आजच्या काळात समाजाच्या भविष्यासाठी ग्रंथालये महत्वाची- जिल्हाधिकारी आंचल गोयल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
पूर्णा (जं) : आजच्या काळात समाजाच्या भविष्यासाठी ग्रंथालये ही अत्यंत महत्त्वाची असून गावा गावात ग्रंथालये निर्माण व्हावीत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,असे प्रतिपादन परभणी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले.त्या पूर्णा तालूक्यातील वझूर येथील अनुसया सार्वजनिक ग्रंथालयात स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार यांचा प्रथम स्मृतिदिन सोहळा आणि जिल्हा ग्रंथालय संघाच्या ४४ वे अधिवेशन या संयुक्त कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी दोन.६ फेब्रुवारी रोजी बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच लक्ष्मण लांडे हे होते तर प्रमुख पाहुणे औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.धर्मराज वीर,मुंबई येथील एस.एन.डी.टी. महीला विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. सुभाष चव्हाण, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुस्से, मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम नेकले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा.गोविंद कदम,जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आंचल गोयल पुढे म्हणाल्या की,वर्तमानात आधुनिकीकरणामुळे मोबाईल,लॅपटॉप,टॅब मुळे ज्ञान मिळत असले तरी ते सर्वांना शक्य नाही.ग्रंथ मात्र सर्वांना परिपूर्ण ज्ञान देऊ शकतात.माणसाला ग्रंथ वाचनाने जो आनंद आणि ज्ञान मिळते ते इतर गोष्टींतून मिळू शकत नाही.म्हणून जीवनात ग्रंथाचे किती महत्व आहे हे समाजाला समजावून सांगितले पाहिजे.हे कार्य सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार यांनी केले आणि आजही ते अनुसया सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून चालू आहे,ही आनंदाची बाब आहे,असे ही त्या म्हणाल्या.तसेच सार्वजनिक ग्रंथालयांच्या समस्या आणि मागण्या यासाठी परिपूर्ण माहिती शासन स्तरावरून सोडविण्यासाठी मी सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी आश्वाशित केले.याचबरोबर परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, त्यामध्ये वझूर गावाचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करू यासाठी त्यांनी रामेश्वर मंदिर,जुनी जीर्ण झालेल्या वाड्यांचीही पाहणी केली.यावेळी ग्रंथालय चळवळीत योगदान दिल्याबद्दल स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार,पालम येथील जीवन लोखंडे यांना जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिवेशनाचे मुख्य संयोजक प्रा. डॉ.रामेश्वर पवार यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय कसाब यांनी केले आणि उपस्थितांचे आभार भास्कर पिंपळकर यांनी मानले.या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय संघाचे कार्यकर्ते,पदाधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.कोरोनाचे सर्व नियम व सामाजिक अंतर ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक प्रा.डॉ.रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल सुवर्णा निर्मळ,रामु पवार,अच्युत शिंदे व सार्वजनिक ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.