Sat. Apr 19th, 2025

ध्वज संहितेचे पालन करुन ‘हर घर तिरंगा’ उत्साहात साजरा करावा-राजेश लांडगे

Spread the love

भोकर येथील दि. १२ ऑगस्ट रोजी होत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ रॅलीत बहुसंख्येने सहभागी व्हावे!

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सबंध देशात ‘हर घर तिरंगा – घर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविला जात असून या राष्ट्रीय उपक्रमाच्या अनुशंगाने दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजता भोकर शहरात जनजागृतीपर ‘हर घर तिरंगा’ रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे आणि तिरंगा ध्वजाचा सन्मान ठेऊन ध्वज संहितेचे पालन करुनच ‘हर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करावा,असे आवाहन भोकरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात,स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात अज्ञात नायक,नायिका,क्रांतिकारक,स्वातंत्र्य सेनानी, देश प्रेमींचे बलिदान व योगदानाचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत रहावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी,देदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण व्हावे यासाठी दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधी दरम्यान केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “हर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहे.याच अनुशंगाने भोकर तालुका व शहरात जनजागृतीस्तव विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केल्या जात आहेत.शिक्षण विभागांतर्गत समुह राष्ट्रगाण,निबंध स्पर्धा,प्रबोधनपर व्याख्याने,कलापथकाद्वारे जनजागृती,प्रभातफेरी,यांसह आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत.तर अनेक सेवाभावी व्यक्तीमत्वे,संस्था,पक्ष,पत्रकार संघटना,लोकसहभाग, आदींकडून तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात येत आहे.तसेच दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथून ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली निघणार आहे.तरी या रॅलीत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी आणि देशप्रेमींनी बहुसंख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन भोकर प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी कले आहे.याच बरोबर अनेकांचा त्याग, बलिदान,योगदान यातून देशस्वातंत्र्य व स्वतंत्र भारताला ‘तिरंगा ध्वज’ मिळाला आहे.तिरंगा ध्वज हा देश व देशवासीयांची आन,बाण,शान,स्वाभिमान असल्यामुळे त्याचे पावित्र्य जपल्या जावे आणि सन्मान राखल्या जावा यासाठी केंद्र सरकारने जी संविधानिक संहिता घालून दिली आहे तिचे तंतोतंत पालन करुनच ‘हर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करावा,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

हा उपक्रम राबविताना ध्वजसंहिता २००२,डिसेंबर २०२१ व जुलै २०२२ मधील बदललेल्या अधिसूचनांचे अचूक पालन होण्यासाठी काय दक्षता घ्यावी. याबाबतचे संक्षिप्त विवरण पुढील प्रमाणे…

ध्वज तयार करण्याबाबत निर्देश….

• तिरंगा ध्वजाचा आकार आयताकार असावा.• तिरंगा ध्वजाची लांबी रुंदी हे प्रमाण ३: २ असे असावे.• तिरंगा बनविण्यासाठी खादी अथवा कॉटन,पॉलीस्टर,सिल्क कापड यापासून बनविण्यात यावे.• ध्वजामध्ये सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असा तिरंगा बनविला जावा.मध्यभागातील पांढऱ्या पट्टीवर २४ रेषांचे गोलाकार निळया रंगाचे अशोकचक्र असते.

ध्वज फडकविण्याबाबतचे नियम…

• प्रत्येक नागरिकाने तिरंगा ध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहिता २००२,डिसेंबर २०२१ व जुलै २०२२ मधील बदलेल्या अधिसूचनांचे पालन करावे.• तिरंगा ध्वज फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा.• तिरंगा ध्वज उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.•दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले ध्वज अभियान कालावधी नंतर ध्वज फेकल्या जावू नये,तो सन्मानाने जतन करून ठेवावा.• अर्धा झुकलेला,फाटलेला,कापलेला ध्वज कुठल्याही परिस्थितीत लावला जावू नये.• वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही.• कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणता येणार नाही.• ज्या प्रसंगी,शासनाने दिलेल्या निर्देशांनूसार सरकारी इमारतीवरील ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही.• खासगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही.• ध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल,हात पुसणे यांवर किंवा कोणत्याही पोषाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किंवा छपाई करता येणार नाही.• ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत.• ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही.• ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादता येणार नाही.• ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमिशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये.• ध्वज मोटार वाहन,रेल्वे गाडी,जहाज किंवा विमान यांच्या झडपावर, छतावर,बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही.• ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही.• ध्वजाचा ” केशरी ” रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही व केशरी रंग वरच असावा.• ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा प्रकारे लावला पाहिजे.• फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये.• ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये.
• ध्वज संहितेच्या भाग ३ च्या कलम ९ मध्ये अंतर्भूत केलेल्या तरतुदीं व्यतिरिक्त कोणत्याही वाहनांवर ध्वज लावण्यात येऊ नये.• राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये,तसेच ज्या काठीवर ध्वज फडकत ठेवला असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यासह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये.• ध्वजाचा तोरण,गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये,• ध्वज फाटेल अशा प्रकारे तो लावू नये किंवा बांधू नये.

ध्वज लावण्याची योग्य पद्धत…

• ज्या ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे.• जेव्हा खिडकीची कड,सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरून ध्वज फडकविण्यात येतो तेंव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी.

ध्वजसंहिता नियमात बदल…

• भारतीय ध्वज संहिता २००२ भाग – १ मधील परिच्छेद १.२ मधील राष्ट्रध्वज हे “हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर,सुत,सिल्क,खादी कापडापासून बनविलेला असेल”,या तरतुदीमध्ये दि.३० डिसेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेन्वये बदल करण्यात आला आहे.या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत,पॉलिस्टर, लोकर,सिल्क,खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. यानुसार प्लास्टीक ध्वजाचा वापर होऊ नये,यासाठी आपण सर्वांनी कटाक्षाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.• दि. २० जुलै २०२२ ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल.मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे.या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची परवानगी होती.ध्वजारोहण मात्र सुर्योदयानंतर सकाळीच करावयाचे आहे.• शासकीय कार्यालये व संस्था वगळता इतर सर्व खासगी व्यक्तींना दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ध्वजसंहिता पालन करत दिवस-रात्र आपल्या इमारतींवर ध्वज फडकाविता येईल.मात्र शासकीय कार्यालये व संस्थांनी ध्वजसंहितेच्या नेहमीच्या नियमांचे पालन करावयाचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक भारतीयास आपल्या घरी तिरंगा फडकविण्याची ही मोठी संधी प्राप्त झाली असल्याने उपरोक्त संहितेचे पालन करुनच ‘घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम मोठ्या उत्साहात सर्वांनी साजरा करावा.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !