नांदा(म्है.प.) येथील महिला सरपंच व तिचा शिक्षक पती लाच घेतांना अटक
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या या कारवाईतून भोकर तालुक्यातील विकास कामांतील ‘टक्केवारीचा’ भ्रष्टाचार आला चव्हाट्यावर
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.नांदा(म्है.प.) येथील स्मशानभूमीच्या कामातील टक्केवारीतला हिस्सा कंत्राटदारास मागणाऱ्या महिला सरपंच व तिच्या शिक्षक पतीस ५० हजार रुपयाची लाच स्विकारतांना लाच लुचपत विभाग नांदेडच्या पथकाने दि.१० जून रोजी रंगेहात पकडले असून ‘त्या’ दोघांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या कारवाईतून तालुक्यातील विकास कामातील ‘टक्केवारीचा’ भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
अधिक असे की,मौ.नांदा(म्है.प.) ता.भोकर येथील स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले.परंतु या गावच्या महिला सरपंच सविता आबन्ना दायलवाड(३१) व त्यांचे पती जिल्हा परिषद शिक्षक आबन्ना विट्ठल दायलवाड (३८) बेलपाडा,ता.शहापूर,जि.ठाणे रा.ह.मु.फ्लॅट क्र. २०१, बिल्डिंग क्र.०३,एलोट्री अपार्टमेंट,शहापूर,जि.ठाणे मूळ रा.नांदा (पट्टी म्हैसा),ता.भोकर,जि.नांदेड या दोघांनी केलेल्या शासकीय कामाचे थकीत बिल १३ लाख ४० हजार रुपयाच्या २२ टक्के प्रमाणे २ लाख ९८ हजार ८०० रुपयांची मागणी केली.यातील तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये तक्रारदार कंत्राटदाराने देण्याचे ठरले.अशी तक्रार सदरील कंत्राटदाराने दि.९ जून २०२२ रोजी लाच लुचपच प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याकडे केली.त्या तक्रारीची पडताळणी या विभागाने केली व ठरल्यानुसार त्यातील पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये दि.१० जून २०२२ रोजी उपरोक्त महिला सरपंच व तिचा शिक्षक पती हे स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
सदरील कारवाई लाच लुचपच विभाग नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे,अतिरिक्त पोलिस अधीक्षक धरमसिंग चव्हाण,पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीना बकाळ, अश्विनीकुमार महाजन,पो.ना.सचिन गायकवाड,प्रकाश श्रीरामे,शेख मुक्तार,बालाजी तेलंगे,चापोना निळकंठ यमुनवाड यांसह आदींच्या पथकाने साफळा रचून यशस्वी केली आहे.याप्रकरणी वरील महिला सरपंच व तिचा शिक्षक पती या दोघांविरुद्ध लाच लुचपत कायदा अंतर्गत विविध कलमांनुसार भोकर पोलुसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाच लुचपत प्र.वि.नांदेडच्या पो.नि. मीना बकाल या करत आहेत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या या कारवाईतून भोकर तालुक्यातील विकास कामांतील ‘टक्केवारीचा’ भ्रष्टाचार आला चव्हाट्यावर
राज्याचे सा.बां.वि.मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघात विकास कामांसाठी कोट्यावधींचा निधी आणला असून अनेक गावांत विकासात्मक कामे उत्कृष्ट व दर्जेदार अशी होत आहेत.तर नांदा (म्है.प.) येथे झालेल्या कामाबाबद या कारवाईतून गालबोट लागले आहेत.एरवी अधिकारी व कर्मचारी हेच लाच मागतात अशी वल्गना अधिक होते.परंतु काही लोकप्रतिनिधी ही मागे नसतात हे झालेल्या या प्रकरणातून निदर्शनास येत आहे.नव्हे तर या कारवाईतून भोकर तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी हे विकास कामातील ‘टक्केवारी’ मागतात,ही ‘टक्केवारीच्या’ भ्रष्टाचाराची बाब चव्हाट्यावर आली आहे.यामुळे मतदार संघाचे सर्वेसर्वा असलेल्या ना.अशोक चव्हाण यांनी यावर आळा घालण्यासाठी अधिकचे लक्ष देण्याची गरज आहे, असे अनेक सुजाण नागरिकांतून बोलल्या जात आहे.