भोकर मध्ये ऑटोरिक्षा मधील एका प्रवासी महिलेचा केला विनयभंग
भोकर पोलीसात एका विरुद्ध गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहरातील एका सोनोग्राफी सेंटरमध्ये रिसेप्शनिष्ट म्हणून काम करणारी एक महिला आपले कर्तव्य बजावून एका गावातील तिच्या माहेरच्या घरी ऑटोरिक्षातून दि.२७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:२० वाजताच्या दरम्यान जात असतांना त्या ऑटोरिक्षातील एकाने त्या महिलेच्या शरीरास वाईट हेतूने स्पर्श केला. तसेच लज्जा वाटेल अशा प्रकारे अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी त्या इसमाविरुद्ध भोकर पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात मुलीसह माहेरी राहून एक २४ वर्षीय महिला भोकर शहरातील एका सोनोग्राफी सेंटर मध्ये रिसेप्शनिष्ट म्हणून नौकरी करुन उपजीविका करते.तसेच ती नौकरीसाठी दररोज माहेरचे गाव व भोकर येथे ऑटोरिक्षाने ये जा करते.दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:२० वाजताच्या दरम्यान ती आपल्या नौकरीचे कर्तव्य बजावून माहेर घरी जात असतांना तो ऑटोरिक्षा सुधा नदीच्या पुलावर आला असता त्या ऑटोरिक्षाच्या चालका शेजारी बसलेल्या तिच्याच माहेर गावातील रहिवासी असलेल्या हनमंतू दत्ता बोईनवाड या प्रवाश्याने सदरील महिलेच्या शरीरास हाताने स्पर्श करून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले.यावेळी तिने त्या प्रवाश्यास खडसावले असता त्याने उद्धटपणे वर्तणूक करुन त्या महिलेस अश्लील शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी ऑटोरिक्षा चालक व आतील अन्य चार प्रवाशांनी सदरील वाद शमविला.तसेच त्या महिलेला दुसऱ्या एका ऑटोरिक्षा मध्ये बसवून देऊन गावी पाठवून दिले.माहेर घरी पोहचल्यानंतर तिने झालेल्या प्रकाराबाबत आई,वडील,भाऊ, बहिण व आदींना सांगितले.झालेला प्रकार हा गंभीर व दखलपात्र असल्याने उपरोक्तांनी तिला धीर दिला व रात्री तीने आपल्या नातेवाईकांसह भोकर पोलीस ठाणे गाठले.तसेच झालेल्या प्रकाराबाबत उपरोक्त आल्याप्रमाणे तिने रितसर फिर्याद दिली.तिच्या फिर्यादीवरून हनमंतु दत्ता बोईनवाड याच्या विरुद्ध गु.र.नं.५०७/२०२४ कलम ७४,७५,३५२,३५१ (२)(३) भारतीय न्याय संहितेनुसार विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा भोकर पोलीसांत दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड या करत आहेत.