मातुळ येथे कर्तव्यावरील तलाठ्यास झाली मारहाण…
भोकर पोलीसात चौघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.मातुळ येथील चौघांनी कर्तव्यावर असलेल्या एका तलाठ्यास जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केली असून या प्रकरणी ‘त्या’ चौघांविरुद्ध भोकर पोलीसात शासकीय कामात अडथळा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक असे की,भोकर तहसिल कार्यालयांतर्गत मातुळ साजा येथे सेवारत असलेले तलाठी नामदेव ग्यानोबा मुळेकर हे दि.१० जून २०२२ रोजी दुपारी १:४५ वाजताच्या सुमारास मंडळ अधिकारी यांच्या समवेत एक वादातीत शेतस्थळ पाहण्यासाठी मातुळ शिवारातील गायरान गट नं. १२० मधील भोजराम गंगाराम टोपलवाड याच्या शेतात गेले असता तोकलवाड यांच्याविरुद्ध महसूल कारवाही झाल्याच्या कारणाचा मनात राग धरुन तलाठी नामदेव मुळेकर हे मातंग समाजाचे आहेत हे माहीत असतांना देखील जातीवाचक व अश्लील शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली आणि नागोराव गंगाधर टोपलवाड, शंकर नागोराव टोपलवाड,गणेश नागोदाम टोपलवाड, पांडरंग गंगाधर टोपलवाड,सर्व जण रा.मातुळ ता.भोकर यांनी संगनमत करुन लाकडाने तलाठी नामदेव मुळेकर यांना पाठीवर,हातावर, छातीवर मारुन गंभीर दुखापत केली.तसेच यानंतर जर तू येथे आलास तर तुझ्या घरी येऊन तुला खतम करुन टाकील म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.
सदरील घटनेची माहिती भोकरचे कर्तव्यदक्ष तहसिलदार राजेश लांडगे यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहचले व भोकर पोलीसांना घटनास्थळी बोलाऊन घेतले.पो.नि. विकास पाटील, पो.चप.नि. दिगांबर पाटील व अन्य पोलीस कर्मचारी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी जाऊन ‘त्या’चौघांना ताब्यात घेतले.तर तहसिलदार राजेश लांडगे व महसूल कर्मचारी संघटनेने या मारहाण घटनेचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला आहे.तसेच तलाठी नामदेव मुळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. २००/२०२२ कलम ३५३,३३२,३४१,३२३,५०४,५०६,३४ भादवि व सहकलम ३(१)(०१)(३) अनुसूचित जाती जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायदा प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पुढील अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील या करत आहेत.