Mon. Dec 23rd, 2024

वर्ल्ड व्हिजन ही गरीब व उपेक्षितांना आधार देणारी संस्था आहे-राजेंद्र खंदारे

Spread the love

वर्ल्ड व्हिजन तर्फे भोकर मध्ये ६० दिव्यांगांना मोफत व्हिलचेअरचे झाले वाटप

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शिक्षण,आरोग्य,कृषि,स्वच्छता अशा आदी क्षेत्रात अविरत सेवाभावी कार्य करणारी व गरीब आणि उपेक्षितांना आधार देणारी संस्था म्हणजेच वर्ल्ड व्हिजन इंडिया होय,असे प्रतिपादन भोकर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी व्यक्त केले.वर्ल्ड व्हिजन इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने दि.२४ मार्च रोजी पंचायत समिती भोकरच्या सभागृहात दिव्यांगांसाठी आयोजित आरोग्य शिबीर व व्हीलचेअर वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

वर्ल्ड व्हिजन इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने दि.२४ मार्च २०२२ रोजी पंचायत समिती भोकरच्या सभागृहात दिव्यांगासाठी आरोग्य शिबीर व मोफत व्हीलचेअर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांची तर अध्यक्ष म्हणून भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड यांची उपस्थिती होती. तर वर्ल्ड व्हिजन संस्थेचे शाखा अधिकारी श्याम बाबू पट्टापू, नांदेड येथील वरिष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ.शुभांगी पाटील,डॉ. प्रणव भोसले,वर्ल्ड व्हिजनचे अपंग समन्वयक इबेझ जॉर्ज( भोपाळ),सेवा समर्पणचे सचिव विठ्ठल फुलारी व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष ॲड.शेखर कुंटे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

भोकर तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित असलेल्या या शिबीर तथा कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी वर्ल्ड व्हिजनचे श्याम बाबू पट्टापू यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली.यात वर्ल्ड व्हिजन ही संस्था दुर्लक्षित आणि असुरक्षित कुटुंबांसाठी काम करत असून या संस्थेने प्रोव्हिजन एशिया यांच्या सहकार्याने व्हीलचेअर मिशन उपक्रमातून मोफत व्हीलचेअर वाटप आणि या शिबिराचे आयोजन केले असल्याचे सांगितले.तसेच दिव्यांग,गरजू व्यक्ती,ज्यांना चालता येत नाही अशांना व्हीलचेअर देण्याचे उदिष्ट असल्याचे सांगितले.तर अध्यक्षिय समारोप करतांना गटविकास अधिकारी अमित राठोड यांनी गरिबांच्या उन्नतीसाठी वर्ल्ड व्हिजन ही संस्था काम करत असल्याने त्यांचा सेवाभाव हा कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली.तसेच उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे हे पुढे म्हणाले की,वर्ल्ड व्हिजन नेहमीच गरीब व उपेक्षितांना आधार देत असून त्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात देत आहे.तसेच शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येईल,त्यासाठी प्रशासन स्तरावर आम्ही प्रयत्न करू,याचा लाभ पालकांनी घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.याच बरोबर या संस्थेने अपंग मुलांची व प्रौढांची काळजी घेतली आणि त्यांना साधने उपलब्ध करुन दिली. त्यांच्या या वचनबद्धतेचे कौतुक करत भोकर तालुक्यात वर्ल्ड व्हिजन ही अत्यंत कौतुकास्पद सेवा देत असल्याने वर्ल्ड व्हिजनच्या सर्व टीमचे त्यांनी अभिनंदन ही केले.

या शिबीर प्रसंगी ६० दिव्यांग लाभार्थींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.तसेच सर्व मान्यवरांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना त्याचा योग्य वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रतीलाल वळवी यांनी केले.तर वर्ल्ड व्हिजनचे कर्मचारी प्रकाश फुलझेले यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदरील शिबीर यशस्वितेसाठी श्रीनिवास प्रवीण गाडे,इमा गावित,बिबीचंद्र जाधव यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !