काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रा.रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर!
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : १६-नांदेड लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसने मविआ चे उमेदवार म्हणून नुकतीच प्रा.रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दि.२० ऑक्टोंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून कोण उभे राहणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले होते.परंतू,अचानकपणे ते आजारी पडले व उपचारादरम्यान दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले.त्यामुळे १६-नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती.महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली व याच निवडणूकी सोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने १६-नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही जाहीर केली.खासदार वसंत चव्हाण यांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी अन्य उमेदवार न देता त्यांचे चिरंजीव प्रा.रविंद्र चव्हाण यांनाच उमेदवारी द्यावी म्हणून नांदेड जिल्हा व सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने एकमुखी निर्णय घेण्यात आला.या निर्णयास महाराष्ट्र राज्य व केंद्रीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने मान्यता दिली आणि सर्वानुमते प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.यानुसार आज दि.१७ ऑक्टोबर २०२४ रोजी पक्षश्रेष्ठींने मविआचे उमेदवार म्हणून प्रा.रविंद्र चव्हाण यांचे नाव जाहीर केले आहे.
जाएंट किलर ठरलेले दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा.रविंद्र चव्हाण यांना पक्षीय कार्यकर्ते व मतदारांची ही पसंती असा काँग्रेसला विश्वास !
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक चव्हाण यांनी पक्ष व आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.या पार्श्वभूमीवर नांदेडमधील काँग्रेस पक्ष संपला अशी चर्चा सुरु झालेली असतांनाच माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने मविआ चे उमेदवार म्हणून १६-नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.यावेळी झालेली निवडणूक खुपच चर्चेत आली होती. कारण काँग्रेसचा गड असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीत भाजपने शिरकाव केलेला होता व खा.अशोक चव्हाण यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाची ताकद वाढली असे बोलल्या जात होते.परंतू काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने त्यांचे विरोधी उमेदवार तथा भाजपचे तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला व मविआस विजय खेचून आणता आला होता.यामुळे दिवंगत खा.वसंतराव चव्हाण हे जाएंट किलर ठरले.त्यांना ५,२८,८९४ मते मिळाली व खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना ४,६९,४५२ मते मिळाली.खा.वसंतराव चव्हाण यांनी ५९ हजार ४४२ मतांनी खा.प्रतापराव पाटील चिखलीकरांवर मात केली होती.येत्या दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेची निवडणूक पार पडेल.तर दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होणार आहे.याच दरम्यान १६-नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूकसुद्धा होणार आहे.त्यासाठी काँग्रेसने नुकतीच दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा.रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.काँग्रेस पक्ष व मविआ ने सदरील उमेदवारावरास उमेदवारी देऊन स्व.चव्हाण कुटूंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून या निवडणुकीत मतदार ही सहानुभूतीचा भक्कम कौल देतील असा विश्वास त्यांच्यातून व्यक्त होत आहे.