सुशासन सप्ताह अंतर्गत रोजगार हमी जलसंधारणाच्या कामाचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला आढावा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : दि.१९ ते २५ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.या सुशासन सप्ताहमध्ये दिर्घकालीन व शाश्वत विकासाच्या अनेक उपक्रमांना स्थानिक प्रशासनाने गती देण्याला प्राधान्य दिले आहे.त्या अनुषंगाने सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दि.२३ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील यंत्रणेचा आढावा घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनामध्ये उपरोक्त संदर्भाने बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रामुख्याने यावेळी रोजगार हमी व जलसंधारणाच्या संदर्भातील आढावा घेतला.यात जलयुक्त शिवार,नरेगा,पांदण रस्ते,विहिर बांधकाम, गाळमुक्त तलाव,शेततळे,शोषखड्डे,घरकुल,चारा लागवड,बांबुलागवड तसेच जलसंधारणांतर्गत शेततळे, तुषारसिंचन,सुक्ष्मसिंचन,मृदजलसंधारण आदी संदर्भात आढावा घेण्यात आला.पावसाळा लागण्यापूर्वी यासंदर्भातील कामांचे नियोजन आवश्यक आहे.तसेच या आर्थीक वर्षातील पुढील तीन महिने बाकी असून यामध्ये खर्चाचे नियोजन आवश्यक आहे.त्यामुळे तातडीने संपूर्ण यंत्रणेने याबाबत काम करावे,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.सदरील बैठकीला उपजिल्हाधिकारी(सामान्य)अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी रोहयो ललीतकुमार वऱ्हाडे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.