२० वर्षीय तरुणीवर मुंबईत बलात्कार;भोकर पोलीसात गुन्हा दाखल
गुरनं ० ने नोंद घेऊन हा गुन्हा भाग्यनगर नांदेड पोलीसांकडे वर्ग
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : नांदेड येथून पळवून नेऊन एका २० वर्षीय तरुणीवर मुंबईत बलात्कार केल्याचा गुन्हा समोर आला असून पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच सदरील पिडीत तरुणी हरवल्याची नोंद भाग्यनगर नांदेड पोलीसात घेण्यात आली असल्यामुळे हा गुन्हा भाग्यनगर नांदेड पोलीसांकडे भोकर पोलीसांनी वर्ग केला आहे.
नांदेड येथे शिक्षण घेत असलेल्या भोकर तालुक्यातील २० वर्षीय तरुणीस नांदेड येथील एका महाविद्यालयाच्या परिसरातून दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी लक्ष्मण रुखमाजी कटकमवाड (२२),विजय रुखमाजी कटकमवाड आणि इतर एकजण,सर्वजण रा.आंदेगाव ता.हिमायतनगर यांनी तिला तिच्या अत्याच्या मुलीच्या घरी मुंबईस जायचे आहे व तेथे लग्न करु असे सांगून अमिष दाखवून नांदेड-पनवेल रेल्वे गाडीने मुंबईस पळवून नेले.भाग्यनगर नांदेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तिला पळवून नेण्यात आले असल्यामुळे त्या तरुणीच्या वडीलांनी भाग्यनगर नांदेड पोलीसात याबाबत तक्रार दिली.यावरून ती हरवली असल्याची नोंद भाग्यनगर पोलीसात घेण्यात आली होती.
दि.३१ डिसेंबर २०२१ रोजी पिडीत तरुणीने मुंबईच्या पनवेल एका उपनगरातून मोठ्या शिताफीने आपली सुटका करुन घेऊन भोकर तालुक्यातील आपले घर गाठले.तसेच दि.१ जानेवारी २०२२ रोजी भोकर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली की,तिला दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी नांदेड येथील एका महाविद्यालयासमोरून उपरोक्तानी लग्नाचे अमिष दाखवून उचलून पळवून नेले.तसेच पनवेल, मुंबई उपनगरातील एका लॉजवर नेऊन जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध केले.
सदरील गंभीर गुन्ह्याची घटना दि.२८ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान घडली असून पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक राणी भोंडवे यांनी पिडीतेस पळवून नेऊन धमकाऊन जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा भादवि च्या विविध कलमांनुसार उपरोक्तांविरुद्ध गुरनं ० ने गुन्हा दाखल केला. यानंतर सदरील गुन्ह्याचे सुरूवातीचे क्षेत्र भाग्यनगर नांदेड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येते असल्याने आणि ती पिडीत तरुणी हरवल्याची नोंद याच पोलीस ठाण्यात असल्यामुळे भोकर पोलीसांनी दि.२ जानेवारी २०२२ रोजी हा गुन्हा भाग्यनगर नांदेड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.त्यामुळे या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस करणार आहेत.