पिंपळढव येथील १९ दिवसाच्या बाळाच्या बाळंतीण आईने गळफास घेऊन केली आत्महत्या
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील पिंपळढव येथे माहेरी राहणाऱ्या केवळ १९ दिवसाचे बाळ असलेल्या बाळंतीण आईने दि.३१ डिसेंबर रोजी घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून आत्महत्येचे कारण अद्याप तरी समजले नाही.सदरील प्रकरणी भोकर पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
मौ.पिंपळढव ता.भोकर येथील कोंडिबा गोविंद जाधव यांची मुलगी प्रज्ञा हिचे गेल्या तीन वर्षापुर्वी पळसगाव येथील विजय लक्ष्मण जोंधळे यांच्याशी रितीरिवाजा प्रमाणे लग्न झाले होते. प्रज्ञा ही गरोदर असल्याने तिला दि.२८ एप्रिल २०२४ रोजी बाळांतपणासाठी माहेरी आणण्यात आले होते.तेंव्हा पासून ती माहेरीच राहत होती.दि.११ डिसेंबर २०२४ रोजी भोकर येथील एका खासगी रुग्णालयात ती सिझरींगने बाळंतीण झाली होती. तिची आई तथा वडील कोंडिबा जाधव यांची पत्नी आजारी असल्याने उपचारासाठी दि.३१ डिसेंबर २०२४ रोजी भोकर येथील एका खासगी रुग्णालयात आणले होते.याच दरम्यान घरी कोणीही नसल्याचे पाहून दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान प्रज्ञा विजय जोंधळे या बाळंतीण विवाहितेने घरातील लाकडी तुळईस ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,अशी माहिती गावातील एकाने फोन वरुन तिच्या वडीलांना दिली.हे समजताच तिच्या आई वडिलांनी तात्काळ घर गाठले व ही दुर्दैवी घटना पाहिली.
सरत्या वर्षाचा निरोप व येणाऱ्या नुतन वर्षाच्या स्वागताची तयारी करण्याचा आनंदोत्सवात अनेकजण असतांनाच सदरील विवाहित बाळंतीण आईने केवळ १९ दिवसाचे बाळ माघे ठेऊन जगाचा निरोप का घेतला आसेल ? तिने आत्महत्या का केली असावी यावर प्रश्नचिन्ह उभे असून सद्यातरी हे न उलगडणारे कोडेच आहे.सदरील दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार,महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, जमादार मंगू जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा रितसर पंचनामा करून तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आणण्यात आला. तसेच वडील कोंडिबा जाधव यांच्या जबाबावरुन भोकर पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तर पो.नि.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास सहा.पो.नि. कल्पना राठोड या करत आहेत.