Mon. Dec 23rd, 2024

साहित्यिकांनी स्त्रियांच्या शोषण मुक्तीसाठी लेखणी उचलली पाहिजे-डॉ.स्नेहा महांबरे

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

अहमदपूर : वसाहतवादी धोरणामुळे जगात सर्वत्रच स्त्रियांना गुलाम करण्याची मानसिकता वाढत असून,स्त्रियांना सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त करण्यासाठी लेखकांनी लेखणी उचलली पाहिजे,असे प्रतिपादन स्त्रीवादाच्या जेष्ठ अभ्यासक व संशोधक डॉ.स्नेहा महांबरे ( गोवा ) यांनी केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि मराठी विभाग महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ” जागतिक स्त्रीवाद आणि मराठी साहित्य” या विषयावरील आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्रात बीज भाषक म्हणून त्या बोलत होत्या.

गुगल मीटवर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा प्रसिद्ध लेखक,समीक्षक डॉ.वसंत बिरादार पाटील हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी,संचालक पृथ्वीराज पाटील एकंबेकर हे उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना डॉ.स्नेहा महांबरे म्हणाल्या की,आधीच वसाहतवादी मानसिकता होती,त्यात जागतिकीकरणाची भर पडलेली असून, त्यामुळे स्त्रियांच्या शोषणाचे ही जागतिकीकरण झाले आहे. पुरुष सत्ताक राजकारणाचा परिणाम स्त्रियांवर होत असून,स्त्रियांना गुलाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जगातील सर्व लेखकांनी एकत्र येऊन समतेची चळवळ उभी केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

चर्चा सत्राच्या दुसऱ्या भागात अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ.मोना चिमोटे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.अनुजा पाटील- पटणे(कॅलिफोर्निया, अमेरिका),डॉ.मंदाकिनी मेश्राम ( अमरावती),डॉ.कीर्ती गोयल ( बेंगळुरू) आणि शेख शफी बोल्डेकर ( हिंगोली) या संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले.चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की,मराठी साहित्याला स्त्रीवादाची प्राचीन काळापासून परंपरा लाभली असून,महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदायांनी स्त्रियांना धार्मिक स्वातंत्र्य देऊन स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू केली.त्यामुळे महदंबा,कान्होपात्रा,जनाबाई अशा संत कवयित्रींनी स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा उद्घोष केला आहे.

या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला दोनशेहून अधिक विद्यार्थी, अभ्यासक व संशोधक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.मारोती कसाब यांनी केले,तर सुत्रसंचालन संयोजक डॉ.अनिल मुंढे यांनी केले आणि आभार कु.क्रांती राठोड यांनी मानले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !