काँग्रेस पक्ष भोकर तालुकाध्यक्ष पदाची ‘निवड’ होणार का ‘नियुक्ती’?
निवडीतून ‘लोकशाहीतला’ का बंद पॉकेटातून नियुक्तीने ‘मर्जीतला’ ? कोणाच्या नावावर शिक्का मोर्तब होईल,की जगदीश पाटील भोसीकर यांचीच फेर निवड होईल ? याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून याची उत्सुकता कार्यकर्त्यांच्या चर्चेतून शिगेला पोहचली आहे.
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : अनेक वर्षापासून भोकर काँग्रेस पक्षाच्या युवक तालुकाध्यक्ष,फादरबॉडी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सभापती जगदीश पाटील भोसीकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.शुन्यातून विश्व निर्माण करणारा काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या जगदीश पाटील यांनी माघील लोकसभा निवडणूकीत राज्याचे विद्यमान सा.बां.वि. मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्याने नैतिक जबाबदारी स्विकारुन तालुकाध्यक्ष पदाचा राजिनामा पक्षश्रेष्ठीकडे दिला होता.परंतु अद्याप तरी तो मंजूर झाल्याचे ऐकीवात नसले तरी आगामी नगर परिषद,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांतून तालुकाध्य बदलाच्या चर्चैचे वारे वाहू लागले आहे.तालुकाध्यक्ष पदासाठी बरेच नावे समोर येत असली तरी अंतिम मंजूरी ना.अशोक चव्हाण हेच देणार असल्याने तालुकाध्यक्ष हा मतदान प्रक्रियेतून ‘लोकशाहीतला’ निवडला जाणार का बंद पॉकेटमधून नियुक्तीने ‘मर्जीतला’ होणार ? का जगदीश पाटील यांचीच फेर निवड होईल ? याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून या पदाची ‘निवड’ होणार का ‘नियुक्ती’ ? याबाबदची चर्चा व उत्सुकता कार्यकर्त्यांतून शिगेला पोहचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्षांची निवड होणार असल्याचे सुतोवाच होत असल्याने काँग्रेस पक्ष भोकर नव तालुकाध्यक्ष कोण होणार याची चर्चा जोर धरत आहे.ना.अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील तालुकाध्यक्ष होणे हे अतिशय प्रतिष्ठेचे मानल्या जात असल्यामुळे काही जण आपले नाव स्वतः तर काही जण कार्यकर्त्यांच्या,समर्थकांच्या माध्यमातून स्पर्धेत आणत आहेत. तर ज्यांचे नाव चर्चेत आले आहे त्यांपैकी काही जण मी या स्पर्धेत नसून तशी मागणी पण केलो नाही असे स्पष्टीकरण देत आहेत.चर्चेत आलेल्या नावांत माजी सभापती नागनाथ घिसेवाड,जि.प.माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी सभापती गोविंद पाटील,जिल्हा समन्वय समिती सदस्य सुभाष पाटील किन्हाळकर,विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव अमृतवाड,सरपंच अत्रिक पाटील,संचालक रामचंद्र मुसळे,सुरेश डूरे पाटील,उज्वल केसराळे यांसह आदींचा समावेश आहे.यातील महत्वाचे म्हणजे विद्यमान तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर यांनी युवक तालुकाध्यक्ष,तालुकाध्यक्ष म्हणून जवळपास २५ वर्ष यशस्वीपणे पक्षाची जबाबदारी पार पाडली असल्यामुळे मी या स्पर्धेत नाही व नव अध्यक्षांचे मी स्वागत करेल असे सांगून मनाचा मोठेपणा दाखविला आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य माणूस व सामान्य कार्यकर्त्यांना घेवून चालणारा,विकास कामांसह अडल्या नडल्यांची ही कामे करणारा,पक्ष वाढीसाठी सदैव प्रयत्नशिल असणारा सच्चा कार्यकर्ता तालुकाध्यक्ष व्हावा असे प्रत्येकास अपेक्षित आहे.चर्चेत आलेल्या नावांतील अनेकजण पक्ष वाढीसाठी सक्षम आहेत व अपेक्षेस पात्र ही आहेत यात दुमत नाही.परंतु पक्षाचे काही ध्येय धोरणे ठरलेले व ठरत असतात.याच अनुशंगाने राजस्थान मध्ये व महाराष्ट्रातील शिर्डी येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या ‘चिंतन बैठकीत’ काही ध्येय धोरणे ठरली.त्यातील एक महत्वाचे म्हणजे “एक व्यक्ती एक पद” होय.आणि हे ठरले आहे ते पण ना.अशोक चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीतच.त्यामुळे ना.अशोक चव्हाण हे या ध्येय धोरणाचे नक्कीच पालन करतील यात शंका नाही असा विश्वास अनेकांतून व्यक्त होत असून असे झाल्यास चर्चेतील काही नावांना आपोआपच कात्री लागेल ? तसेच यातील काही जण अनेकवेळा पक्ष धरसोड केलेले अर्थातच पक्षांतर करुन परत घर वापसी केलेले आहेत. त्यामुळे ना.अशोक चव्हाण हे त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवतील यावर ही प्रश्नचिन्ह आहे,असे ही बोलल्या जात आहे.त्यामुळे यातील काहीजण आपोआपच गाळले जातील ?.याच बरोबर क्रियाशील व सामान्य पक्ष सदस्यांच्या मतदानातून तालुकाध्यक्ष निवडायचा म्हटलं तरी पक्षासाठी एक मोठी डोकेदुखी होणार आहे.ती म्हणजे मतदारांची संख्या ही मोठी आहे व निवडणूकीसाठी पुढे येणाऱ्यांत चर्चेत असलेल्यां व्यतिरिक्त अन्य कार्यकर्त्यांची नावे समोर येणार आहेत.लोकशाही मार्गाने मतदान प्रक्रियेतून नव तालुकाध्यक्ष निवडला गेला तर उत्तमच.जर ही प्रक्रिया डोकेदुखीची होईल असे वाटले तर पक्षश्रेष्ठी ही ‘त्या’ कार्यकर्त्यांतील गुणवत्ता,कार्यक्षमता,सक्षमता आदी बाबी परखुन अध्यक्षपदी नव नियुक्ती ही देऊ शकते.परंतु या प्रक्रियेतून एक धोका ही आहे,तो म्हणजे आपल्या मर्जीतला,काना पेक्षा काठी मोठी नको असलेल्यास नियुक्त केले असा आरोप ही होऊ शकतो व काही जणांचे मन दुखवल्यागेल्याने आगामी निवडणूकीत याचा परिनाम ही समोर येऊ शकतो.असे असले तरी येथील पक्षश्रेष्ठी म्हणजे ना.अशोक चव्हाण व त्यांचा निर्णय म्हणजे अंतिम बाब. यामुळे ते स्वतः किंवा त्यांच्या आदेशाने नव तालुकाध्यक्ष होऊ शकतो.तर ना.अशोक चव्हाण यांनी भेटीस आलेल्या कार्यकर्त्यांच्या शिष्ठमंडळास ही निवड मतदानातून होईल असे सांगितल्याचे ही बोलल्या जात आहे.मग नुतन अध्यक्ष मतदान प्रक्रियेतून ‘लोकशाहीतला’ असो अथवा बंद पॉकेटातून नियुक्तीने ‘मर्जीतला’ ? ही असू शकतो.या ऐवजी विद्यमान तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर यांचे पक्षासाठीचे योगदान पाहता ‘फेर निवड’ ही होऊ शकते?. त्यामुळे कोणाच्या नावावर शिक्का मोर्तब होईल हे आज घडीला तरी सांगता येणारे नाही.म्हणून नुतन तालुकाध्यक्ष पदाच्या नावाची उत्सुकता व चर्चा कितीही शिगेला पोहचली असली तरी अंतिम निर्णयाची अमलबजावणी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर हे करतील आणि यातूनच काँग्रेस पक्ष नुतन भोकर तालुकाध्यक्ष पदाची ‘निवड’ होणार का ‘नियुक्ती’? हे लवकरच पहावयास मिळणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या ‘अंतिम निर्णयाची’ अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.आणि शेवटी काय तर सामान्य पक्ष कार्यकर्त्याच्या नशिबी कोणीही नुतन तालुकाध्यक्ष होवो पक्षासाठी काम करत रहायचे आहे…तर मग चला नुतन तालुकाध्यक्ष कोण होणार याची वाट पाहुयात व त्यास शुभेच्छा ही देऊयात.