Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

• नदी परिसरातील काही गावांतील घरांत शिरले पूराचे पाणी
• नाल्यातील पूरात वाहून गेल्याने चिदगिरी येथील एका इसमाचा झाला मृत्यू
• रेणापूरच्या १५ कुटूंबियांना करण्यात आले सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित
• वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेच्या वतीने ‘त्या’ स्थलांतरित कुटूंबियांना देण्यात आले धान्य किट
• नदी,नाले परिसरातील शेती जलमय झाल्याने मोठ्या प्रमाणात झाले आहे पिकांचे नुकसान
• म्हैसा तेलंगणा राज्यातील गडन्ना सुधा वाघू प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा भोकर तालुक्यातील काही गावांना धोका

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संंततधार पावसाचा कहर कायम असून धानोरा तलाव,सुधा प्रकल्प तुडूंब भरला आहे.सुधा नदीसह आदी नद्या नाले दुथडी भरुन वाहत आहेत.तर यामुळे १० गावांचा संपर्क तुटला असून शेती जलमय झाल्याने मोठ्या प्रमाणात खरिप पिकांचे नुकसान झाले आहे व नाल्याच्या पूरात वाहून गेल्याने चितगिरी येथील एका इसमाणा मृत्यू झाला आहे.तर घरात पाणी शिरलेल्या रेणापूर येथील १५ कुटूंबांचे सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असून वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेच्या वतीने ‘त्या’ कुटूंबियांना धान्य किट देण्यात आले आहे.प्रशासन मदत कार्यासाठी सज्ज आहे, परंतु नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी केले आहे.

दि.१० जुलै २०२२ पासून भोकर शहर व ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम असून बुधवार दि.१३ जुलै २०२२ रोजी पहाटे पर्यंत तालुक्यात सरासरी १६७.३० मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून संततधार पावसाचा वेग वाढला आहे.यामुळे सुधा नदीवरील धानोरा तलाव,सुधा प्रकल्प तुडूंब भरला आहे.तसेच लामकानी ल.पा.,धानोरा ल.पा.,सावरगाव ल.पा.,कोंडदेव नगर ल.पा., हे १०० टक्के भरली आहेत.सुरु असलेल्या पावसाच्या पाण्याने सुधा नदी दुथडी भरून वाहत असून या नदीवरील धानोरा ल.पा.व सुधा प्रकल्प भरल्याने सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुढे सुधा नदीच्या पुराने रोद्ररुप धखरण केले आहे.सुधा नदीला पूर आला असून पूराचे पाणी तालुक्यातील धानोरा,बोरगाव,रेणापूर,लगळूद,रावणगावात शिरले आहे.

तर धानोरा,बोरगाव(सुधा),धावरी बु.,धावरी खु.,नांदा खु.,दिवशी बु.,दिवशी खु.जाकापूर,हस्सापूर, जामदरी या गावाना जोडणा-या रस्त्यांवरील पुल पूराच्या पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.तसेच सुधा नदीच्या पूराचे पाणी रेणापूर या गावांतील घरात घुसल्याने पूर बाधित १५ कुटूंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले आहे.रेणापूर येथील पूर परिस्थितीची उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार राजेश लांडगे,मंडळ अधिकारी महेश वाकडे यांनी पाहणी केली असून ‘त्या’ स्थलांतरित कुटूंबियांना ही भेट देऊन आढावा घेतला आहे.

वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेच्या वतीने ‘त्या’ स्थलांतरित कुटूंबियांना देण्यात आले धान्य किट

कोरोना कार्यकाळ असो वा अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती,वर्ल्ड व्हिजन इंडिया ही संस्था पिडीत व गरजूना सातत्याने मदत करत असते.सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक गरिबांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. याच अनुशंगाने रेणापूर ता.भोकर येथील १५ कुटूंबियांना स्थलांतरित करण्यात आले आहे.त्यांना वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेचे व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू यांच्या पुढाकारातून ५ किलो पोहे,११ पॉकिट पार्ले जी बिस्किट,३ किलो गूळ,५ किलो शेंगदाणे,२०० ग्रॅम चहा पावडर,५ किलो डाळ,१० किलो गव्हाचे पीठ,४ लिटर सोयाबीन तेल,१ घोंगडी व २ टॉवेल अशा प्रकारे प्रति कुटूंब एक किटचे दि.१३ जुलै २०२२ रोजी वाटप करण्यात आले आहे.यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंडारे,तहसिलदार राजेश लांडगे,मंडळ अधिकारी महेश वाकडे,गावचे सरपंच,पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.या स्तुत्य उपक्रमाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यानी कौतुक केले असून किट वाटप कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेचे व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू व त्यांच्या चमूतील शिरीष कांबळे,प्रकाश फुलझेले,ऐश्वर्या खोत, एबेनेझर आणि श्रीनिवास यांनी परिश्रम घेतले.

नाल्यातील पूरात वाहून गेल्याने चिदगिरी येथील एका इसमाचा झाला मृत्यू

सुरु असलेल्या संंततधार पावसामुळे नदी,नाले दुथडी भरुन वाहत आहेत.चिदगिरी शिवारातील नाल्यास ही पूर आला आहे.दि.१३ जुलै २०२२ रोजी सकाळी सिताराम नाईक तांडा,चिदगिरी येथील चरन रामधन राठोड(४२) या भूमिहिन शेतक-याने कामानिमित्त गाव शिवार परिसरातील नाला ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला असता नाल्यातील पूराचे पाण्याच्या प्रचंड दाब असल्याने त्यांना त्या पूरातून बाहेर निघता आले नाही.त्या पूरात ते वाहून गेले व यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही माहिती मिळताच गावकरी व आदींनी घटनास्थळी जाऊन त्यांचा शोध घेतला व दुपारी १२:०५ वाजताच्या दरम्यान त्या नाल्यातून त्यांंचा मृतदेह बाहेर काढला.सदरील घटनास्थळी तहसिलदार राजेश लांडगे, नायब तहसिलदार संजय सोलंकर व आदींनी भेट दिली असून या घटनेचा महसूल आणि पोलीस विभागाने रितसर पंचनामा केला आहे.

म्हैसा तेलंगणा राज्यातील गडन्ना सुधा वाघू प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा भोकर तालुक्यातील काही गावांना धोका

भोकर तालुक्यातून प्रवाहित होणाऱ्या सुधा नदीवर धानोरा ल.पा.व सुधा प्रकल्प आहे.सुधा व वाघू या दोन नद्या एकत्र येऊन पुढे ते पाणी तेलंगणा राज्यात जाते.या नदीवर म्हैसा मंडळ जि.निर्मल,तेलंगणा राज्य येथे गडन्ना सुधा वाघू प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.सद्या सुरु असलेल्या पावसाने सुधा व वाघू या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.तर या दोन नद्या एकत्र आल्याने पाणी पातळी वाढली व पूराचे पाणी भोकर तालुक्यातील लगळूद, रावणगाव,महागाव परिसरात शिरले आहे.लगळूद व रावणगाव येथील काही घरात पूराचे पाणी शिरल्याने त्या कुटूंबियांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तर गडन्ना सुधा वाघू प्रकल्प ही तुडूंब भरल्याने प्रकल्पातील बॅक वॉटरने महागाव,रावणगाव,लगळूद,दिवशी बु.व दिवशी खु.या गावांची शेती मोठ्या प्रमाणात जलमय झाली आहे. यात खरिप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून काही घरात पुराचे पाणी व प्रकल्पाचे बॅक वॉटर शिरत असल्याने नागरिकांना ही मोठा धोका निर्माण झाला आहे.

उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व तहसिलदार राजेश लांडगे हे या पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.याच दरम्यान त्यांनी या गावांना भेटी दिल्या आहेत व पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे.या भेटी दरम्यान माजी जि.प.सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पाटील व आदींनी या अधिका-यांची भेट घेतली आणि म्हैसा तेलंगणा राज्यातील गडन्ना सुधा वाघू प्रकल्पाच्या बॅक वॉटरच्या संभाव्य धोक्या संदर्भात माहिती दिली.तसेच गडन्ना सुधा वाघू प्रकल्पाचे काही दरवाजे उघडण्यात यावेत व पाण्याचा विसर्ग करण्यात यावा याबाबत तेलंगणा राज्य प्रशासनास महाराष्ट्र राज्य प्रशासनाने कळवावे अशी विंनतीपर मागणी केली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी याची अमलबजावणी तात्काळ करण्यात येईल असे आश्वस्त केले आहे.तसेच तालुक्यातील आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी व मदत कार्यासाठी प्रशासन सज्ज असून या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि सतर्क रहावे,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !