Wed. Dec 18th, 2024

‘आक्षेपाहर्य पोस्ट’ प्रकरणी भोकर येथील ‘युवकास’ न्यायालयीन कोठडी

Spread the love

‘त्या’ युवकाच्या वडीलांचे मेडिकल स्टोअर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

‘ते’ दुकान जाळण्याचा प्रयत्न करणा-यांच्या अटकेसाठी दि.१३ जून रोजी भोकर बंदचे आवाहन

अफवांवर विश्वास ठेऊ नये व कायदा,सुव्यवस्था, शांततेसाठी सहकार्य करावे-पो.वि.विकास पाटील

उत्तम बाबळे,संपादक

भोकर : दोन धर्मीयांत तेढ होईल अशी एक व्हायरल पोस्ट इंस्टाग्राम या समाज माध्यमावर स्टेटसमध्ये ठेवणा-या एका युवकाविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून भोकर न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.तर या पोस्टच्या निषेधार्थ मुस्लीम बांधवांनी स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती.तसेच ‘त्या’ युवकाच्या वडीलाचे मेडिकल स्टोअर जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अज्ञातां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील दुकान जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीस्तव व निषेधार्थ हिंदू बांधवांनी सोमवार,दि.१३ जून रोजी ‘भोकर बंद’ ठेवण्याचे आवाहन केले आहे. तर भोकर शहरात शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये व कायदा,सुव्यवस्था आणि शांततेसाठी पोलीस प्रशासनास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पो.नि.विकास पाटील यांनी केले आहे.

अधिक असे की,मोहंमद वासेफ बिलालोद्दीन रजीयोद्दीन इनामदार,रा.बिलाल नगर भोकर ता.भोकर यांनी दि.१० जून २०२२ रोजी रात्री भोकर पोलीसात तक्रार दिली की,रितेश गजानन अडकिणे रा.भोकर या युवकाने त्याच्या इंस्टाग्राम आय.डी.समाज माध्यमावर मुस्लीमांचे श्रद्धास्थान असलेले प्रेशित मोहंमद पैगंबर यांच्याविषयी एक आक्षेपाहर्य पोस्ट स्टेटसवर व्हायरल केली आहे.ती रात्री १०:०० वाजता माझ्या निदर्शनास आली असून या पोस्टमुळे माझ्यासह अनेकांच्या भावना दुखल्या आहेत.तसेच या पोस्टमुळे दोन धर्मीयांत तेढ निर्माण होऊ शकतो.त्यामुळे सदरील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा.यावरुन भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.विकास पाटील यांनी मध्यरात्री उपरोक्त उल्लेखीत युवकाविरुद्ध कलम २९५(अ), ५०५ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला व त्या युवकास तात्काळ ताब्यात घेतले.तसेच दि.११ जून २०२२ रोजी भोकर न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.तर या पोस्टचा निषेध म्हणून दि.११ जून २०२२ रोजी मुस्लीम बांधवांनी स्वयंस्फुर्तीने भोकर शहरातील आपली दुकाने दिवसभर बंद ठेवली होती.

‘त्या’ युवकाच्या वडीलांचे मेडिकल स्टोअर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

याच दरम्यानच्या काळात भावना दुखल्याने काही काळ तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती व काही संतप्तांनी ‘त्या’ युवकाच्या वडीलांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गजानन बाबा मेडिकल स्टोअर दुकान जाळण्याचा प्रयत्न केला.यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे चिन्ह दिसत होते.यावेळी आपले कौशल्य पणाला लाऊन अतिशय तत्परतेने पो.नि.विकास पाटील व त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.तसेच काही नागरिकांच्या मदतीने दुकानास लागलेली आग विझवली.या दुकान जळीत प्रकरणाबाबद सदरील दुकानचे मालक शरद धोडेराव अडकिणे,रा.भोकर यांनी दि.११ जून २०२२ रोजी भोकर पोलीसात तक्रार दिली की,दि.१० जून २०२२ रोजी रात्री १०:०० ते ११:०० वाजताच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर येथील माझे मेडिकल स्टोअर दुकान काही लोकांनी जाळण्याचा प्रयत्न केला असून या आगीत दुकानातील जवळपास ६० हजार रुपयाचे साहित्य व महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले आहेत.तरी ‘त्या’ आरोपींविरुद्ध कारवाई करावी.यावरुन कलम ४३५ भादवि प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी भेट दिली असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार एस.व्ही हनवते हे करत आहेत.

‘ते’ दुकान जाळण्याचा प्रयत्न करणा-यांच्या अटकेसाठी दि.१३ जून रोजी भोकर बंदचे आवाहन

आक्षेपाहर्य पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल झाला व त्या युवकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी ही झाली.त्याने केलेल्या चुकीसाठी न्याय व्यवस्था आहे आणि त्याच्या चुकीच्या कृत्याचे कोणीही समर्थन करणार नाहीत.भोकर शहरातील नागरिक हे शांततप्रिय आहेत.परंतु काही लोकांनी ही शांतता बिघडविण्याच्या हेतुने या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन गजानन अडकिणे यांचे मेडिकल स्टोअर जाळण्याचा प्रयत्न केला असून यामुळे भोकर शहरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.नव्हे तर दोन धर्मीयांत तेढ निर्माण करुन शहरातील कायदा, सुव्यवस्था व शांततेचा प्रश्न निर्माण करण्याचा ‘त्या’ लोकांचा हेतू असल्याचे निदर्शनास येत आहे,असे हिंदू बांधवांतून बोलल्या जात आहे.याच अनुशंगाने दि.११ जून २०२२ रोजी हिंदू बांधवांनी एका निवेदनाद्वारे ‘ते’ दुकान जाळण्याचा प्रयत्न करुन भोकर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ लोकांना त्वरीत अटक करण्यात यावी,अशी मागणी केली आहे.तसेच ‘त्या’ लोकांच्या अटकेसाठी व निषेधार्थ सोमवार,दि.१३ जून २०२२ रोजी भोकर बंद ठेवण्यात येईल असे आवाहन केले आहे.
सदरील मागणीचे निवेदन एका जंबो शिष्ठमंडळाने पो.नि. विकास पाटील यांना दिले असून या शिष्ठमंडळात प्रा.डॉ. व्यंकट माने,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे,माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के,तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर, शहराध्यक्ष विशाल माने,माजी शहराध्यक्ष संतोष मारकवार, संचालक गणेश कापसे पाटील,माजी नगरसेवक सुवेश पोकलवार,डॉ.राम नाईक,छावा संघटनेचे नेते शंकर पाटील बोरगावकर,मनसे तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार, शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष माधव पाटील वडगावकर, व्यापारी संघटनेचे सारंग मुंदडा,कल्पेश रायपत्रेवार, राष्ट्रवादीचे आनंद पाटील चिट्टे,दिलीप तिवारी,यांसह अनेक हिंदू बांधवांचा समावेश होता.

अफवांवर विश्वास ठेऊ नये व कायदा,सुव्यवस्था, शांततेसाठी सहकार्य करावे-पो.वि.विकास पाटील

आक्षेपाहर्य पोस्ट प्रकरणामुळे काही काळ तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात भोकर पोलीसांना शांततप्रिय नागरिकांच्या सहकार्यातून यश आले आहे.तर ती पोस्ट व्हायरल करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यास न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.याच बरोबर ‘ते’ दुकान जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ही लवकरच अटक करण्यात येईल व त्यांचे शोधकार्य सुरु आहे.त्यामुळे कोणीही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ही ठेऊ नये आणि काही आक्षेपाहर्य पोस्ट निदर्शनास आल्यास त्या परस्पर व्हायरल न करता पोलीसांशी संपर्क साधावा.त्या समाज माध्यम पोस्ट व्हायरलकर्त्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल,असे पो.नि.विकास पाटील यांनी आश्वस्त केले असून कायदा,सुव्यवस्था आणि शांततेसाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन ही केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !