मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्या प्रयत्नांतून रस्ते घेताहेत मोकळा श्वास
भोकर शहरातील अतिक्रमीत अडथळे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकांतून समाधान
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा नालीवर व नालीपुढे लहान मोठ्या विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याच अनुशंगाने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी सदरील अतिक्रमण हटाव ची मोहीम दि.२७ जून पासून हाती घेतली असून ‘ती’ अतिक्रमणे हटविल्याने रस्ते मोकळा श्वास घेत आहेत.तर या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे रहदारीतील अडथळे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
भोकर शहरातील चौपदरी मुख्य रस्त्यावर दुभाजक व दुतर्फा नालीचे बांधकाम करण्यात आले आहे.तर काही ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याने नालीचे काम अर्धवट झालेलं आहे.तसेच त्या नालीवर व नालीपुढे शहरातील लहान मोठ्या विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन टिनशेड,शिड्या उभारुन आणि विविध प्रकारे अडथळे निर्माण केले आहे. तसेच विविध साहित्य व फळे विक्री करणाऱ्या लहान व्यापा-यांनी हातगाडे रस्त्यावर थाटली असून त्यांच्यापुढे दुचाकी, तीन चाकी,चार चाकी अशी आदी लहान मोठी वाहने रस्त्यावर उभी केल्या जात आहेत. रस्त्यावर तासंतास थांबणाऱ्या त्या वाहनांमुळे चौपदरी रस्ता असूनही वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.याचा नाहक त्रास शहरातील नागरिकांना होत असल्याने रोष व्यक्त होत आहे व तशा अनेक तक्रारी भोकर नगर परिषदेकडे नागरिक करत आहेत.म्हणून हा संपूर्ण रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा,अशी मागणी वारंवार अगोदर होत होती.याच अनुशंगाने अखेर भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी ध्वनीक्षेपनावरुन सर्व संबंधित व्यापारी व नागरिकांना ते अतिक्रमण हटवावे असे आवाहन केले आणि दि.२७ जून २०२२ रोजी पासून सदरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम हाती घेतली.तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात रस्त्याच्या दुतर्फा नालीवर व नाली समोर झालेले अतिक्रमण हटविणे सुरु केले आहे.अतिक्रमण काढण्याचा आजचा तिसरा दिवस असून ही मोहीम पुढे ही सुरूच राहणार असल्याची ग्वाही मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी दिली आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने या मोहीमेमुळे काही व्यापाऱ्यांतून धांदल उडाली आहे व अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने या मोहीमेस प्रतिसाद दिला आहे.तर ध्वनिक्षेपकाद्वारे या सूचना देऊनही ब-याच अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण स्वतः काढून घेतले नसल्याने ही मोहीम सुरुच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याने नालीचे बांधकाम अपुर्ण राहिले व त्यामुळे या चौकात सातत्याने घाण पाण्याचा डोह साचत आहे व या डोहातल्या गुडघाभर घाण पाण्यातून ये जा ची कसरत नागरिकांना करावी लागत आहे.ही बाब लक्षात घेऊन मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी या चौकातून अतिक्रमण हटाव मोहीमेची सुरुवात केली असून येथील नाल्या मोकळ्या झाल्यातर त्या घाणपाण्याचा काही प्रमाणात प्रश्न सुटणार आहे.या अतिक्रमण हटाव मोहीमेत मुख्याधिकारी यांच्यासोबत नगर परिषदेचे जावेद इनामदार,साहेबराव मोरे,संभाजी वाघमारे व आदी महिला, पुरुष कर्मचारी सहभागी राहून परिश्रम घेत आहेत.तर सार्वजनिक बांधकाम उपविभाग भोकरचे शाखा अभियंता प्रदिप माळी,लक्ष्मण तुप्तेवार हे सहकार्य करत आहेत व कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण पुर्णपणे हटविण्यात येईपर्यंत ही मोहीम आम्ही सुरुच ठेऊ – मुख्याधिकारी प्रियंका टोंगे
सदरील मोहीमेबाबत मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांना विचारले असता त्यांनी म्हटले आहे की,नागरिकांना सुविधा देणे हे आमचे कर्तव्य असून ती जबाबदारी नगर परिषद पार पाडत आहे.हे अतिक्रमण निघाल्यानंतर अपुर्ण नाल्यांचे बांधकाम पुर्ण करता येईल व सांडपाण्याचे योग्य नियोजन करता येईल आणि मुख्य चौकात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटून नागरिकांची गैरसोय दूर होईल.तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहन थांब्यांची जागा निश्चित करता येईल व हे केल्याने वाहन धारकांत शिस्त येईल आणि वाहन थांब्याच्या नियमांचे जे वाहनधारक उल्लंघन करतील त्यांच्या विरुद्ध पोलीसांना दंडात्मक कारवाई करता येईल. यासाठी ही मोहीम आम्ही राबवित असून शहरातील मुख्य रस्त्यावरचे अशा प्रकारचे अतिक्रमण पुर्णपणे हटविण्यात येईपर्यंत ही मोहीम सुरुच राहणार आहे व या मोहीमेस सर्व व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले आहे.