Sat. Jan 11th, 2025

भोकर मध्ये उड्डाण पुलाच्या रक्षक भिंतीवर कार धडकली ; एक ठार तर ४ जण जखमी

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुक्यात दि.२३ जुलै पासून अपघाताची मालिका सुरुच असून दि.२६ जुलै रोजी रात्री दरम्यान नांदेड कडून किनवटकडे प्रवासी घेऊन जात असलेली इरटिका कार भोकर मधील उड्डाण पुलाच्या रक्षक भिंतीवर आदळली.या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत.

भोकर-म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव ता.भोकर शिवारातील वळणावर दि.२३ जुलै २०२४ रोजी दोन दुचाकी एकमेकींवर समोरासमोरुन धडकल्या.यात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर दि.२५ जुलै २०२४ रोजी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान याच ठिकाणी एका अज्ञात वाहनाने रामदास दिगंबर कंदेवाड(३३)रा.पिंपळठव या पादचाऱ्यास उडविले.यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या दोन अपघाताच्या मालिकेत ५ जणांचा मृत्यू झालेला असतांनाच दि.२६ जुलै २०२४ रोजी रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान नांदेड कडून किनवटकडे जात असलेली इरटिका कार क्र.एम.एच.१४ डी.एन.६८४८ ही भोकर शहरातील उड्डाण पुलाच्या प्रवेशस्थानी डाव्या बाजूच्या रक्षक भिंतीवर धडकली.ही धडक अतिशय जोराची असल्याने सदरील कारच्या समोरील भाग अर्ध्याच्यावर चिरत गेला.यामुळे कार चालक व त्यांच्या शेजारी डाव्या बाजूला बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला.तर मागचे तिघे ही जखमी झाले.

हा अपघात निदर्शनास येताच काही सेवाभावी नागरिक त्याठिकाणी मदतीसाठी धावून गेले व त्यांनी कारमधील सर्वांना बाहेर काढले.तसेच पुढील उपचारार्थ सर्वांना तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नेण्यात आले.ही माहिती भोकर पोलीसांना मिळताच जमादार दिपक कंधारे व जमादार राजू गुंडेवाड हे रुग्णालयात गेले.यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांनी गंभीर जखमी असलेले कार चालक किशोर मालू कांबळे(४२) रा.दराटी ता.उमरखेड यांच्यावर उपचाराचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतू खुपच रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.तर जखमी प्रेम अदमसिंग मसे (४०),बेबी प्रेम मसे(३७),दक्ष प्रेम मसे(१५) व अनिल नरसिंगराव नेमानिवार(५२) सर्व जण रा.किनवट जि.नादेड यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले व पुढील उपचारार्थ त्यांची नांदेड येथे रवानगी करण्यात आली. मसे कुटूंब आपल्या मुलांवर नांदेड येथील एका रुग्णालयात उपचार करून घरी परतत असतांना हा अपघात झाल्याने त्या कुटूंबास पुन्हा एकदा सर्वांना उपचार घेण्यासाठी रुग्णालयात परतावे लागले आहे.सदरील अपघाताचा रितसर पंचनामा जमादार दिपक कंधारे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी केला असून पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.भोकर तालुक्यात झालेल्या या ३ अपघाताच्या मालिकेत एकूण ६ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !