काँग्रेसचे खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या सत्कार सोहळ्यास शिंदे शिवसेनेचे आ.हेमंत पाटील यांनी लावली उपस्थिती
भोकर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री भुषण पुरस्कार वितरण व अभिष्टचिंतन सोहळ्याच्या औचित्याने माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांनी जुळवून आणला हा ‘योग’
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे भोकर तालुकाध्यक्ष माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्री साईबाबा प्रतिष्ठान च्या वतीने दि.३ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या सत्कार व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री भुषण पुरस्कार वितरण सोहळ्यास शिवसेनेचे(शिंदे गट) आमदार तथा नामदार हेमंत भाऊ पाटील यांनी सपत्नीक उपस्थिती लावली.हा योग माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांनी जुळवून आणल्याने येथील राजकीय पटलावर एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा उपस्थितांतून होत आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले यांची जयंती व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे भोकर तालुकाध्यक्ष माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने नांदेड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांचा भव्य सत्कार आणि विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तुत्ववान महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्याच्या सोहळ्याचे आयोजन श्री साईबाबा प्रतिष्ठान भोकर च्या वतीने दि.३ जानेवारी २०२५ रोजी कै.बाबागौड पाटील प्राथमिक शाळा व कै.भगिरथीबाई माध्यमिक विद्यालय भोकर येथे करण्यात आले होते.सदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री कृष्ण ज्ञान मंदिर चे विश्वस्त महंत प्रभाकर बाबा कपाटे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (शिंदे) गटाचे विधान परिषदेचे आमदार तथा मंत्री हेमंत भाऊ पाटील,गोदावरी समुहाच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी जि.प.सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील किन्हाळकर,निळकंठ वर्षेवार,बाबुराव पाटील कोढेंकर,भोकर शहराध्यक्ष तौसिफ इनामदार,माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड,महिला आघाडी तालुकाध्यक्षा मनोरमा रेड्डी,शहराध्यक्ष सुरेखा माळे,शिवाजी पाटील लगळूदकर,माधवराव शिंदे,सतिश देशमुख,आनंदराव पाटील यांसह आदींची उपस्थिती होती.उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीत श्री साईबाबा प्रतिष्ठान,कै. शंकरराव चव्हाण अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवाशी आश्रम शाळा दिवशी(बु.),राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तालुका,शहर कमिटी व आदींच्या वतीने खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांचा भव्य सत्कार आणि माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.तसेच खा.प्रा.रविंद्र चव्हाण, आ.हेमंत पाटील,राजश्री पाटील व आदी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान १९ महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले स्त्री भुषण पुरस्कार-२०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.सदरील सोहळ्याची पार्श्वभूमी युवा नेते संदिप पाटील कोंडलवार यांनी प्रास्ताविकातून मांडली.तर शुभेच्छापर मनोगत माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी व्यक्त केले.तसेच माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यास अनुसरून आपल्या मनोगतातून सर्वांचे ऋण व्यक्त केले.तर सुरेख असे सुत्रसंचालन विपिन पवनकर यांनी केले व उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक नरेश पाकलवार यांनी मानले.
सदरील सोहळ्या प्रसंगीची विशेष बाब ठरली ती म्हणजे शिवसेनेचे आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी सपत्नीक लावलेली उपस्थिती…
संपन्न झालेल्या सत्कार,पुरस्कार वितरण व अभिष्टचिंतन सोहळ्याची विशेष बाब व आकर्षण ठरले ते म्हणजे आमदार हेमंत भाऊ पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी गोदावरी समुहाच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई पाटील यांनी अचानकपणे लावलेली उपस्थिती.दि.३ जानेवारी रोजी भोकर शहरात २० वे लोकसंवाद साहित्य संमेलन संपन्न झाले.या संमेलन प्रसंगी एकाच व्यासपीठावर उद्घाटक म्हणून खा.प्रा. रविंद्र चव्हाण,प्रमुख पाहुणे म्हणून आ.हेमंत भाऊ पाटील व पुरस्कारार्थी म्हणून राजश्री पाटील यांनी हजेरी लावली.हे व्यासपीठ राजकीय पक्ष विरहित असल्याने त्यांचे एकत्रित उपस्थित राहिणे नाविन्य नाही.परंतू श्री साईबाबा प्रतिष्ठान आयोजित खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांचा सत्कार,महिलांना पुरस्कार व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या परिघांतर्गतचा असल्याने त्यांची उपस्थिती अनेपेक्षित व नाविन्यपूर्णच होती असे म्हणने वावगे ठरणार नाही.तसेच सदरील सोहळ्या संबंधित कोणत्याही प्रसिद्धी व शुभेच्छा फलकावर त्या दोघांचे फोटो नव्हते किंवा ते दोघे येणार असल्याचा मजकूर प्रकाशित करण्यात आला नव्हता.असे असतांनाही सत्ताधारी पक्षाचे आ.हेमंत भाऊ पाटील हे विरोधी पक्षाचे खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांचा सत्कार सोहळा व राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास अनपेक्षितपणे सपत्नीक आले.यावेळी व्यक्त झालेल्या मनोगतातून माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या विकास कामांत सत्ताधारी आ.हेमंत भाऊ पाटील यांनी हातभार लावून येथील शैक्षणीक,कृषि,सिंचन,रोजगार व औद्योगिक क्षेत्रातील अनुशेष भरुन काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली.भोकर विधानसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण व त्यांच्या सुकन्या ॲड.श्रीजया चव्हाण यांचा असल्याने सत्ताधारी महायुतीतील सहभागी पक्ष शिवसेनेचे आ.हेमंत भाऊ पाटील हे खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांना उपरोक्त प्रमाणे सहकार्य करतील काय? यावर तुर्तास तरी प्रश्नचिन्ह उभे आहे.भविष्यात असे होईल अथवा न होईल,पण म्हणतात ना…एकमेकांत कितीही वैचारिक,राजकीय किंवा वैयक्तिक मतभेद असोत,परंतू त्या व्यक्ती विवाह,वाढदिवस व आदी सोहळ्यांत एकमेकांसमोर व एकत्रित येऊ शकतात.आणि हे देखील तसेच झाले आहे.माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांनी याप्रसंगी या दोघांना एकत्र येण्याचा ‘योग’ सदरील सोहळ्याच्या औचित्याने विनंतीपर निमंत्रणातून जुळवून आणला आहे.त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता हा ‘योग’ असाच ‘योगायोग’ मध्ये बदलला जाईल काय ? तसेच राजकीय पटलावर एका वेगळ्या पर्वाची सुरुवात होईल काय ? अशी चर्चा उपस्थितांतून होतांना दिसून आली आहे.