भोकर महसूल व पोलीस विभागाने पकडला प्रत्येकी एक अवैध रेती विक्रीचा ट्रक
महसूल विभागाने केली दंडात्मक कारवाई ; तर पोलीस विभागाने भारतीय न्याय संहितेची कारवाई करुन ६ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात तस्करीच्या माध्यमातून अवैध रेती आणली जात असल्याची चर्चा होत असल्याने तहसिलदार विनोद गुंडमवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन दि.२१ डिसेंबर रोजी रात्री महसूल विभाग कर्मचारी पथकाने साफळा रचून विक्रीसाठी अवैध रेती घेऊन जात असलेला एक ट्रक पकडला.तर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशावरून रात्र गस्तीवर असलेल्या भोकर पोलीस पथकाने दि.२३ डिसेंबर रोजी रात्री साफळा रचून विक्रीसाठी अवैध रेती घेऊन जात असलेला एक ट्रक पकडला.याप्रकरणी महसूल विभागाने दंडात्मक कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पंचनामा अहवाल पाठविला आहे.तर पोलीस विभागाने भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार कारवाई करुन ६ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परवानाधारक रेतीचे धक्के सुरू नसतांनाही तस्करीच्या माध्यमातून चोरट्या मार्गाने अवैधरित्या रेती मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी भोकर व तालुक्यात आणली जात आहे.काही दलाल हे रात्री दरम्यान सक्रीय होतात व अवैध रेती वाहक ट्रक येथे आणून रातोरात ती रेती विक्री करतात.यावर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने कर्मचाऱ्यांचे पथके नियुक्त केले आहेत.परंतू त्यांच्या हाती काहीही लागत नसल्याची चर्चा अनेकांतून होत आहे.
यामाघील गोडबंगाल काय असेल ? याचा शोध घेण्यासाठी तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी सतत ३ दिवस रात्री दरम्यान जागून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी काही ट्रक अवैध रेती घेऊन येत आहेत.यावरुन त्यांनी मंडळ अधिकारी मनोज कंधारे, तलाठी अनिल मुनेश्वर व अन्य कर्मचाऱ्यांचे एक पथक सक्रीय केले आणि या पथकाने रात्री ११:०० ते ११:३० वाजताच्या दरम्यान भोकर शहराबाहेरील सुभेदार रामजी आंबेडकर चौक ते क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक वळणरस्त्यावर अवैध रेती घेऊन जात असलेला एक हायवा ट्रक पकडला. सदरील ट्रक तहसिल कार्यालयात आणून तपासणी केली असता ट्रक वरील क्रमांक दिसणार नाही असे करण्यात आल्याचे व महसूल कर भरल्याची(रायल्टी पावती) पावती त्या ट्रक चालकाकडे नसल्याचे निष्पन्न झाले. तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तलाठी यांनी रितसर पंचनामा करुन सदरील ट्रकमध्ये दीड ब्रास अवैध रेती असल्याचा तो अहवाल भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्याकडे दंडात्मक कारवाईसाठी पाठविण्यात आला असून किती रुपये दंड लावल्यात आला हे अद्याप तरी समजले नाही.
भोकर पोलीसांनी अवैध रेतीचा ट्रक पकडून ६ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त
भोकर पोलीस पथकाने रात्र गस्तीवर असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर १२:२५ वाजताच्या दरम्यान म्हैसा वाया पॉईंट वळणरस्त्यावर अवैध रेती विक्रीसाठी नेत असलेला एक हायवा ट्रक साफळा रचून पकडला असून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून ६ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध रेती तथा गौण खनिज विक्रीवर आळा घालण्यासाठी अवैध विक्री करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरुन जिल्ह्यात अनेक पोलीस पथके कार्यरत झाले आहेत.याच अनुषंगाने भोकरचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे व भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस ठाण्यातील सेवारत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे, जमादार राजेश्वर कळणे,पो.कॉ.प्रमोद जोंधळे,चालक पो.कॉ. मंगेश क्षिरसागर,पो.कॉ.गुरुदास आरेवार यांच्या पथकाने दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर १२: २५ वाजताच्या दरम्यान सापळा रचून शहराबाहेरील म्हैसा वाय पॉईंट वळणरस्त्यावर अवैध रेती घेऊन भरधाव वेगात जात असलेला एक हायवा ट्रक पकडला.
एम.एच. २६ सी.एच.०००५ क्रमांकाचा तो हायवा ट्रक भोकर पोलीस ठाण्यात आणण्यात आला व तपासणी केली असता तस्करीच्या माध्यमातून महसूल न भरलेली विना परवाना ५ ब्रास अवैध रेती त्यात मिळून आली.तसेच पो.कॉ. प्रमोद जोंधळे यांनी फिर्याद दिल्यावरुन ट्रक चालक जालींधर आनंदा हनुमंते(२९)रा.माळकौठा ता.मुदखेड यांच्या विरुद्ध गु.र.नं.५०३ /२०२४ कलम २८१,३०३(२),भारतीय न्याय संहिता सहकलम १३०/१७७ आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार दिपक कंधारे हे करत आहेत.