प्रधुम्न कांबळेची निर्घुण हत्या करणा-यांना फाशीची शिक्षा द्यावी
ॲट्रॉसिटी ॲक्ट संरक्षण समन्वय समिती जिल्हा नांदेडच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विविध मागण्यांचे पाठविण्यात आले निवेदन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : गोखले नगर,पुणे येथील मातंग समाजातील प्रधुम्न कांबळे या तरुणाची जातीवादी मानसिकतेतून सवर्णांनी निर्घुण हत्या केली आहे.सदरील निंदनिय घटनेचा ॲट्रॉसिटी ॲक्ट संरक्षण समन्वय समिती जिल्हा नांदेडच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येऊन या गुन्ह्यातील सर्व आरोपी विरुद्ध खून,मोक्का आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा(ॲट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा आणि सी.आय.डी.मार्फत उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी.तसेच हे अमानवी कृत्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,अशा आदी मागण्यांचे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दि.२२ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठविण्यात आले आहे.
संत,महंत,महापुरुष अशा आदींच्या प्रेरणादायी तथा पुरोगामी विचारासह शिक्षणातून विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहरास सर्वत्र ओळखले जाते.परंतु,याच शहरातील जातीवादी मानसिकता मात्र अद्यापही संपली नसल्याचे चित्र सातत्याने पहावयास मिळत आहे.जातीवादी मानसिकतेतून नुकतीच एक निंदनिय तथा गंभीर घटना येथे घडली आहे. गोखले नगर,पुणे १६ येथील मातंग समाजातील प्रधुम्न कांबळे या तरुणाचे याच शहरातील प्राजक्ता पायगुडे या सवर्ण समाजातील मुलीसमवेत प्रेमसंबंध होते.ही बाब मुलीच्या आई,वडील,भाऊ आणि इतर नातेवाईकांना जातीयव्देषातून खटकत होती.यामुळेच जातीवादी मानसिकतेतून या मुलीच्या परिवाराने प्रधुम्न कांबळे यास कायमचे संपविण्याचा कट रचला.या मुलीकरवी फोन, व्हीडीओ कॉल करून प्रधुम्न कांबळे यास बोलावण्यात आले व त्याचे डोळे फोडण्यात आले,गुप्तांग कापण्यात आले आणि निर्घुणपणे हत्या करण्यात आली.एवढेच नाही तर त्यास बेवारस घोषित करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न ही करण्यात आला.
आरोपींचे हे कृत्य पुरोगामी महाराष्ट्राला,महाराष्ट्रातील महापुरुषांचा प्रेरणादायी विचांरांना व महाराष्ट्राच्या सुशासनाला कलंकित करीत कायदा पायदळी तुडवण्याचाच एक प्रकार आहे.सदरील कृत्य हे अमानवी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने या प्रकरणाची व पोलीस यंत्रणेच्या हलगर्जीपणाची तातडीने गंभीर दखल घेऊन ‘सी.आय.डी.’ मार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी.तसेच या गुन्ह्यातील सर्व आरोपींना कठोरातील कठोर अर्थातच फाशीची शिक्षा व्हावी,अशी आग्रही मागणी ॲट्रॉसिटी ॲक्ट संरक्षण समन्वय समिती जिल्हा नांदेडच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दि.२२ मार्च २०२२ रोजी एका निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने केली असून सदरील निवेदनावर समितीचे महासचिव सतिश कावडे,प्रा.डॉ.विठ्ठल भंडारे,परमेश्वर बंडेवार,रामराव महाराज भाटेगावकर,ॲड.शिवराज कोळीकर,शाहीर आनंद किर्तने,शिवाजी नुरुंदे,प्रविण बसवंते,आनंद देगावकर,सुरेश कांबळे,एस.डी.दामोदर, इंजि.गायकवाड,ॲड.बादलगावकर यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.