स्त्री,शूद्रांसह शेतकऱ्यांचा सन्मान करणारा रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवराय-डॉ.प्रशांत बिरादार
डॉ.मारोती कसाब-अहमदपूर
अंबुज प्रहार : जगाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले,मात्र त्यापैकी एकाचीही जयंती एवढ्या मोठ्या साजरी केली जात नाही.लोक उस्फूर्तपणे छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतात.कारण शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य हे प्रत्यक्षात रयतेचे राज्य म्हणजेच लोकांचेच राज्य होते.भारताच्या इतिहासात प्रथमच छत्रपती शिवरायांनी स्त्री,शूद्रांसह शेतकऱ्यांचा सन्मान केला,असे प्रतिपादन संस्कृत भाषेचे पंडित, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत बिरादार यांनी केले.येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप करिअर अकॅडमीचे संचालक उद्धवराव इप्पर हे उपस्थित होते.यावेळी विचार पीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.डी.डी.चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ.मोरे यांची ही उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ.प्रशांत बिरादार म्हणाले की,छत्रपती शिवरायांचे प्रशासन हे पूर्णपणे लोकहिताचे होते.म्हणूनच राजासाठी मरणारी माणसं या काळात तयार झाली.आपण मेलो तरी चालेल,पण आपला राजा वाचला पाहिजे,अशा प्रकारची भूमिका त्या काळातील लोक घेत होते.शिवशाही हीच लोकशाहीची सुरुवात होती,असेही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की,छत्रपती शिवरायांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्या आई-वडिलांबद्दल कृतज्ञता बाळगली.आज कालच्या पिढीने शिवरायांचे अनेक गुण घेतले पाहिजेत हे खरे आहे.तरीही त्यातील आई-वडिलांची सेवा करणे हा गुण घेतला तरी शिवजयंती साजरी झाल्याचे सार्थक होईल,असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातर्फे शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.’कोरोना आणि बदलते जग’ या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत राज्यभरातील ७० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेतील पाच हजार एकावन्न रुपयांचे पहिले बक्षीस नाशिक येथील एच.पी.टी.आर्ट्स आणि आर.वाय.के.सायन्स महाविद्यालयाच्या वैष्णवी शरद गायकवाड या विद्यार्थिनीने पटकावले.तर तीन हजार एकावन्न रुपयांचे दुसरे बक्षीस निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या रचना राजेंद्र हजारे हिने पटकावले.तृतीय क्रमांकाचे रोख दोन हजार एकावन्न रुपयांचे बक्षीस अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सुमित्रा नागनाथ पारखे या विद्यार्थिनीने पटकावले.निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेसह प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले.
यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा विद्यापीठ स्तरावर गुणवत्ता सिद्ध करून केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल अहमदपूर येथील ‘ स्पर्श द इन्फोटेक टच सेवाभावी संस्था’ अंतर्गत चालणाऱ्या ज्ञानदीप करिअर अकॅडमीच्या वतीने सर्व प्राध्यापकांना टेबल टॉप व पेन स्टँड देऊन ज्ञानदीप करिअर अकॅडमीचे संचालक उद्धवराव इप्पर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्यावतीने डॉ.बब्रुवान मोरे यांनी संपादित केलेल्या ‘लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र व समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.अतिश आकडे यांनी केले.प्रास्ताविक संयोजक डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले,तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी,विद्यार्थी,पालक ‘कोविड -१९’ चे नियम पाळून उपस्थित होते.