कार्यकारी अभियंता जि. प.बां.उपविभाग भोकरला ध्वजारोहणाचे ‘वावडे’?
दि.१३ ते १४ ऑगस्ट दरम्यान भोकर मुख्यालयात केले नाही ध्वजारोहण
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : संपुर्ण देशात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठया उत्सवात साजरा होत असून हर घर तिरंगा फडकविला जात आहे.याच बरोबर शासनाने घालून दिलेल्या ध्वज संहितेनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सुर्योदयानंतर तिरंगा ध्वज फडकविला व सुर्यास्तापुर्वी तो ध्वज सन्मानाने उतरविला जात आहे.परंतू नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग भोकर कार्यालयाच्या मुख्यालयात ध्वजारोहण करणे टाळल्याचे निदर्शनास आले असून संबंधित अधिकाऱ्यांना तिरंगा ध्वजारोहणाचे ‘वावडे’ आहे काय ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.भोकर तालुका दौ-यावर आलेल्या नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना या गंभीर प्रकाराबाबद विचारले असता संबंधित कार्यालयाच्या जबाबदार अधिका-याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे म्हटले असून काय कारवाई होईल ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
नांदेड जिल्ह्याची व्याप्ती पाहता जिल्हा मुख्यालयापासून खुप लांब असलेल्या तालुक्यांच्या अधिकारी व ग्रामीण भागातील नागरिकांचा होत असलेला नाहक त्रास कमी व्हावा या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्याचे माजी मुख्यमंत्री व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नातून नांदेड जिल्हा परिषदेने जि.प.बांधकाम विभागांतर्गत कार्यालयाचे विभाजन करुन ३ कार्यकारी अभियंता जि.प.बां. उपविभागाची निर्मिती केली.यानंतर दि.१ जून २०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर कार्यालयाच्या इमारतीत कार्यकारी अभियंता जि.प.बां.उपविभाग,भोकर कार्यालयाची स्थापना केली व दि.१४ जून २०२१ रोजी तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.सदरील कार्यालयावर भोकर ते किनवट पर्यंतच्या ६ तालुक्याचा कार्यभार असून १ कार्यकारी अभियंता,३ उपअभियंते,१३ कार्यालयीन कर्मचारी अशा एकूण १७ जणांची या कार्यालयात नियुक्त करण्यात आली.परंतू या कार्यालयाच्या प्रमुख अधिका-यांचा इतर कर्मचा-यांसोबत कसलाच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे.
याचा प्रत्यय नुकताच आला आहे.त्याचे असे की,संपुर्ण देशात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठया उत्साहात साजरा केल्या जात आहे.याच अनुशंगाने दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम राबविला जात आहे.तर सर्व शासकीय कार्यालयांच्या मुख्यालयात ध्वज संहिता २०२२ च्या नियमावली नुसार सूर्योदयानंतर तिरंगा ध्वजाचे रोहण करणे व सूर्यास्तापुर्वी सन्मामाने तो ध्वज खाली उतरविण्याचे निर्देश दिले आहेत.या निर्देशानुसार कार्यकारी अभियंता जि.प.बां.उपविभाग भोकर कार्यालयाच्या मुख्यालयात तिरंगा ध्वजाचे रोहण करणे गरजेचे असताना देखील संबंधित अधिका-याने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. ध्वजारोहण केले जाणाऱ्या लोखंडी खांबावर ध्वज चढविला गेला नाही,तर ३:२ आकाराचा तिरंगा ध्वज एका अडचणीच्या ठिकाणी उभारला आहे.तो २ दिवसांपासून तचाच आहे.ना चढविला गेला ना उतरविला गेला आहे. यावरून महिन्यात क्वचितच कार्यालयात येणारे सदरील कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सागर तायडे हे हुंटावरून शेळ्या हाकत असल्याचे निदर्शनास येत आहे.दि. १३ व १४ ऑगस्ट २०२२ रोजी कार्यकारी अभियंता जि.प.बां. उपविभाग कार्यालय भोकर येथे तिरंगा ध्वजाचे रोहण करण्यात आले नसल्याने त्यांना ध्वजारोहणाचे काही ‘वावडे’ आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत विचारण्यासाठी संपर्क साधला असता त्या कार्यालयाच्या कोणत्याही जबाबदार अधिका-यांशी संपर्क होऊ शकला नाही.तर याच दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे या दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी एका कार्यक्रमानिमित्त भोकर तालुका दौऱ्यावर आल्या असता पत्रकारांनी ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर त्याबाबत म्हणाल्या की,संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.तर मग पाहुयात की संबंधित ‘त्या’ अधिकाऱ्याविरुद्ध काय कारवाई होणार ?