Thu. Jan 9th, 2025
Spread the love

कारण…वाचण्यासाठी आलेल्या नृत्यांगणा गौतमी पाटील यांना दिल्या अण्णा भाऊ साठेंच्या ‘फकिरा’ सह अन्य दोन कादंबऱ्या भेट

संपादकीय…
पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सवास’ राजकीय, सामाजिक,साहित्यिक,कला,विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी हजेरी लावून पुस्तके खरेदी केली.याच दरम्यान प्रख्यात नृत्यांगना गौतमी पाटील यांनी ही हजेरी लावली. यावेळी ‘मी वाचण्यासाठी आले आहे व अभिनेता प्रविण तरडे दादा जे पुस्तके निवडून देतील ते मी वाचणार आहे.’असे तिने म्हटले.अभिनेता तथा दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी हजारो पुस्तकांच्या दालनातील विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न सत्यशोधक डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकटलेल्या अजरामर अशा ‘फकिरा,आवडी व वैजयंता’ या तीन कादंबऱ्या तिला स्नेह भेट दिल्याचे समजते.सद्या महिला कलावंतांना ट्रोल करणे,चारित्र्यावर शिंतोडे उडविणे,एखाद्या व्यक्तीसोबत तिचे नाव जोडून मानहानी करणे,अशा आदी घटना होत असतांनाचे दिसून येत असून महिला कलावंतांना स्वाभिमानाने कसे जगता व आपले चारित्र्य कसे जपता येईल याची प्रेरणादायी दिशा देणारे वैचारिक साहित्य दिले पाहिजे, असे अभिनेता प्रविण तरडे यांना वाटले असावे? त्यांनी तशा भावना ही व्यक्त केल्या आहेत.यातून अभिनेता प्रविण तरडे यांची समयसूचकता व वाचनीय वैचारिकतेची प्रगल्भता दिसून येत असल्याने त्यांचे कौतुक करावेच वाटते,नव्हे तर त्यांना सलामच हं!

नुकतेच पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ‘पुणे पुस्तक महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले.याच दरम्यान महाराष्ट्रातील प्रख्यात नृत्यांगना गौतमी पाटील यांनी या महोत्सवास भेट दिली असता कार्यक्रमाचे आयोजक राजेश पांडे,अभिनेता प्रविण तरडे यांनी तिचे स्वागत केले.यावेळी उपस्थितांपैकी काहींनी नृत्यांगणा गौतमी पाटील यांना आपण कोणते पुस्तके घेणार आहात ? म्हणून विचारले असता तिने म्हटले की,’मला नाचण्यासाठी तर अनेकजण बोलावतात,परंतू मी आज येथे वाचण्यासाठी आले असून दिशादर्शक व प्रेरणादायी वाचनीय पुस्तके कोणती आहेत ? हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असल्याने प्रविण दादा मला जे पुस्तके देतील ते मी वाचणार आहे.’ हे ऐकून अभिनेता प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांची अजरामर ‘फकिरा, आवडी व वैजयंता’ या तीन कादंबऱ्या स्नेह भेट दिल्याचे समजते.राज्यात सद्या एका अभिनेत्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याच्या दुषित हेतूने एका राजकीय व्यक्तीसोबत तिचे नाव जोडून वल्गणा,वावड्या उठविल्याचा प्रकार झाल्याचे सर्वश्रुत आहे.असे होणे हे काही नव्याने नाही,तर पितृसत्ताक तथा पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत कलावंतीणींच्या बाबतीत अनंत काळापासून असे होत आले आहे.पुरुषप्रधान समाज व्यवस्थेला मानणाऱ्या काही लोकांत राहून कलाक्षेत्रातील अभिनेत्री,कलावंतीण,नृत्यांगना यांना स्वाभिमानाने कसे जगता,राहता आणि आपले चारित्र्य जपता येऊ शकते ? याची दिशा दर्शविणारे प्रेरणादायी साहित्य दिले पाहिजे,असे अभिनेता प्रविण तरडे यांना वाटले असावे? म्हणूनच तर त्यांनी उपरोक्त कादंबऱ्या गौतमी पाटील यांना भेट दिल्या असाव्यात असे वाटते.

साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या रक्त नात्यातील ‘वीर पुरुष फकिरा राणोजी साठे मांग’ यांच्या प्रेरणादायी कर्तुत्वावर ‘फकिरा’ ही अजरामर कादंबरी लिहली आहे.या कादंबरीत डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी दलितांच्या अंगी असलेला झुंजारपणा,बंडखोरपणा, लढताना मरण पत्करण्याची तयारी,स्वाभिमान,गरजू आणि लायक व्यक्तीना कुठल्याही परिस्थितीत मदत करण्याची वृत्ती या उदात गुणांचे चित्रण केलेले आहे.दुष्काळ,ताप,रोगाच्या साथी आणि उपासमार यांच्यामुळे अस्पृश्य,उपेक्षित,वंचित,दलित वर्गातील लोक मरू लागले होते. अशा प्रतिकुल परिस्थितीत वीर फकिराच्या वाटेगावातील विष्णुपंत कुलकणी यांनी काहीही करा पण जगा असा निर्वाणीचा सल्ला फकिरास दिला होता.त्यांचा सल्ला आणि आपल्या दृढनिश्चयाच्या बळावर फकिराने ब्रिटिशांची धान्याची गोदामे व खजिने लुटली आणि उपरोक्त गरजू लोकांमध्ये त्याचे वाटप केले. याकृत्यामुळे ब्रिटिश सरकारच्या पोलीसांनी फकिराच्या नातेवाईकांना अटक करुन त्यांचा अनन्य छळ केला.ब्रिटीश सरकारच्या पोलीसांनी फकिरास पकडण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केला.परंतू वीर फकिरा त्यांच्या हाती लागणे अशक्य होते.असे असतांनाही निष्पाप लोकांचा होत असलेला छळ फकिरास सहन झाला नाही व त्यांच्या सुटकेसाठी ते शरण गेले आणि ब्रिटिश पोलीसांनी वीर फकिराच्या बदल्यात त्या निष्पाप लोकांची सुटका केली.यातून जगण्यासाठी नव्हे तर इतरांना जगविण्यासाठी लढण्याची प्रेरणा देणारे थोर व्यक्तीमत्व डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी मांडले आहे.

डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या ‘आवडी’ या कादंबरीवर ‘टिळा लाविते मी रक्ताचा’ हा चित्रपट काढण्यात आलेला आहे. सदरील कादंबरीत डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी जातिभेदाच्या भिंती नष्ट करण्याची अत्यंत गरज असल्याचे प्रेरणादायी लिखाण केले आहे.आपल्यापेक्षा हलक्या जातीच्या धनाजी रामोशी या तरुणाबरोबर राहण्याचे धाडस करणाऱ्या वरच्या जातीतील आवडी चौगुले या मूलीची ही कथा आहे.आवडीचा भाऊ नागू हा तिचा अपमान करण्यासाठी मुद्दाम तिचे लग्न बोरगावच्या एका श्रीमंत घराण्यातील उत्तम पाटील यांच्याशी लावून देतो.उत्तम ला फिट्स येण्याचा आजार असतो.त्याला फिट्‌सचा झटका आला की तो हाती येईल त्या वस्तुचे दोन तुकडे करत असतो.तिला देखील तो मारतो.हा मानसिक व शारीरिक छळ आवडीच्या लक्षात येतो.तसे पाहता अशा गोष्टी निमूटपणे सहन करण्याचा उच्चवर्णीयात रिवाजच असतो.परंतू आवडी मात्र याविरुध्द बंड करते आणि हलक्या जातीच्या धनाजी बरोबर ती निघून जाते.धनाजीपासून तिला गर्भ राहतो. यामुळे नागू प्रचंड संतापतो.हलक्या जातीच्या माणसाची पत्नी बनून तिने आपल्या घराण्याला कलंक लावला आहे,असे त्याला वाटते.याच दरम्यान ती आपल्या नातेवाईकांना भेटायला गावी आली असता नागू तिचा खून करतो.एका खुनाच्या आरोपात चौदा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेला धनाजी हा तिच्या खूनाचा बदला घेण्याचे ठरवतो.तुरुंगवासाची शिक्षा भोगून आल्यावर ज्या ठिकाणी नागूने आवडीचा खून केलेला असतो,त्याच ठिकाणी धनाजी त्या नागूचा प्राण घेतो.उच्च वर्गातील महिलेने खालच्या वर्गातील पुरुषासोबत विवाह करणे हे किती वैरत्वाचे व जीवघेणी असते ? हे दर्शविते.असे होऊ नये व जातिभेदाच्या भिंती नष्ट करण्याची नितांत गरज असल्याची विचारसरणी डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी ‘आवडी’ मधून मांडली आहे.या कादंबरीवर ‘टिळा लावते मी रक्ताचा’ हा चित्रपट १९६१ मध्ये प्रदर्शित झाला आहे.

तर तमाशातील कलावंत महिलांचे दु:ख,व्यथा,वेदना,अन्याय, अत्याचार,त्यांच्या मनातील द्विधा अवस्था,भावनिक,मानसिक व शारीरिक शोषण,त्यांचा जगण्यासाठी चाललेला संघर्ष,भावी जीवनाबद्दलच्या चिंता व प्रस्थापित पुरुषप्रधान समाजाचा तमाशा कलावंतीणीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती ‘हीन’ होता आणि तो दृष्टीकोन कशा प्रकारे बदलाण्याची गरज आहे. तसेच संघर्षशील महिला कलावंतीणींना स्वतःच्या कामाशी एकनिष्ठ राहून संघर्षातून आपले चारित्र्य कसे जपता येऊ शकते याचे वास्तवदर्शी लिखाण डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी ‘वैजयंता’ या कादंबरीतून मांडले आहे.या कादंबरीवर १९६१ मध्येच ‘बारा गावचं पाणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.आजही पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत पुरुषवर्गाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून,हाच वर्ग तमाशा किंवा नृत्य या कलेचा मोठ्या प्रमाणात आस्वाद घेताना दिसतो.कला मंचावर हा वर्ग या कलेची स्तुती करून त्या कलावंतीणींंच्या कौशल्याचे आणि कलेचे गुणगान गातो.परंतू मंचावरून खाली येताच हाच वर्ग त्या कलावंत महिलांचे चारित्र्यहनन करतांनाही दिसतो. तिच्यावर मालकी हक्क दाखवून तिचा जबरदस्तीने उपभोग ही काही जण घेताना दिसतात.
वैजयंता कादंबरीतील आबा पाटील हे पात्र वैजयंता या नायिकेला पैशाचे आमिष दाखवून तिला जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडते.पैसे देण्याच्या माध्यमातून तो तिच्याशी बळजबरीने लगट करण्याचा प्रयत्न करतो.तिच्या शरीराला स्पर्श करू पाहतो.तेव्हा मात्र वैजयंता त्याला म्हणते,तू मला तिन्ही लोकीचं राज्य देऊ केलं तरी मी तिकडे येणार नाही. वैजयंता ही कोणत्याही जात किंवा पुरुषप्रधान सत्तेतील पुरुषांच्या कोणत्याही मोहाला बळी न पडता स्वतःचं अस्तित्त्व आणि शील जपते.अशी संघर्षमयी कलावंतीण डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी वैजयंता मधून उभी केली आहे.भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये चंदूलालसारखा तमाशा थिएटरचा मालक वैजयंताच्या कलेच्या माध्यमातून अमाप नफा मिळवतो जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी तो तिच्या कलेबरोबर देहाचे प्रदर्शन करून पुरुषवर्गाच्या मनधरणीसाठी आदेश देतो.परंतू ती या गोष्टींना नकार देते,तेव्हा चंदूलालच्या उरात चाकूचे खोलवर वार केल्यागत वाटते.पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत पुरुषांना अतिशय महत्त्व व उच्च स्थान,तर महिलांना दुय्यम माणून तिला पुरुषांच्याच सहमतीने जीवन जगण्यासाठी विवश केलेले दिसते याच दुय्यमतेच्या भूमिकेतून चंदूलाल वैजयंतावर एक स्त्री म्हणून व ती गुलाम आहे तिने सांगितलेली कामे कुठलीही तक्रार न करता करावीत,असे बंधने लादतो,तेव्हा त्या सर्व गुलामीच्या कामांना नकार देण्याची शक्ती डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून तिला मिळाल्याचे दिसते.तसेच हा नकार तिने द्यावा म्हणजे एका स्त्रीने पुरुषी वर्चस्वाला दिलेले ते एक आव्हानच आहे! वैजयंताच नव्हे तर तिच्यासारख्या इतर कलावंतीणींना देखील धडा शिकविण्यासाठी पुरुषप्रधान समाज नाना प्रकारच्या युक्त्या करतोच म्हणूनच तर चंदूलालसारख्या थिएटर मालकाच्या तोंडून काही उद्गार येताना दिसतात,जसे की, “हिला कोणत्याही परिस्थितीत मी वश करेनच!,”असे जेव्हा तो म्हणतो तेव्हा वैजयंता अशा धमक्यांना भीक न घालता त्याला म्हणते,“मी सरळ तमाशा करीन,मी सरळ जाईन,दुसरं मला मान्य नाही.तमाशा म्हणजे माझ्या देहाचे नग्न प्रदर्शन नव्हे. जनतेची मालकी माझ्या कलेवर आहे,माझ्या शरीरावर नाही.” असे ती खडसावून सांगते. यातून डॉ.अण्णा भाऊ साठे यांची ही नायिका स्वतःच्या आत्मविश्वासावर ठाम उभी राहणारी, स्वतःचे निर्णय घेणारी,जे योग्य आहे त्याचाच स्वीकार करून तिच्यावर जबरदस्तीने लादणाऱ्या गोष्टींना स्पष्टपणे नकार देणारी,पुरुषप्रधान समाज रचनेपुढे नकार देऊन पुरुषी वर्चस्वाला आळा घालण्यासाठी संर्घष करणारी असल्याचे दिसते.

विश्व साहित्य भुषण डॉ.अण्णा भाऊ साठे यांची फकिरा कादंबरी जगण्यासाठी नव्हे तर इतरांना जगविण्यासाठी लढण्याचे वैचारिक बळ देते.आवडी ही कादंबरी जाती पातीतील उच्च निचतेच्या भेदभावाच्या भिंती नष्ट करण्याची प्रेरणा देते.तर वैजयंता ही महिला कलावंतींण स्वाभिमानाने जगत आपले चारित्र्य तथा शील कसे जपता येऊ शकते याची दिशा दर्शविते.उपरोक्त तिन्ही कादंबऱ्या वाचल्याच पाहिजेत. विशेषतः महिला कलावंतीणींनी वैजयंता वाचलीच पाहिजे. कारण महिला कलावंतीणीच्या बाबतीत सद्या होत असलेल्या घडामोडी पाहता डॉ.अण्णा भाऊ साठे यांची वैजयंता स्वाभिमानी खंबीर नेतृत्व करणाऱ्या व कलेचे सादरीकरण करणाऱ्या महिला कलावंतीणींना बळ व उर्जा देण्याचे काम करते.अभिनेता तथा दिग्दर्शक प्रविण तरडे हे डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणादायी विचारांचे अनुयायी आहेत.त्यांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांची फकिरा स्व अभिनयातून साकारलेली व अंगीकारलेली आहे.तसेच डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे ते मोठे वाचक ही आहेत.त्यामुळेच पुस्तक महोत्सवात आलेल्या नृत्यांगणा गौतमी पाटील यांनी डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या अजरामर व प्रेरणादायी साहित्याचे वाचन करून बोध घ्यावा आणि एक नृत्यांगना म्हणून संघर्षमयी जीवन जगताना लढण्याची प्रेरणा तिला या साहित्यसंपदेतून मिळू शकते असे वाटल्यानेच त्यांनी हजारो पुस्तकांच्या दालनातून निवडलेल्या उपरोक्त कादंबऱ्या तिला स्नेह भेट दिल्या आहेत असे वाटते.गौतमी पाटील यांनी त्यापैकी एक तरी कादंबरी नक्कीच वाचली असावी ? म्हणूनच तर सद्याच्या वादातीत चर्चेत असलेल्या ‘त्या’ अभिनेत्रीच्या लढ्यास गौतमी पाटील यांनी नुकताच पाठींबा दिला आहे.डॉ.अण्णा भाऊ साठे हे आज हयात नाहीत.परंतू त्यांच्या सिद्धहस्त झुंजार लेखणीतून व बुलंद शब्द सामर्थ्यातून प्रकटलेले साहित्य हे आजही सजीव,अजरामर आणि प्रेरणादायीच आहे.याची जाण अभिनेता प्रविण तरडे यांना नक्कीच आहे.म्हणूनच तर समयसुचकतेतून त्यांनी नृत्यांगना गौतमी पाटील यांना त्या कादंबऱ्या दिल्यात,त्यामुळे मी त्यांच्या प्रगल्भ वैचारिकतेचे कौतुक व अभिनंदन करतो.नव्हे तर कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या विचारातला सलाम करतो!

उत्तम बाबळे,संपादक 


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !