भोकर मध्ये भरधाव दुचाकीने एका पादचाऱ्यास उडविले;यात तो पादचारी जागीच ठार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर मध्ये अपघाताची मालीका सुरुच असून सलग दुसऱ्या दिवशी दि.१ जून रोजी शहरातील उड्डाण पुलावरुन भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने एका पादचारी हॉटेल कामगार आचाऱ्यास उडविले.यात तो पादचारी जागीच ठार झाला असून त्या दुचाकीसह स्वारांना भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरु होती.
दि.३१ मे रोजी हायवा ट्रकने दोन दुचाकी स्वारांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच दि.१ जून २०२४ रोजी भोकर शहरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या नांदेड कडील बाजूच्या परिसरात असलेल्या हॉटेल आमदार मध्ये आचारी म्हणून काम करणारे नागोराव धोंडीबा सुर्यवंशी(५४)रा.महात्मा फुले नगर, भोकर हे हॉटेल कामावरून सुट्टी झाल्यानंतर भोकर शहरातील रेल्वे उड्डाण पुलावरुन पायी पायी आपल्या घरी जात असतांना रात्री ७:३० वाजताच्या दरम्यान त्या उड्डाण पुलावरुन नांदेडच्या दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या व क्रमांकाचा फलक नसलेल्या दुचाकी वरील स्वारांनी त्यांना उडविल्याच्या दुसरी घटना घडली.या भिषण अपघातात नागोराव सुर्यवंशी हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
यावेळी त्या दुचाकीवरील दोन स्वार दुचाकीसह पडले.पादचारी नागोराव सुर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.परंतू उड्डाण पुलावरून जाणाऱ्या काही वाहन चालक नागरिकांनी त्यांना पकडले व सदरील माहिती भोकर पोलीसात कळविली.यावरुन पो.उप. नि.राम कराड,पो.उप.नि.केशव राठोड,जमादार नामदेव जाधव, पो.ना.राजू गुंडेवार,पो.कॉ.चंद्रकांत अरकिलवार,जिप चालक पो.कॉ.मंगेश क्षिरसागर हे तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी त्या दुचाकीसह दोन स्वारांना ताब्यात घेतले.मयत नागोराव सुर्यवंशी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पाठवून उड्डाण पुलावरील वाहतूक सुरळीत केली.तसेच त्या दुचाकी स्वारांना भोकर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांची नावे श्रीकांत सिताराम गुडले(१९) व अमोल मारोती कंदेवाड असून दोघे ही रा.चिदगिरी ता.भोकर चे रहिवासी असल्याचे समजले.तसेच त्यावेळी ते चिदगिरी गावाकडे जात होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.
स्व.नागोराव सुर्यवंशी हे एक अतिशय गरीब कुटूंबातील कमवते प्रमुख व्यक्ती व उत्कृष्ट होतकरु आचारी होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.एका गरीब कुटूंबातील कमावत्या पुरुषाचा अशा प्रकारे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने सुर्यवंशी परिवारावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तर पो.नि. सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दुचाकी स्वारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.
संपादक उत्तम बाबळे व परिवार सुर्यवंशी परिवाराच्या दु:खात सहभागी असून स्व.नागोराव सुर्यवंशी यांना भावपुर्ण श्रद्धांजली!