अल्पवयीन बालकावर अत्याचार करणाऱ्या ज्ञानमाता मधील नराधमास फाशी द्या-मॉन्टीसिंग जहागीरदार

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : नांदेड येथील ज्ञानमाता विहार शाळेतील इयत्ता ४ थ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका १० वर्षीय अल्पवयीन बालकावर याच शाळेतील एका ५० वर्षीय सेवकाने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची निंदनिय अमानुष घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे.सदरील घटनेतील त्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी व या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी,अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनसे चे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार व शिष्टमंडळाने केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून असे अमानुष व निषेधार्थ घटना घडत असल्याने ही समस्या चिंतेची बाब ठरत आहे.अशाच प्रकारे नांदेड शहरातील प्रसिद्ध व प्रतिष्ठित ठरलेल्या ख्रिश्चन मिशनरीज व्यवस्थापन समितींतर्गत चालणाऱ्या ज्ञानमाता विहार शाळेत काही दिवसांपूर्वी ४ थ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १० वर्षीय बालकावर याच शाळेतील एका सेवकाने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची अमानुष व निषेधार्थ घटना घडली आहे.या घटनेमुळे नांदेड शहरातील नागरिक,पालक व शिक्षणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून शासनाने कठोर कायदा निर्माण करून त्या नराधमास भर चौकात फाशी द्यावी,जेणेकरून यापुढे अशा घटना भविष्यात घडणार नाहीत,असे मनसे चे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी म्हटले आहे.तसेच एका निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने मागणी केली आहे.
ज्ञानमाता विहार या शाळेतील ५० वर्षीय सेवकाने अमानुषपणाची हद्द ओलांडली असून त्या नराधम सेवका विरुद्ध विमानतळ नांदेड पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत विविध कलमानुसार गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले असून शाळेमधील विद्यार्थी सुरक्षित राहतील की नाही ? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विद्याज्ञान देण्याचे पवित्र असे कार्य केले जाते,परंतू सदरील शाळेतील नराधम सेवका कडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार व बलात्काराचे अमानवी तथा शाळेला काळीमा फासण्याचे कृत्य घडले आहे.हा प्रकार पहिल्यांदाच झाला नसून यापूर्वी देखील काही प्रकार येथे घडले आहेत.शाळेचे व्यवस्थापन हे ख्रिश्चन संस्थेकडे असून शाळेमध्ये शासनाच्या नियमावलीची कोणतेही पालन केले जात नाही.तसेच शाळेची व्यवस्थापन समिती कुचकामी ठरली असल्यानेच त्या अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली.यास शाळा प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे. त्यामुळे सदरील घटनेची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी व शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी नांदेड जिल्हा परिषदेचे प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तसेच जलदगती विशेष न्यायालयात सदरील गुन्ह्याचा खटला चालविण्यात येऊन पीडित बालकास न्याय द्यावा अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली असून त्या निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार,मनसेचे भोकर तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार यांसह आदींचा समावेश होता.