निरीक्षण आणि संदर्भासह मूर्ती अभ्यास हवा-डॉ. कुमुद कानिटकर
भारतीय मूर्ती आणि स्थापत्य संशोधन परिषदेचे दुसरे अधिवेशन मंडणगड येथे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मूर्तीचा अभ्यास करताना बाह्य रूपामध्ये गुंतू नका, सूक्ष्म निरीक्षण,प्रतिमेची ग्रांथिक लक्षणे आणि स्थानिक मंदिराची पार्श्वभूमी या आधारे मूर्त्यांचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ मूर्ती शास्त्र अभ्यासक डॉ.कानिटकर यांनी केले.त्या मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात आयोजित मूर्तिशास्त्र व स्थापत्य विषयावरील राष्ट्रीय परिषदेत मधील बीजभाषणाची मांडणी करताना बोलत होत्या.
भारतीय मूर्ती आणि स्थापत्य परिषदेचे दोन दिवसीय अधिवेशन व त्यानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील संशोधन परिषद दि.११ व १२ मार्च या दरम्यान होत असून यात देशभरातील मान्यवर इतिहास,शिल्प,स्थापत्य तज्ञ तसेच अभ्यासक-विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
“ओळख मूर्तीशास्त्राची”- या व्हॉट्सअप ग्रुपवरून भारतीय मूर्तीशास्त्र विषयी माहितीची देवाण घेवाण व अभ्यास या विषयी चर्चा केली जाते.या माध्यमातून अभ्यासकांनी एकत्र येऊन मूर्तिशास्त्र संशोधन संस्था नोंदणी केली.या संस्थेच्या अंतर्गत भारतीय मूर्ती शास्त्र आणि स्थापत्य संशोधन परिषद स्थापन करण्यात आली.या अनोख्या विचारपीठावर गेल्या वर्षी प्रथम अंजनगाव सुर्जी (जि.अमरावती) येथे मूर्तीशास्त्र व स्थापत्य या विषयावर पहिली परिषद पार पडली होती.या वर्षी संस्थेने मंडनगढ (जि. रत्नागिरी) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांच्या कडे यजमानपद देऊन दुसऱ्या ई-परिषदेचे आयोजन केले आहे.
या निमित्ताने दि. ११ व १२ मार्च रोजी “प्राचीन चित्रकला, लयन,स्तूप व मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्र” या वैचारिक गाभ्याला अनुषंगून या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले जात आहे.यानिमित्ताने भारताचा अनमोल पण अप्रतिम वारसा ठरलेल्या मूर्ती आणि स्थापत्य कलेला बोलते करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.महाराष्ट्र तसेच देशभरातील संशोधक,अभ्यासक, प्राध्यापक-विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत.
या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.प्रभाकर देव म्हणाले की,ग्रांथिक परंपरेबरोबरच मूर्तींचे लोकवाङ्मयीन अवलोकन करणे हेच परिषदेचे यश आहे.या बाबत इतिहास परिषद व अभ्यासक यांचे अभिनंदन! मंदिरातील धार्मिक बाबींबरोबरच लौकिक जीवनाची ऐतिहासिक मांडणी या आधारे करता येणे अत्यावश्यक आहे.त्याचबरोबर विविध सत्रासाठी प्रमुख म्हणून औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ.दुलारी कुरेशी,पुणे येथील डॉ. पुष्कर सोहनी तसेच डॉ.श्रीकांत प्रधान आदी मान्यवर विविध सत्रनिहाय विषयांवर मार्गदर्शन केले. याबाबतची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ.प्रभाकर देव व सचिव डॉ.नितीन सराफ यांनी दिली.
प्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव यांनी उद्घाटन समारंभात मनोगत व्यक्त केले.प्रसंगी मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ.अरविंद सोनटक्के,लक्ष्मीकांत सोनवटकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ.ज्योती पेठकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.साळुंखे यांनी केले.लयन स्थापत्य विषयावरील सत्राचे संयोजन डॉ.गार्गी योगानंद यांनी केले.तर स्थापत्य विषयावरील सत्राचे संयोजन डॉ. नितीन सराफ यांनी केले.