शिक्षण पंढरीचे वारकरी अजातशत्रू व्यक्तिमत्त्व कै. प्रा.विजयकुमार पाटील उर्फ नाना
उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै.प्रा.विजयकुमार पाटील शिरोळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा डॉ.मारोती कसाब यांचा हा लेख खास आमच्या वाचकांसाठी देत आहोत.- संपादक
अंबुज प्रहार विशेष-प्रासंगिक
” माय बापहो,घरातली जेवण्याची ताटं विका;पण आपल्या लेकरांना शाळा शिकवा “असे कळकळीने सांगत स्वच्छतेबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन आणि शैक्षणिक जागरण करत राष्ट्रसंत गाडगे महाराज इ.स. १९४० -५० च्या काळात मराठवाड्यात फिरत होते.रझाकारांच्या त्रासाने वैतागलेले लोक गाडगेबाबांच्या कीर्तनाने स्वतःला सावरून घेत.आपल्या दुःखाचे कारण आपले अज्ञान,अविद्या हेच असून ते घालवण्यासाठी भावी पिढी सुशिक्षित होणे आवश्यक आहे,हे गाडगेबाबांनी लोकांना पटवून दिले होते.हेच विचार बापूसाहेब पाटील एकंबेकर,तुकाराम पाटील,ॲड.बळवंतराव खानापूरकर,दत्तुगीर गुरुजी तोंडचिरकर यांना पटले होते.म्हणूनच त्यांनी उदगीरला एक शेतकरी-शेतमजूर,कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी ‘ किसान विद्यार्थी वसतिगृह ‘ काढले होते.हे सर्वजण खेड्यापाड्यात जाऊन वसतिगृहातील शिकणाऱ्या मुलांसाठी धान्य गोळा करीत असत. गावकऱ्यांना चावडीवर बोलावून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत. आपल्या सोयऱ्या धायऱ्यांनाही विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शिक्षणाचे महत्त्व सांगत असत.
निलंगा तालुक्यात मांजरा नदी काठी वसलेल्या लहानशा गावात म्हणजेच शिरोळ( वांजरवाडा) याठिकाणी नानांचा जन्म झाला. नानांचे वडील बाबाराव पाटील हे शिक्षणावर प्रेम करणारे होते. त्यांनी स्वतःची जागा देऊन गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले.कारण गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे या हेतूने.हाच वारसा पुढे नानांनीही चालवलेला आहे.बाबाराव पाटील हे बापूसाहेबांचे जवळचे नातेवाईक. शिवाय तेही बापूसाहेबांचे समविचारी.बाबाराव पाटील यांचे चिरंजीव विजयकुमार पाटील हेही लहानपणापासूनच शिक्षणात हुशार आणि अभ्यासू होते.जन्मगावी जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी बाबाराव पाटील यांनी त्यांना उदगीरच्या विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये प्रवेश दिला.१९६६ साली ‘पीयुसी’ साठी ते औरंगाबाद येथे गेले. ‘पीयुसी’ झाल्यानंतर पदवीचे शिक्षण त्यांनी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात घेतले आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी थेट नागपूर गाठले. नागपूर विद्यापीठातून एम.ए.झाल्याबरोबर त्यांची उदगीरच्या श्री.हावगीस्वामी महाविद्यालयात लोकप्रशासन विषयाचे अधिव्याख्याता म्हणून निवड झाली.३७ वर्षाच्या सेवा काळामध्ये त्यांनी हावगीस्वामी महाविद्यालयात केवळ लोकप्रशासन विषय शिकवायचे कार्य केले नाही; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथील विद्यापीठाच्या विविध समित्यांवरही कार्य केले आहे.ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्षही राहिले आहेत.विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदीही निवडून येऊन त्यांनी विद्यापीठ विकासामध्ये भरीव योगदान दिलेले आहे.उदगीरचे कायम रहिवासी झाल्यामुळे त्यांची किसान शिक्षण प्रसारक मंडळाशी पुन्हा जवळीक निर्माण झाली. १९७८ साली ते किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य बनले. त्यानंतर आयुष्याच्या अखेरपर्यंत किसान शिक्षण प्रसारक मंडळाशी एकनिष्ठ राहून त्यांनी उदगीर- अहमदपूर-देवणी- चाकूर परिसरात शैक्षणिक चळवळ चालविली आणि संस्था जीवाजतन सांभाळलीही.
पश्चिम महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील,बार्शी -सोलापूर परिसरात कर्मवीर मामासाहेब जगदाळे,मराठवाड्यात विनायकराव पाटील आणि विदर्भात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी जी शैक्षणिक चळवळ चालवली,तशीच चळवळ उदगीर लगतच्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागामध्ये भाई बापूसाहेब पाटील एकंबेकर,ॲड.पी.जी.पाटील एकंबेकर, दत्तुगिर तोंडचिरकर,तुकाराम पाटील तादलापूरकर,ॲड. बळवंतराव खानापूरकर यांच्यानंतर अशोकराव पाटील एकंबेकर, ॲड.सी.पी.पाटील आणि प्रा.विजयकुमार पाटील,ज्ञानदेव झोडगे गुरुजी,नामदेवराव चामले मामा आदींनी त्याच निष्ठेने चालवली आहे. १९७८ साली जेव्हा प्रा.विजयकुमार पाटील हे संस्थेचे सदस्य बनले,तो काळ म्हणजे संस्थेच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. शिक्षणक्षेत्रात स्वतः प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव संस्थेसाठी कामी आला.सर्व ज्येष्ठ सभासद एक उच्चविद्याविभूषित, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत असत. १९८७ साली त्यांनी संस्थेच्या सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.१९८७ ते १९९३ या सहा वर्षांच्या काळात प्रा.विजयकुमार पाटील यांनी सचिव म्हणून संस्थेच्या विकासात भरीव योगदान दिले.याच काळात उदगीरला शिवाजी महाविद्यालया शेजारी जिजामाता विद्यार्थिनी वसतिगृहाची भव्य इमारत साकार झाली.किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी संस्थेच्या वतीने त्यांनी केलेले प्रयत्न अत्यंत उपयुक्त ठरले. त्यानंतरच्या काही काळात सातत्याने ते मंडळामध्ये सहसचिव,संचालक म्हणून सक्रिय राहिले. २०१७ साली त्यांची निवड किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी झाली.दुर्दैवाने अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी त्यांना फार कमी कालावधी लाभला.पण या अल्पकाळातच नानांनी किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या विकासात मोठी भर घातली त्यांनी मंडळाच्या विविध शाळा व महाविद्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करवून घेतले.
तसेच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना सुविधा मिळाव्यात यासाठी ते सतत प्रयत्न करीत राहत.प्रा.विजय कुमार पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने संत कबीर बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली.आज या संस्थेच्या दोन शाळा होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अविरतपणे आधुनिक व दर्जेदार शिक्षण देत आहेत.गत वर्षी अचानक २८ मार्च २०२१ रोजी अल्प आजाराने त्यांचे निधन झाले.आज तिथीनुसार त्यांचा पहिला स्मृतिदिन आहे.त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक,राजकीय क्षेत्रात नाना म्हणूनच ओळखले जाई.शिक्षकांपासून ते प्राचार्यांपर्यंत सर्वजण त्यांना आदर देत.नानांचे वलय फक्त संस्थेपुरतेच नव्हते; तर एकूणच शिक्षण क्षेत्रात, राजकारणात आणि समाजकारणातही त्यांचा दबदबा होता.नानांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण,खासदार अरविंदजी कांबळे यांचा विश्वासू व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणूनही कार्य केले आहे. एवढेच नाही तर शंकरराव चव्हाण साहेबांनी तत्कालीन काळात विविध जबाबदाऱ्या सुद्धा त्यांना दिलेल्या होत्या. त्यांच्याजवळ भेदभाव नव्हता.समता,स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुभाव या लोकशाही मूल्यांवर त्यांचा ठाम विश्वास होता.एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि संस्थाचालक म्हणून नानांनी केलेले कार्य अजरामर राहील.सर्वधर्म समभाव दृष्टिकोनामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अजातशत्रू अशा स्वरूपाचे होते. विविध क्षेत्रातील मित्र त्यांना लाभलेले होते.जन्मजात वैभव लाभलेले असतानाही नानांनी कधी मोठेपणा मिरविला नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते समाजात शिक्षणाचे महत्त्व रुजविण्यासाठी झटत राहिले.थोर शिक्षणतज्ज्ञ भगवान सिंग बयास गुरुजींना ते आपला आदर्श मानत.आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ते नेहमीच प्रेरणा देत असत.गोरगरीब,सामान्य शेतकरी- कष्टकऱ्यांच्या मुलांना गुणवत्तायुक्त दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कायम स्मरणात राहतील.सर्वसामान्य माणसाला शिक्षणाच्या माध्यमातून स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी उभे करणे हेच नानांचे ध्येय होते.ते पूर्णत्त्वास घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.प्रथम स्मृतिदिनानिमित्त नानांना विनम्र अभिवादन..!
डॉ.मारोती कसाब,
महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि.लातूर