खुपच दुर्दैवी घटना : पाळज शिवारात वीज पडून ३ शेत मजूरांचा मृत्यू
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.पाळज शिवारातील गट क्र.६ मधील शेतात पेरणीचे काम करत असलेल्या ३ शेत मजूरांवर दि.२१ जून रोजी सायंकाळी वीज पडल्याने यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.सदरील नैसर्गिक आपत्तीत शेत मजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पाळज व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सर्वत्र खरिप पेरणीने वेग घेतला असून मौ.पाळज ता.भोकर परिसरात ही मोठ्या प्रमाणात शेतकरी पेरणीत व्यस्त आहेत. याच अनुशंगाने मौ.पाळज येथील प्रगत शेतकरी सुरेश चटलावार यांच्या शेतात दि.२१ जून २०२२ रोजी सोयाबीन ची पेरणी सुरु होती.याच दरम्यान सायंकाळी ५:०० वाजताच्या दरम्यान वीजेच्या गडगडाटासह ढग भरुन आले असता आसरा घेण्यासाठी काही शेतमजूर शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाखाली गेले.यावेळी त्या झाडावर वीज पडली व यात राजेश्वर मुत्येन्ना चटलावार(४५),भोजेन्ना पोशट्टी रामणवाड(३६), व साईनाथ किशन सातमवार(३२) तिघेही रा.पाळज यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.ही माहिती समजताच परिसरातील शेतकरी व गावकरी घटनास्थळी गेले.तसेच भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे,तहसिलदार राजेश लांडगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.याच बरोबर सचिन आरु(मंडळ अधिकारी,मोघाळी),बरोबर राजकुमार मस्के (तलाठी, पाळज) व पंजाबराव मोरे (तलाठी,किनी) यांनी घटना स्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे.तसेच पो.नि. विकास पाटील, पो.उप.नि.दिगांबर पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.