भोकर तालुक्यात अतिवृष्टी : भुरभुशी येथे वीज पडून एका मुलीचा मृत्यू
नदीच्या पुरात अडकलेल्या लगळूदच्या दोन शेतकऱ्यांना बैलांनी दिले जीवदान
नदी,नाल्यांना पूरसदृश स्वरुप आल्याने काही गावांचा संपर्क तुटला व शेतीचे ही झाले नुकसान
उत्तम बाबळे,संपादक-अंबुज प्रहार
भोकर : जून अखेर पर्यंत म्हणावा तसा पाऊस पडला नाही.परंतु गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे नदी,नाले दुथडी भरून वाहत असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.तसेच दि.९ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजताच्या दरम्यान मौ. भुरभुशी ता.भोकर येथील शेतकरी कुटूंबातील एका मुलीवर वीज पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर पुरात अडकलेल्या लगळूद येथील दोन शेतकऱ्यांना नदी पार करुन बैलांमुळे जीवदान आहे.
सविस्तर वृत्त असे की,मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असून आज दि.९ जुलै २०२२ रोजी पहाटे पर्यंत तालुक्यातील भोकर मंडळात ७७.५० मी.मी.,मोघाली ७७.५० मी.मी,मातुळ ७६.०० मी.मी., किनी ८२.२५ मी.मी.अशा प्रकारे सरासरी एकूण ७८.३० मी.मी.पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सततधार पाऊस पडत असल्याने नदी नाले दुथडी वाहत आहेत व पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.मौ.भोसी व खरबी येथील सीता नदी,बोरगाव, नांदा(खुर्द),दिवशी,लगळूद व रावणगाव येथील सुधा नदी,डौर,पिंपळढव व मातुळ येथील वाघू नदी अशा आदी नद्या दुथडी भरुन वाहत असून नदी काठीच्या काही गावात पूराचे पाणी शिरले आहे.तर काही पुलांवरून पाणी वाहत आसल्याने वाहतूक थाबली व त्या गावांचा संपर्क तुटल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते.याच बरोबर खरीप पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
भुरभुशी येथे वीज पडून एका मुलीचा झाला मृत्यू ; तर तिची आई जखमी
दि.९ जुलै २०२२ सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास मौ.भुरभुशी येथील शेतकरी कुटुंबातील चंद्राबाई नारायण गमेवाड व तिची मुलगी कु.आडेला नारायण गमेवाड(१४) या दोघी पावसात त्यांच्या गुरांना शेताकडे नेत असतांना गावाशेजारील तलावाजवळ अचानक वीज पडली यात कु. आडेला नारायण गमेवाड हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर तिची आई जखमी झाली असून सुदैवाने ती व गुरे बचावले आहेत. जखमी चंद्राबाई गमेवाड यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र मौ.किनी येथे प्रथमोपचार करण्यात आले व पुढील उपचारासाठी तिची रवानगी करण्यात आली आहे.घटनास्थळी भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे,तहसिलदार राजेश लांडगे,नायब तहसिलदार रेखा चामनर यांनी भेट दिली असून मंडळ अधिकारी शेख मुसा,तलाठी सुभाष जगताप व तलाठी पंजाब मोरे यांनी आणि भोकर पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. मुलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नदीच्या पुरात अडकलेल्या लगळूदच्या दोन शेतकऱ्यांना बैलांनी दिले जीवदान
मौ.लगळुद ता.भोकर येथील शेतकरी माधव लक्ष्मण पंडीलवाड,शंकर लक्ष्मण पंडिलवाड हे रावणगाव शिवारातील सुधा नदी काठच्या त्यांच्या शेतातील आखाड्यावर थांबले असता नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला व पुराणे त्यांना वेढले.यावेळी नदीच्या प्रवाहातून गावाकडे जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला व पुरातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मानवी मदत मिळणे ही शक्य नव्हते.यावेळी त्या शेतकऱ्यांनी आपली दोन बैल त्या प्रवाहात उतरवली व त्या बैलांचे शेपूट धरुन नदी पार केली.बैलांनी देखील जीवाची बाजी लाऊन पोहत रावणगावकडील नदी किणारा गाठला आणि त्या दोन शेतकऱ्यांना जीवनदान दिले.ही विशेष घटना समजताच तहसिलदार राजेश लांडगे, नायब तहसिलदार रेखा चामनर यांनी रावणगाव येथे जाऊन त्या शेतकऱ्यांची भेट घेतली शेतकऱ्यांना जीवनदान देणा-या त्या बैलांचे कौतुक केले आहे.
महामार्ग ६१ वरील मौ.मातुळ येथील पुलाजवळील मुरुम भरणा खचला
महाराष्ट्र व तेंलगाणा राज्यांना जोडणारा भोकर-म्हैसा राष्ट्रीय महामार्ग ६१ वर मौ.मातुळ ता.भोकर येथे वाघू नदीवर नव्यानेच पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. सदरील पुलालगत जो मुरुम भरण्यात आला व त्यावर रस्त्याचे काम जोडण्यात आले आहे.दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वाघू नदी दुथडी वाहत असून पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुलाजवळील मुरुम भरणा खणला आहे व पुला लगतचा रस्ता जवळपास ९ इंच खाली दबला आहे.यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाल्याने काही वेळ रहदारी ठप्प झाली होती.ही माहिती मिळताच त्या ठिकाणी तहसिलदार राजेश लांडगे,नायब तहसिदार रेखा चामनार यांनी भेट दिली असून पुलाचे बांधकाम करणाऱ्या पुणे येथिल प्रसिध्द टी.अँड टी.कंत्राटदार कंपनीशी संपर्क साधला.
तसेच तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशा सूचना दिल्या असून वाहन धारकांनी देखील या पुलावरुन आपली वाहने सावकाश न्यावीत व आपली काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.तर ही सुचना मिळताच त्या बांधकाम कंत्राटदार कंपनीच्या संबंधित कामगारांनी तेथे येऊन दबलेल्या रस्त्याच्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकून तात्पुरती स्वरूपात डागडुजी केली आहे. पहिल्याच मोठ्या पावसात सदरील पुलाचे बांधकाम या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब निदर्शनास आली असून राष्ट्रीय महामार्ग सा.बां.वि. प्रशासन त्यांच्या विरुद्ध काय कारवाई करणार ? याकडे प्रवाशी व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लगळूद-रावणगावात शिरले पाणी ;१० कुटूंबीयांना हलविले सुरक्षित ठिकाणी
भोकर तालुक्यातील मौ.लगळूद व रावणगावा जवळून सुधा व वाघू नदी एकत्र येऊन वाहते.पावसाळ्यात दरवर्षी पुराचे पाणी शिरूते व काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सुधा व वाघू नदीचे एकत्र आलेला प्रवाह पुढे तेलंगणा राज्यात जातो.याच नदीवर म्हैसा तेलंगणा राज्य येथे गडेन्ना सुधा-वाघू प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली असून या प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा धोका या गावांना आहे.या दोन दिवसात पडत असलेल्या पावसाने ही नदी दुथडी वाहत असून त्या प्रकल्पाचे बॅक वॉटर या गावांत शिरले आहे.लगळूद व रावणगावातील काही घरात हे पाणी शिरले असून महादेव मंदिरास ही पाण्याने वेढले आहे.त्यामुळे लगळूद येथील पाणी बाधीत १० कुटूंबाना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.यर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गावाजवळ बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट राहिल्याने ही गावात व शेतात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे.तसेच गावाचा संपर्क ही तुटला आहे.सा.बां.विभागाचे अभियंता हेंद्रे यांच्या दुर्लक्षामुळे ही वेळ आली असून यास जबाबदार असलेल्या या अभियंत्याविरुद्ध सा.बां.वि.प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांनी केली आहे.
नदी,नाल्यांना पूरसदृश स्वरुप आल्याने काही गावांचा संपर्क तुटला व शेतीचे ही झाले मोठे नुकसान
तालुक्यात सततधार पाऊस बरसला असून अतिवृष्टीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या पावसाचे पाणी शेतीमध्ये साचल्याने कोवळ्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सुधा-वाघू नदी काठच्या लगळूद,रावणगाव शिवारातील शेतीमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.मौ.डौर,जामदरी येथील अर्धवट बांधकाम झालेल्या व पिंपळढव,भोसी येथील रस्त्यावरील पुलांवरुन नदीचे पाणी वाहत असल्याने या गावांचा काही काळ संपर्क तुटला काम अर्धवट राहिल्याने डौर गावाचाही संपर्क तुटला आणि नदीकाठच्या शेतांतील पिकांचे ही प्रचंड नुकसान झाले आहे.तर दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोकर शहरातील बाजारपेठ ही ठप्प झाली होती व शहरातील रेल्वेच्या उड्डाण पुलाखालील भुयारी रस्त्यास तलावाचे स्वरूप आले आहे.शेती पिकांचे झालेली नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी अशी मागणी संबंधित पूर पिडीत शेतकऱ्यांतून होत असून झालेल्या नुकसानीचे लवकरच पंचनामे करण्यात येतील असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.तसेच झालेल्या पाऊस परिस्थितीवर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे,तहसिलदार राजेश लांडगे,मंडळ अधिकारी महेश वाकडे,शेख मुसा व सर्व महसूल अधिकारी,कर्मचारी आणि पो.नि. विकास पाटील यांसह पोलीस प्रशासन व आपत्कालीन मदत कार्य दक्षता पथक लक्ष ठेऊन आहे.