त्या बाबाच्या कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही व नम्र आवाहन करतोत की,अशा लोकांकडे जाऊन श्रद्धेपोटी अंधश्रद्धेचे बळी होऊ नये.आजारी असाल तर योग्य व तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावेत आणि आरोग्य जपावे.तसेच मानसिक व आर्थिक पिळवणूक, फसवणूक करुन घेऊ नये.याच बरोबर काही अघोरी प्रकार होत असल्यास याबाबदची माहिती पोलीसांना द्यावी-संपादक