भोकर न्यायालयाने शाळेच्या वादातीत जागेचा साईबाबा प्रतिष्ठानच्या बाजूने दिला निकाल
संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांना न्याय मिळाल्याने भोकर येथील “एका राजकीय गटास धक्का…”
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय भोकर येथे मागील १२ वर्षापासून प्रलंबित असलेल्या दिवाणी दावा क्रं.०३७/२००९ साईबाबा प्रतिष्ठान संचलीत शाळेच्या वादातीत जागेच्या भाडेतत्व हक्काचा निर्णय मा.भोकर न्यायालयाने साईबाबा प्रतिष्ठानच्या बाजूने दिला असून संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांना न्याय मिळाला असल्याने भोकर येथील एका प्रस्थापित राजकीय गटास मोठा धक्का बसला आहे.
भोकर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा पंचायत समिती चे माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील हे अध्यक्ष असलेल्या साईबाबा प्रतिष्ठान या संस्थेने कै. बाबागौड पाटील प्राथमिक शाळा आणि भगिरथाबाई माध्यामिक विद्यालय शाळा चालविण्यासाठी नांदेड जिल्हा कृषि औद्योगीक सेवा सहकारी सोसायटीची मोंढा,भोकर लगतची जागा दि. १ जून २००३ रोजी १ हजार रुपये दराने भाडेतत्वावर घेतली होती.
नांदेड जिल्हा कृषि औद्योगीक सर्व सेवा सहकारी सोसायटी, नांदेड यांनी ही जागा दि.१९ जुलै १९६८ रोजी भोकर कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर यांच्याकडून ९९ वर्षाच्या लिजवर घेतली होती.याबाबदची नोंद तत्कालीन भोकर ग्रामपंचायत च्या नमुना नं.८ उता-यावर आहे.ही जागा भोगवाटादार भाडेकरु म्हणून करण्यात आली आहे.यानंतर ही जागा त्यांच्याकडून भाडेतत्वावर घेतली असल्याने कै. बाबागौड पाटील प्राथमिक शाळा याचीही नोंद नमुना नं.८ वर घेण्यात आली व पुढे ग्रामपंचायत बरखास्त करुन तिचे भोकर नगर परिषदेत रुपांतर झाल्यानंतर देखील होती. नमुना नं.४३ वर भोगवाटादार म्हणून कै.बाबागौड पाटील प्राथमीक शाळाची नोंद ग्रामपंचायत मालमत्ता क्र.६१२ वार्ड क्र.०३ या प्रमाणे नगरपरिषद भोकर येथे नमुना नं.४३ वर मालमत्ता क्रं ५८१ अशी नोंद करण्यात आली होती.
असे असतानाही माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांच्या भोकर येथील काही राजकीय विरोधकांनी नगरपरिषदेच्या नमुना नं.४३ वरील मालमत्ता क्रं.५८१ ची नोंद बेकायदेशीर असल्याचा आक्षेप घेऊन भोकर नगरपरिषदेला असलेली नोंद रद्द केली होती.याप्रकरणी साईबाबा प्रतिष्ठान चे अध्यक्ष माजी गोविंद बाबागौड पाटील यानी सदरील जागेच्या भाडेतत्व वादाचा न्यायालयीन दावा क्रं३७/२००९ हा कृषि उत्पन्न बाजार समिती विरुध्द अन्य असा वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालया,भोकर येथे दाखल केला होता.दरम्यानच्या काळात मा.न्यायालयाने अनेक साक्ष पुरावे व तत्कालीन भोकर ग्रामपंचायत आणि नंतरच्या भोकर नगरपरिषदेचे नोंद दस्त(रेकॉर्ड)तपासले.यात सबळ पुरावे साईबाबा प्रतिष्ठान च्या बाजूने समोर आली.या सबळ पुराव्यांवरून वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे वरीष्ठ न्यायाधीश मंदार पांडे यांनी उपरोक्त शाळेच्या वादातीत जागेच्या भाडेतत्वाच्या हक्काचा निर्णय साईबाबा प्रतिष्ठान च्या बाजूने दि.२२ डिसेंबर २०२१ रोजी दिला आहे.तर या प्रकरणी साईबाबा प्रतिष्ठानच्या वतीने ॲड.एस.एस.कुंटे, ॲड.शिरीश नागापुरकर यांनी काम पाहीले आहे.
राजकीय वैमनस्य व एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांतून माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांच्या साईबाबा प्रतिष्ठान संचलीत शाळेसाठीची ‘ती’ भाडेतत्वावरील जागा त्यांना मिळू नये या हेतूने भोकर शहरातील एका राजकीय गटाने प्रतिष्ठा पणाला लावली होती.यामुळे सदरील जागेचा(भुखंडाचा) वाद न्यायप्रविष्ट झाला होता.प्रतिष्ठेचा ‘वाद’ असल्याने या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले होते.अखेर १२ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर का होईना मा.न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या आधारे साईबाबा प्रतिष्ठानच्या बाजूने न्याय दिला आहे.या न्यायामुळे “त्या”राजकीय हितचिंतकांना मोठा धक्का बसला असला तरी सदरील शाळेतील शिक्षक,कर्मचारी,४०० च्या वर विद्यार्थांना भोकर शहराच्या मध्यवर्ती स्थानी या शाळेसाठी जागा मिळाल्याने गरीब,कष्टकरी,शेतकरी,व्यापारी अशा आदि पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.