भोकर येथे अनैतिक संबंधातून महिलेचा खून
भोकर पोलीसांनी अवघ्या ६ तासात तेलंगणा राज्यातून आरोपीस केले जेरबंद
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहराबाहेरील भोकर-उमरी रस्त्यावरील रायखोड शिवारात एका ४५ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून मारलेला मृतदेह दि.२५ एप्रिल रोजी सकाळी निदर्शनास आला असून सदरील महिलेचा अनैतिक संबधातून खून झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.यावरुन भोकर पोलीसांनी तपासचक्र गतिमान करुन ‘त्या’ आरोपीस अवघ्या ६ तासाच्या आत तेलंगणा राज्यातून जेरबंद केले असून त्याच्या विरुद्ध भोकर पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असेकी,भोकर-उमरी रस्त्यावरील मनजीत कॉटन मिल समोरील रायखोड शिवारातील नाल्या जवळ दि.२५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह त्या परिसरातील शेतकरी व काही नागरीकांच्या निदर्शनास आला.याबाबत भोकर पोलीसांना माहिती प्राप्त झाल्यावरुन पो.नि. विकास पाटील व त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चमू घटनास्थळी पोहचला व त्या महिलेचा दगडाने ठेचून खून केला असल्याचे त्यांनी पाहिले.यावेळी सदरील मयत महिला कोण आहे ? याची ओळख त्यांना पटली.यावरुन प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.रसूल तांबोळी,पो.उप.नि.अनिल कांबळे, पो.उप.नि.दिगंबर पाटील,महिला पो.उप.नि.राणी भोंडवे आणि आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासचक्र गतीमान केले असता भोकर शहरातील एका बियर बारमध्ये नौकरी करत असलेल्या सखाराम आडे रा.भोकर यांची ती पत्नी शोभाबाई सखाराम आडे(४५) असल्याचे निष्पन्न झाले.अधिक चौकशी केली असता तिचे माहेर शिवणी ता. हिमायतनगर येथील सुरेश आडे नामक व्यक्ती सोबत तिचे अनैतिक संबंध होते व ती गेल्या एक वर्षापूर्वी त्याच्या सोबत पळून गेली होती असे ही समजले.ती परत आली व पती सोबत भोकर येथे राहू लागली. याच दरम्यान एक दिवसापूर्वी सुरेश आडे याने तिला भोकर येथील घरुन एका दुचाकीवरुन नेले होते अशी माहिती पुढे आली.परंतु दि.२५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी तिचा दगडाने ठेचून मारले असलेला मृतदेह सापडला.तो पोलीसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी भोकर ग्रामीण रुग्णालयात पाठविला असता सदरील खून दि.२५ एप्रिल रोजी पहाटे ४:०० ते सकाळी ८:०० वाजताच्या दरम्यान झाला असावा असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिका-यांनी वर्तविला असून मयत महिलेला २ मुली व १ मुलगा आहे.
भोकर पोलीसांनी अवघ्या ६ तासात तेलंगणा राज्यातून आरोपीस केले जेरबंद
उपरोक्त माहितीनुसार आरोपीच्या शोधार्थ पो.उप.नि.अनिल कांबळे व पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक गतिमान झाले असता ‘तो’ आरोपी तेलंगणा राज्यात असल्याची गोपनिय माहिती मिळाली.या माहितीवरुन सदरील पथकाने बेलगम,म्हैसा मंडळ (तेलंगणा राज्य) येथून एका दुचाकीसह आरोपी सुरेश आडे यास अवघ्या ६ तासाच्या आत जेरबंद केले.त्या महिलेचा मृतदेह सापडल्याच्या अवघ्या काही तासात आरोपीस जेरबंद करण्यात या पोलीस पथकास यश आल्याने पथक प्रमुख पो.उप.नि.अनिल कांबळे व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.तर सदरील बातमी लिहत असतांना हे पथक ‘त्या’ आरोपीस भोकरला घेऊन येत असल्याचे समजले असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी सुरेश आडे विरुद्ध भोकर पोलीसात खुनाचा गुन्हा दाख करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.