भोकर पोलीसात एम. आय.एम.कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल
सार्वजनिक ठिकाणी सामाजिक शांतता भंग करणारे केले होते प्रक्षोभक विधान
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : उत्तर प्रदेशात ए.आय.एम.आय.एम.चे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या चारचाकी वाहनावर झालेल्या गोळीबाराच्या भ्याड हल्ल्याचा दि.४ फेब्रुवारी रोजी भोकर येथे निषेश व्यक्त करतांना सार्वजनिक ठिकाणी सामाजिक शांतता भंग करणारे प्रक्षोभक विधान केल्याची भोकर तालुका भाजपा व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी तक्रार दिल्यावरुन दि.८ फेब्रुवारी रोजी भोकर पोलीसात ए.आय.एम.आय.एम. च्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ए.आय.एम.आय.एम.पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर असतांना दि.४ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी पिलखुआ टोलनाक्याजवळ काही अज्ञान व्यक्तींनी त्यांच्या चारचाकी वाहनावर भ्याड गोळीबार हल्ला केला. सदरील घटना ही निंदनीय असल्याने देशात विविधस्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.त्याचे पडसाद महाराष्ट्रात ही उमटले.याच अनुषंगाने दि.४ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान ए.आय.एम.आय.एम.च्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी निषेधपर मनोगत व्यक्त करतांना “भगवा आतंकवाद असा शब्दप्रयोग करत भाजपा,आरएसएस, बजरंग दल,विश्व हिंदू परिषद व सर्व हिंदू,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अपशब्द वापरून प्रक्षोभक विधान केले आणि समाजाला भडकविणारे नारे देत गैर कायद्याने जमाव जमवून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.” या प्रकरणी चौकशी करुन तात्काळ गुन्हा नोंदवावा अशा आशयाचे तक्रारी निवेदन दि.८ फेब्रुवारी २०२२ रोजी भोकर तालुका भाजपा व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, प्रकाश मामा कोंडलवार,गणेश पाटील कापसे, पंगणपत पीट्टेवाड,युवा तालुका अध्यक्ष श्रीकांत किन्हाळकर,विशाल माने,अनिल डोईफोडे,सुनील शहा, अजय टाक,निशाद इनामदार यांसह आदींनी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना दिले.तर पंजाब दत्तराव हुलगुंडे,रा.महात्मा गांधीनगर भोकर यांनी रितसर फिर्याद दिली.
सदरील फिर्यादीवरून दि.८ फेब्रुवारी २०२२ रोजी ए.आय. एम.आय.एम.चे कार्यकर्ते बाबाखान पठाण,इर्शादखान पठाण,सय्यद जुनेद पटेल व इतर काहीजण,सर्वजण रा. भोकर यांच्या विरुद्ध गैर कायद्याने जमाम जमवून सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक विधान करून सामाजिक शांतता भंग करणे,दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणे व धार्मिक भावना दुखविल्या प्रकरणी गुरन.४०/२०२२ कलम २९८,५०५(२),३४ भादवि प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पो.उप.नि.अनिल कांबळे हे करत आहेत.