छायाचित्रणास अनन्य साधारण महत्व आहे-तहसिलदार राजेश लांडगे
फोटोग्राफर्स मल्टीपर्पज असोशिएशन,भोकर जिल्हा नांदेड तर्फे ‘जागतिक छायाचित्रण दिन’ उत्साहात साजरा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ज्यातून शब्दापेक्षा अधिक प्रभावीपणे भावना व्यक्त होतात व हजार शब्दांचा अर्थ त्यातून प्रकट होऊ शकते त्यास छायाचित्र म्हटले जाते.त्यामुळे कॅमेरा, छायाचित्रे व छायाचित्रण कला ही तिसरा डोळा असल्याने त्यास अनन्य साधारण महत्त्व आहे आणि ते महत्व कदापिही कमी होणार नाही,असे प्रतिपादन प्रभारी भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी व्यक्त केले.फोटोग्राफर्स मल्टीपर्पज असोशिएशन भोकर आयोजित ‘जागतिक छायाचित्रण दिन’ कार्यक्रम प्रसंगी दि.१९ ऑगस्ट रोजी ते कार्यक्रमाध्यक्ष म्हणून बोलत होते.
फोटोग्राफर्स मल्टीपर्पज असोशिएशन,भोकर जि.नांदेड (रजि.) यांच्या वतीने दि.१९ ऑगस्ट २०२२ रोजी तहसिल कार्यालयाच्या बैठक सभागृहात ‘जागतिक छायाचित्रण दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विकास पाटील,नायब तहसिलदार सुरेखा चामणार,भोकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा स्मार्ट व्हिलेज हाडोळीचे सरपंच प्रतिनिधी माधव अमृतवाड,सावली प्रतिष्ठान चे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष डॉ.विजयकुमार दंडे,भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव बालाजी नार्लेवाड यांसह आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी फोटो व व्हीडीओ कॅमे-यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली.यावेळी माधव अमृतवाड,डॉ.विजयकुमार दंडे यांनी कार्यक्रमास अनुसरुन मनोगत व्यक्त केले व सर्व छायाचिकारांना शुभेच्छा दिल्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना पोलीस निरीक्षक विकास पाटील म्हणाले की,छायाचित्रण ही एक उत्कृष्ट कला आहे.या कलेत जेवढा विकास कराल तेवढी प्रगतीही साधता येऊ शकते.या कलेचा समाजासाठी सद्उपयोग करा व अपप्रवृत्तीवर प्रहार करुन न्याय देण्याचा प्रयत्न ही करता येऊ शकते.परंतू हा कलाकार असंघटीत असल्याने त्यांना स्वप्रगती साधता येत नाही.त्यामुळे असंघटीत कामगार म्हणून नोंदणी करावी व शासकीय योजनांचा लाभ सर्व छायाचिकारानी घ्यावा,असे ते म्हणाले. तसेच अध्यक्षिय समारोप करतांना तहसिलदार राजेश लांडगे पुढे म्हणाले की,विज्ञानाच्या प्रगतीमुळे कॅमे-यांचे स्वरुप बदलले म्हणून त्याचे महत्व कधीही कमी होत नसते. त्यास आधुनिकतेची जोड देऊन छायाचित्रणातून अविस्मरणीय ठेवा देता येऊ शकतो.पत्रकारिता,समाज माध्यमे यातून छायाचित्रे बरच काही सांगून जातात व ते समाज,गाव,राज्य आणि देशाच्या विकास,प्रगतीचे रुप जगासमोर मांडू शकते.छायाचित्रे जर नसती तर भुतकाळ व वर्तमान काळातील असंख्य बाबी समजून घेता येऊ शकल्या नसत्या.त्यामुळे छायाचित्रण,छायाचित्रे व छायाचित्रकार यांना जपलं पाहिजे.त्यांच्यासाठी शासन प्रशासन यांच्या माध्यमातून आम्हास जे सहकार्य करता येईल ते आम्ही करु,असे आश्वस्त करत छायाचित्रकारांना या दिनानिमित्त त्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी फोटोग्राफर्स मल्टीपर्पज असोशिएशन,भोकर जि. नांदेड(रजि.) च्या वतीने संस्थापक अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,उपाध्यक्ष सुधाकर देशमुख,सचिव मारोती आरटवाड, कोषाध्यक्ष महेश नारलावार,संघटक मनोहर बट्टेवाड, छायाचित्रकार बालाजी कोटूरवार,ज्ञानदेव पुरी महाराज, बालाजी पिंगलवाड यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या व मान्यवरांनी सर्व छायाचित्रकारांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी छायाचित्रकार साईनाथ गोत्रे भोकरकर, सूर्यभान मुतनेपवाड,श्रीकांत बाबळे,गंगाधर सुर्वेकर, साहेबराव डोंगरे,गणेश पुलकंठवाड,बाळू बट्टेवाड,बाळू कानगुले,शुभम नर्तावार,सुरेश सरपे,सुजल श्रीरंडकर,सुधीर पुरी यांसह आदी छायाचित्रकारांनी परिश्रम घेतले.तर या कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार उत्तम बाबळे यांनी मानले.