भोकर विधान सभेसाठी काँग्रेसचे गोविंद पाटील व पप्पू पाटील यांच्या नावाची उमेदवार म्हणून मोठी चर्चा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भाजपाने भोकर विधानसभा मतदार संघासाठी महायुतीचा उमेदवार जाहीर केला असून महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार निश्चित होणे बाकी आहे. महाविकास आघाडीच्या वतीने हा मतदार संघ काँग्रेसला सोडण्यात येणार असून एकूण १२ इच्छूकांपैकी काँग्रेसचे गोविंद बाबागौड पाटील व पप्पू पाटील कोंडेकर यांचे नाव आघाडीवर असल्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने भोकर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी जवळपास १२ इच्छूकांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली आहे.या इच्छूकांत केवळ दोनच ओबीसी उमेदवार आहेत व उर्वरित सर्वजण मराठा आहेत.१६-नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुर्दैवी निधन झाल्याने हा मतदार संघ रिक्त झाला होता.त्यामुळे होऊ घातलेल्या १६-नांदेड लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून त्यांचे पुत्र प्रा.रविंद्र चव्हाण यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निश्चित केली आहे.लोकसभेसाठी मराठा उमेदवार दिला असल्याने भोकर विधानसभा मतदार संघासाठी ओबीसी उमेदवार दिला पाहिजे,अशी मागणी होत आहे.
लोकसभेसाठी मराठा व विधानसभेसाठी ओबीसी उमेदवार दिला तर या मतदार संघात बहुसंख्येने असलेल्या मराठा आणि ओबीसी मतदारांची मते मागणे सोपे होऊ शकते,असे कार्यकर्त्यांतून चर्चील्या जात आहे.त्यामुळे माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील व अरुण चव्हाण या दोन इच्छूकांपैकी गोविंद बाबागौड पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.तसेच मराठा उमेवारांत माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,बी.आर.कदम,पप्पू पाटील कोंडेकर,बालाजी पाटील गाढे व एकमेव महिला इच्छूक दामिनी दादाराव ढगे यांची नावे पक्षश्रेष्ठीपुढे विचाराधीन असून यातील पप्पू पाटील कोंडेकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे ही बोलल्या जात आहे.तर गोविंद बाबागौड पाटील यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना उमेदवारी का दिली पाहिजे व दिली तर महाविकास आघाडीस यश कसे मिळू शकते ? याविषयी मत व्यक्त केले असल्याचे समजते.तर मराठा इच्छूक उमेदवारांपैकी पप्पू पाटील कोंडेकर यांना उमेदवारी द्यावी म्हणून काही जणांनी आग्रह धरला असल्याने आज या दोघांपैकी एकाची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.पाहुयात या दोघांपैकी कोणाचे नाव निश्चित होते ? का १२ इच्छूकांपैकी अन्य कोणाचे ?